दत्त, सत्येंद्रनाथ : (१२ फेब्रुवारी १८८२–२५ जून १९२२). प्रख्यात बंगाली कवी. अक्षयकुमार दत्तांचे नातू. वर्धमान जिल्ह्यातील चुपीग्राम येथील मूळ रहिवाशी. रवींद्रनाथांचे अग्रगण्य शिष्य व समकालीन कवी या दृष्टीने रवींद्रनाथांनंतर सत्येंद्रनाथ दत्तांचे नाव येते. सत्येंद्रनाथांनी विद्यार्थिदशेतच काव्यलेखन सुरू केले. १८९९ ते १९०३ या काळात त्यांनी एकूण चार वेळा कॉलेजात प्रवेश घेतला परंतु ते शिक्षण त्यांच्या मनाला पटत नसे. मात्र ज्ञानविज्ञानविषयी त्यांना आस्था होती. सविता (१९००), वेणु ओ वीणा (१९०६), होमशिखा (१९०७), फुलेर फसल (१९११), कुहु ओ केका (१९१२), तुलिर लिखन  (१९१४), अभ्र–आबीर  (१९१६), हंसतिका (१९१७), बेलाशेषेर गान  (१९२२), बिदाय आरती (१९२२) इ. त्यांचे एकूण पंधरा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. याशिवाय जन्मदुःखी  (नॉर्वेजियनवरून अनुवादित कादंबरी,१९२२), धूपेर धोंयाय  (नाटिका, १९२९), चिनेर धूप (निबंध, १९१२) ही सत्येंद्रनाथांची पुस्तके प्रसिद्ध असून त्यांचे गद्यसाहित्य भारतीप्रवासी या नियतकालिकांतून प्रसिद्ध होत असे.

आधुनिक बंगाली पद्यात नानाविध अभिनव छंदांचे प्रवर्तक म्हणून सत्येंद्रनाथांची ख्याती आहे. विदेशी भाषेतील काव्याचा बंगाली अनुवाद करण्यात ते सिद्धहस्त होते. तीर्थ सलिल  (१९०८), तीर्थ रेणू (१९१०), मणि मंजुषा (१९१५) हे त्यांचे अनुवादित काव्यसंग्रह होत. तत्कालीन नानाविध घटना व वादविवाद यांवर सत्येंद्रनाथांनी काही उपरोधिक कविता ‘नवकुमार कविरत्न’ ह्या टोपणनावाने लिहिल्या होत्या. हंसतिका  ह्या संग्रहात त्यांच्या उपरोधपर कविता संकलित आहेत.

सत्येंद्रनाथांच्या कविप्रकृतीत त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीचा विशेष प्रभाव दिसतो. त्यामुळे त्यांच्या कविता जितक्या वस्तुनिष्ठ आहेत, तितक्या त्या भावप्रधान नाहीत. विद्वत्ता व व्यासंग यांचा आधुनिक बंगाली काव्यातील पहिला मोठा आविष्कार दत्तांच्या कवितेत झालेला दिसतो. त्यांच्या मानसप्रकृतीची घडण पितामह अक्षयकुमार दत्त यांच्या संस्कारांतून तयार झाली. म्हणूनच सत्येंद्रनाथांच्या साहित्यिक जीवनातील प्रथमावस्थेत अक्षयकुमारांचा प्रभाव बराच दिसतो. अजितकुमार चक्रवर्ती आणि सतीशचंद्र रॉय यांच्यामुळे सत्येंद्रनाथ रवींद्रनाथांच्या सान्निध्यात आले. साधी सहजसुंदर भाषा व प्रसन्न चपखल छंद या दोन बाबतींत सत्येंद्रनाथ रवींद्रनाथांचे ऋणी आहेत.

बंगाली काव्यावरील सत्येंद्रनाथांचा प्रभाव लक्षणीय असून कवी म्हणून त्यांना बंगाली साहित्यात मानाचे स्थान आहे.

सेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)