मुक्तिफौज: (सॅल्व्हेशन आर्मी). इंग्लंडमधील विल्यम बूथ (१८२९–१९१२) ह्या मेथडिस्ट पंथाच्या ‘मिनिस्टर’ने स्थापन केलेली ख्रिस्ती धर्मातील आंतरराष्ट्रीय स्वरूपाची धार्मिक व भूतदयावादी संघटना. तिची रचना सैनिकी धर्तीवर केल्यामुळे तिला ‘सॅल्व्हेशन आर्मी’ म्हणजे ‘मुक्तिफौज’ हे नाव देण्यात आले. तिच्या स्थापनेमागील मूलभूत उद्देश धर्मप्रसार हा असला, तरी ती सामाजिक कल्याणकारी सेवाकार्यामुळेच विशेष प्रसिद्ध आहे. राष्ट्रीयत्व, सामाजिक वर्ग, धर्मपंथ इत्यादींचा भेदभाव न पाळता सर्वांसाठी ही संस्था सेवारत आहे.

इंग्लंडमध्ये नॉटिंगॅम येथे विल्यम बूथ यांचा जन्म झाला. कॅथरिन मम्‌फोल्ड यांच्याशी ते १८५५ मध्ये विवाहबद्ध झाले. मेथडिस्ट पंथाचे मिनिस्टर म्हणून १८५८ मध्ये दीक्षा घेऊन १८६१ मध्ये त्यांनी चर्चमध्ये जाऊ न शकणाऱ्या गरिबांच्या सेवेस स्वतःस वाहून घेतले. १८६५ मध्ये त्यांनी लंडन शहराच्या पूर्वेकडील टोकाशी असणाऱ्या गलिच्छ वस्त्यांतून धर्मोपदेशास आरंभ केला. तेथे शिक्षा भोगून आलेले गुन्हेगार, वेश्या, मद्यपी, जुगारी इ. प्रकारचे लोक राहत. त्यांपैकी अनेक व्यक्ती धर्मांतर करीत पण ख्रिस्ती चर्चमध्ये त्यांचे अनेक वेळा स्वागत होत नसे. बूथ यांच्या उपदेशास या गलिच्छ वस्तीत बरीच गर्दी होऊ लागली आणि धर्मांतरितांचे प्रमाणही वाढू लागले. तीन-चार वर्षांतच हे कार्य करण्यासाठी त्यांना सु. ३,००० कार्यकर्ते लाभले आणि ते बूथ यांना आदराने ‘जनरल’ (जनरल सुपरिंटेंडेंट) असे संबोधू लागले. १८७८ मध्ये आपल्या संघटनेचे ‘ख्रिश्चन मिशन’ हे मूळचे नाव बदलून ‘सॅल्व्हेशन आर्मी’ असे नाव देण्यात आले व तिची सैनिकी धर्तीवर पुनर्रचना करण्यात आली. बूथ हे तिचे आमरण प्रमुख म्हणजे ‘जनरल’ होते.

त्यांनी १८९० मध्ये इन डार्केस्ट इंग्लंड अँड द वे आउट हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यात व्हिक्टोरियन काळातील इंग्लंडमधील दारिद्रयपीडित लोकांचे तपशीलवार दारुण चित्रण तर आहेच पण त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी उपाययोजनाही सुचविली आहे. आत्मनिर्भरता, प्रशिक्षण, रोजगार व चांगल्या संधी शोधून तेथे त्यांचे पुनर्वसन ह्या त्यांतील काही उपाययोजना होत. त्यांनी त्यासाठी रूग्णालये, मदतकेंद्रे, पतित स्त्रियांसाठी स्त्रीकल्याण केंद्रे, कामगार स्त्रियांच्या मुलांसाठी पाळणाघरे, गरिबांसाठी बँका, मुलांसाठी शाळा, गरिबांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी सल्लाकेंद्रे इत्यादींची सुरुवात केली. विल्यम बूथ यांना आठ मुले होती व त्या सर्वांनीच मुक्तिफौजेत विविध नात्याने मोलाची सेवा केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा थोरला मुलगा ब्रामवेल हा जनरल झाला. बॅलिंग्टन बूथ हा त्यांचा मुलगा अमेरिकेत होता. त्याने १८९६ मध्ये फौजेचे त्यागपत्र देऊन ‘व्हॉलंटिअर्स ऑफ अमेरिका’ या संघटनेची स्थापना करून सु. ३० वर्षे तिचे नेतृत्व केले.

मुक्तिफौजेचे स्वयंसेवक रस्त्याच्या कोपऱ्यावर गाऊन, वाद्य वाजवून, टाळ्या वाजवून परमेश्वराचे संकीर्तन करतात व त्याच्या थोरवीचा लोकांना उपदेश करतात. या संकीर्तनानंतर बहुतेक वेळा बंदिस्त जागेत धार्मिक बैठका व मेळावे होतात. अशा प्रकारे अनेक देशांत फौजेने धर्मप्रसाराचे काम करून अनेकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. लवकरच फौजेचा प्रसार सर्व जगभर झाला. आजमितीस फौजेत सु. २६,००० स्त्री-पुरुष अधिकारी आहेत. अधिकाऱ्यांमध्ये लेफ्टनंटपासून ब्रिगेडियरपर्यंत अधिकार पदे व विशिष्ट गणवेश आहे. हे अधिकारी त्यांच्या हाताखालील सैनिकांवर (सोल्जर) नियंत्रण ठेवतात. पहिल्या महायुद्धात मुक्तिफौजेने सर्वच आघाड्यांवर मोलाचे मदतकार्य केले. त्यांनी सु. २,००० विसावा व करमणूक केंद्रे स्थापन करून मदत केली. मुक्तिफौज काही अंशी ‘यूनायटेड सर्व्हिस ऑर्गनायझेशन्स’ (यूएसओ) ह्या संघटनेच्या उभारणीतही सहभागी आहे. शक्य तेथे आपद्ग्रस्तांना मुक्तिफौजेने मदतीचा हात पुढे केला. मुक्तिफौजेचे वॉर क्राय हे अधिकृत मुख्यपत्र आहे. आज जगातील ८६ देशांत व वसाहतींत ही संघटना कार्य करते. अमेरिकेत तिची ९,००० केंद्रे असून सदस्यांची संख्या सु. ३,८५,००० आहे. मुक्तिफौजेचे मुख्यालय लंडन येथे असून अमेरिकेतील मुक्तिफौजेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे.

संदर्भ : 1. Collier, Richard, General Next to God: Story of William Booth and the Salvation Army, Dutton, 1965.

              2. Sandall, Robert, The History of Salvation Army, Nelson, 1968.

सुर्वे, भा. ग.