बंदोपाध्याय, इंद्रनाथ : (?−१८४९–२३ मार्च १९११). बंगाली विनोदी लेखक व पत्रकार. बरद्वान जिल्ह्यातील पांडुग्राम या ठिकाणी जन्म. काटोयारजवळच्या गंगाटिकुरी गावी प्राथमिक शिक्षणास प्रारंभ. पुढे पूर्णिया, कृशनगर, बीरभूम इ. ठिकाणच्या शाळांमध्ये माध्यमिक शिक्षण घेऊन भागलपूर येथून शालांत परीक्षा उत्तीर्ण. कलकत्त्याच्या कॅथीड्रल मिशन कॉलेजमधून ते बी.ए. झाले. प्रथम काही काळ शिक्षक म्हणून नोकरी व पुढे बी.एल.परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बरद्वान येथे वकिलीचा स्वतंत्र व्यवसाय इंद्रनाथ हे नामांकित वकील होते. व बरद्वान येथूनच त्यांनी पंचानंद नावाचे बंगाली पत्रक सुरू केले. त्यात ते स्वतः ‘पंचानंद’ या टोपणनावाने लिहीत. याशिवाय साधारणी, बंगवासी इ. पत्रकांमधूनही ते लेखन करीत.

उत्कृष्ट काव्यम् (१८७०) हा इंद्रनाथांचा पहिला काव्यग्रंथ पण भारत उध्दार (१८७८) या उपहासगर्भ विनोदी खंडकाव्यामुळे त्यांना विशेष प्रसिध्दी लाभली. इंद्रनाथांची कल्पतरू (१८७४) ही बंगाली साहित्यातील पहिली विनोदगर्भ कादंबरी होय. या कादंबरीतील रहस्यचातुर्याची व वैचित्र्यपूर्ण मानवी स्वभावचित्रणांची बंकिमचंद्रांनी बंगदर्शनमध्ये प्रशंसा केली होती. याखेरीज हाते हाते फल (प्रहसन,१८८२− सहलेखक अक्षयचंद्र सरकार) पाँचूठाकूर (१८८४, एकूण तीन खंडात प्रसिध्द : पहिल्या दोन खंडात पंचानंदमधील लेखांचे संकलन व तिसऱ्या खंडात बंगवासीमधील लेखांचे संकलन) खाजानार आईन (१८८६) व क्षुदिराम (१८८८) या कादंबऱ्या, प्रसिध्द आहेत.

इंद्रनाथ बंदोपाध्यायांना ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा सहवास लाभला. बंकिमचंद्र चतर्जी, हेमचंद्र बंदोपाध्याय, रंगलाल बंदोपाध्याय, अक्षयचंद्र सरकार, राजकृष्ण रायप्रभृती विद्वज्जनांचे जे साहित्यमंडळ तयार झाले होते, त्यातही इंद्रनाथांचा वावर होता. परतु बंगाली साहित्यातील विनोदी, विडंबनात्मक व उपहासात्मक लेखनाचे पहिले मानकरी म्हणून त्यांचे स्वतंत्र स्थान आहे. इंद्रनाथांच्या विनोदी शैलीत देशप्रेम तसेच देशातील घातक प्रवृत्तीवर मार्मीक ताशेरे झोडण्याचे कौशल्य यांचा प्रत्यय येतो. त्यांच्या लेखनापासून स्फूर्ती घेऊन जोगेशचंद्र बसू यांनी विडंबनात्मक कादंबऱ्या लिहिल्या. कलकत्ता येथे इंद्रनाथांचे निधन झाले.

आलासे, वीणा.