पित्तारुण : (बिलीरूबीन). पित्तरसातील [  ⟶पित्तरस ] पित्तरंजकांपैकी एकास पित्तारूण म्हणतात. रक्तातील तांबड्या कोशिका (पेशी) ९० ते १२० दिवसांनंतर निकामी होतात. त्या भंगुर बनून त्यांच्या कोशिका-भित्ती फुटतात आणि त्यांमधून रक्तारुण (हीमोग्‍लोबिन)रक्तात मिसळते. [  ⟶रक्त ]. रूधिराभिसरणातून रक्त जेव्हा जालिका अंत:स्तरी तंत्रामधून (यकृत, प्‍लीहा, अस्थिमज्‍जाहाडांच्या अंतर्भागातील पोकळ जागेतील मऊ पदार्थ-वगैरेंमधून) जाते. तेव्हा हे सुटे झालेले रक्तारुण तेथील भक्षिकोशिका भक्षण करतात. या ठिकाणी रक्तारूणाचे प्रथिन आणि प्रथिनहीन अशा दोन भागांत विभाजन होते. पहिल्यास ‘ग्‍लोबिन’ व दुसर्‍यास ‘हीम’ म्हणतात. यांपैकी हीम या भागापासून प्रथम ‘पित्तहरिती’ (बिलीव्हर्डीन) नावाचे रंजक तयार होते, परंतु त्यापासून जलद ⇨ क्षपणाने पित्तारूण बनते. हे पित्तारूण अल्पकाळच मुक्त स्वरूपात असते. कारण ते जसजसे रक्तद्रवात मिसळते तसतसे ते जलद गतीने त्यामधील अल्‍ब्युमिनाशी ( एक प्रकारचा साध्या प्रथिनाशी) संयुग्मित होते. या संयुग्मित अवस्थेतही त्याला ‘मुक्त पित्तारूण’ च म्हणतात. कारण पुढे यकृतात जेव्हा पित्तारूणाचे इतर काही पदार्थांबरोबर संयुग्मन होते आणि ते पित्तरसात ज्या अवस्थेत उतरते त्या वेळी ‘संयुग्मित पित्तारूण’ ही संज्ञा वापरतात. मुक्त पित्तारूण रक्तप्रवाहातून जेव्हा यकृतातील यकृत-कोशिका-भित्तीजवळ येते तेव्हा अभिशोषिले जाते. ही क्रिया संपताच म्हणजे कोशिका-भित्तीतून आत शिरताच ते रक्तद्रव्य अब्‍ल्युमिनापासून मोकळे होते आणि लगेचच दुसर्‍या एका प्रथिनाशी (Y-प्रथिन) संयुग्मित होते. यानंतर पुन्हा एकदा याही प्रथिनापासून पित्तारूण मोकळे होते. जवळजवळ ८०% पित्तारूण ग्‍लायक्युरॉनिक (ग्‍लुकुरॉनिक) अम्‍लाशी, १० % सल्फेटाशी आणि उरलेले १०% इतर पदार्थांशी संयुग्मित होते. अशा पित्तारूणाला वर सांगितलेली  संयुग्मित पित्तारूण ही संज्ञा वापरतात. हे सर्व कार्य यकृत-कोशिकांत होते व नंतर याच स्वरूपात क्रियाशील वहनाने त्याचे पित्तनलिकांमार्फत पित्तरसात उत्सर्जन होते.

पित्तारूणाचे उत्पादन व उत्सर्जनसंयुग्मित पित्तारूण अल्पसा भाग कोशिकांमधून जवळच्या यकृत-कोटरिकांतील [  ⟶यकृत ] रक्तद्रवात प्रत्यक्ष मिसळतो. काही  भाग पित्तवाहिन्यांतून वाहताना अभिशोषणानंतर रक्तद्रवात मिसळतो, तर आणखी थोडा भाग लसीकावाहिन्यांमार्फत (रक्तद्रवाशी साम्य असणारा व ऊतकांकडून – समान रचना व कार्य असणार्‍या कोशिकासमूहांकडून – रक्तात मिसळणारा द्रव पदार्थ वाहून नेणार्‍या वाहिन्यां मार्फत) नेला जाऊन रक्तात मिसळतो.

पित्तरसातून पित्तारूण आंत्रमार्गात (आतड्याच्या मार्गात) आल्यानंतर त्यापासून सूक्ष्मजंतूंच्या प्रक्रियेमुळे ‘मूत्रपित्तारूणजनक’ (युरोबिलीनोजेन) नावाचा पदार्थ बनतो. हा पदार्थ अतिविद्राव्य (अतिशय विरघळणारा) असतो. यापैकी काही भाग आंत्र श्लेष्मकलास्तरातून (बुळबुळीत पातळ अस्तरातून) अभिशोषिला जाऊन प्रवेशिका नीला तंत्रामार्फत (आंत्रमार्गातील अशुद्ध रक्त यकृताकडे वाहून नेणार्‍या सूक्ष्म वाहिन्यांनी बनलेल्या नीला प्रणालीमार्फत) परत यकृतात नेला जातो व पुन्हा एकदा पित्तामार्फत आंत्रात आणला जातो. मूत्रपित्तारूणजनकाचा ५% भाग मूत्रपिंडाद्वारे मूत्रातून उत्सर्जित होतो. हवेशी संपर्क आल्यानंतर मूत्रपित्तारूणजनकाचे मूत्रपित्तारूणात रूपांतर होते. आंत्रमार्गात उरलेल्या मूत्रपित्तारूणजनकाचे मलपित्तारूणजनकात रूपांतर होते आणि त्यापासून ⇨ऑक्सिडीभवनाने मलपित्तारूण तयार होते व या स्वरूपात मलातून विसर्जित होते. वरील वर्णनावरून पित्तलवणांप्रमाणेच पित्तरंजकाचेही आंत्र ⟶यकृत ⟶आंत्र अभिसरण होत असते [  ⟶पित्तरस ].

पित्तारूणाचे रक्तद्रवातील प्राकृतिक (सर्वसाधारण) प्रमाण १००० मिली. रक्तद्रवात ०.५ मिग्रॅ. एवढे असते. काविळीमध्ये हे प्रमाण कधीकधी ४० मिग्रॅ. पर्यंतही वाढते. ते १.५ मिग्रॅ. म्हणजे नेहमीपेक्षा तिप्पट होताच त्वचा पिवळी दिसू लागते. [  ⟶कावीळ ]. रक्तविलयजन्य काविळीत मुक्त पित्तारूणाचे रक्तद्रवातील प्रमाण वाढलेले असते, तर रोधजन्य काविळीत संयुग्मित पित्तारूणाचे प्रमाण वाढते. या दोन्ही प्रकारच्या काविळींतील निदान करण्याकरिता व्हॅन डेन बर्ग (१८६९-१९४३) या डच वैद्यांनी रक्तद्रवाच्या तपासणीवर आधारित परीक्षा शोधली असून ती त्यांच्याच नावाने ओळखली जाते. या परीक्षेकरिता जो विशिष्ट विक्रियाकारक वापरतात त्यालाही व्हॅन डेन बर्ग विक्रियाकारक म्हणतात. रक्तविलयनजन्य काविळीत ‘अप्रत्यक्ष’ व्हॅन डेन बर्ग विक्रिया (प्रक्रिया) मिळते. म्हणजे मुक्त पित्तारूणाधिक्य दर्शविले जाते. याउलट ‘प्रत्यक्ष’ व्हॅन डेन बर्ग विक्रिया संयुग्मित पित्तारूणाधिक्य दर्शविते व त्यावरून रोधजन्य काविळीचे निदान होते.

संदर्भ :  1. Brobeck, J. R., Ed. Best and Taylor’s Physiologycal Basis of Medical Practice, Baltimore, 1973.

   2. Guyton, A. C. Textbook of Medical Physiology, Philadelphia, 1976.

हेगिष्टे, म. द.

भालेराव, य. त्र्यं.