कव्हल्येव्हस्कइ, अल्यिकसांडर अनूफ्रियेव्हिच:  (१९ नोव्हेंबर १८४० – २२ नोव्हेंबर १९०१). रशियन प्राणिशास्त्रज्ञ. तुलनात्मक भ्रूणविज्ञान आणि प्रायोगिक ऊतकविज्ञान (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशीसमूहांसंबंधीचे विज्ञान) यांचे संस्थापक. त्यांचा जन्म द्विन्स्क जवळील शुस्त्यांक (सध्याचे दाउगाफपिल्स, लॅटव्हिया) येथे झाला. त्यांचे शिक्षण सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात झाले व १८६७ मध्ये त्यांनी डी. एस्‌सी. ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी १८६७, १८९१-९३ सेंट पीटर्सबर्ग, १८६८-६९ कझान, १८६७-७४ कीव्ह आणि १८७४-९० ओडेसा या विद्यापीठांमध्ये प्राणिविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले. तसेच त्यांनी भूमध्यसमुद्रकिनारा व तांबडा समुद्र यांची प्रदीर्घ शोधसफर केली. सर्व बहुकोशिक (ज्यांचे शरीर अनेक पेशींचे बनले आहे अशा) प्राण्यांच्या विकासामधील समान रचनेचे अस्तित्व त्यांनी प्रथमच प्रस्थापित केले. त्यामुळे सजीवांच्या क्रमविकासाचा (उत्क्रांतीचा) महत्त्वाचा पुरावा उपलब्ध झाला. ह्या गोष्टींचा त्यांनी आपल्या डेव्हलपमेंट ऑफ अँफिऑक्सस लॅन्सिओलेटस (१८६५) व  ॲनॅटमी अँड डेव्हलपमेंट ऑफ फोरोनिस (१८८७) या दोन ग्रंथांमध्ये ऊहापोह केला आहे. तसेच त्यांनी वरील प्राण्यांच्या भ्रूणीय स्तरांतील रचनासादृश्य सप्रयोग दाखवून दिले. या विषयावरील त्यांचे सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे एंब्रियॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स ऑन वर्मस्‌ अँड ऑर्थ्रोपॉड्स (१८७१) हा ग्रंथ होय. माश्यांच्या विकासातील संशोधन मालेत (१८८६-८७) त्यांनी माश्यांच्या रूपांतरणामध्ये होणाऱ्या ऊतकविलेयनामधील (ऊतकांचे एकाएकी लहान तुकडे होण्यामधील) भक्षिकोशिकांचे (बाह्य पदार्थ पचवून टाकणाऱ्या पेशींचे) कार्य प्रयोगाने दाखवून दिले.

कव्हल्येव्हस्कइ यांच्या वरील कामगिरीबद्दल त्यांची १८९० मध्ये रशियन ऍकॅडेमी ऑफ सायन्सेसवर निवड करण्यात आली. ते सेंट पीटर्सबर्ग येथे मृत्यू पावले. गणितज्ञ सॉन्या कव्हल्येव्हस्कइ त्यांच्या वहिनी होत. 

जमदाडे, ज.वि.