कोसेल, आल्ब्रेख्ट: (१६ सप्टेंबर १८५३–५ जुलै १९२७). जर्मन जीवरसायनशास्त्रज्ञ. वैद्यक व शरीरक्रियाविज्ञान या विषयांचे १९१० सालचे नोबेल पारितोषिक विजेते. त्यांचा जन्म रॉस्टॉक येथे झाला व वैद्यकीय शिक्षण रॉस्टॉक व स्ट्रासबर्ग येथे झाले. १८७८ मध्ये त्यांनी एम्. डी. पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी बर्लिन शरीरक्रियाविज्ञान संस्थेत प्रथम प्रसिद्ध जीवरसायनशास्त्रज्ञ फेलिक्स होपे-झायलर आणि नंतर एमील ड्यू ब्बा- रेमाँ यांचे साहाय्यक म्हणून काम केले. १८९५–१९०१ या काळात ते मारबर्ग येथील शरीरक्रियाविज्ञान संस्थेत प्राध्यापक व संचालक होते. त्यानंतर हायड्‌लबर्ग विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली व मृत्यूसमयी ते तेथेच गुणश्री प्राध्यापक व विद्यापीठाच्या प्रथिन संशोधन संस्थेचे संचालक होते.

जिवंत ऊतकांचा (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांचा) रसायनशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी कार्बनी रसायनशास्त्राची तत्त्वे प्रथम वापरणाऱ्यांत कोसेल हे एक होते. त्यांचे बहुतेक संशोधन कार्य शरीरातील प्रथिन उत्पादनाशी संबंध असणाऱ्या ⇨न्यूक्लिइक अम्लां विषयी होते. याकरिताच त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.

ते Zeitschrift fur physiologische Chemie या नियतकालिकाचे सु. ३० वर्षे संपादक होते व त्यांचे बहुतेक संशोधनपर निबंध याच नियतकालिकात प्रसिद्ध झाले. Leitfaden fur medizinisch Chemiche Kurse (१९१७ – सातवी आवृत्ती) व त्यांचे इतर ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. ते हायड्लबर्ग येथे मृत्यू पावले.

कानिटकर, बा. मो.