दयाळ (कॉप्सिकस सॉलॉरिस)

दयाळ : या पक्ष्याचा टर्डिडी पक्षिकुलात समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव कॉप्सिकस सॉलॅरिस असे आहे.राजस्थानचा रखरखीत प्रदेश सोडून भारतात तो सगळीकडे आढळतो. डोंगराळ भागात १,२२० मी. उंचीपर्यंत तो सापडतो. झाडीत राहणारा असल्यामुळे तो झाडांच्या राईत आणि बागांत असतो. गावात आणि खेड्यापाड्यांत तो नेहमी दिसतो.

हा पक्षी नीटस असून तो बुलबुलाएवढा, सु. २० सेंमी. लांब असतो. नराचे डोके, मान, पाठ आणि छाती काळ्या रंगाची सबंध पोट पांढरे शेपटी लांब आणि तिची मधली पिसे काळी, बाकीची पांढरी पंख काळे व त्यांच्यावर एक मोठा उभा पांढरा पट्टा नराचे जे भाग काळे असतात ते मादीमध्ये गडद तपकिरी रंगाचे असतात जे पांढरे असतात ते मादीमध्ये पांढरेच असतात मादीच्या पंखांवर नराप्रमाणेच पांढरा पट्टा असतो डोळे तपकिरी चोच व पाय काळे शेपटी बहुधा वर उचललेली असते.

दयाळ एक एकटे किंवा जोडप्याने हिंडतात. याचे मुख्य कारण म्हणजे नर भांडकुदळ असतो त्याचे आपल्या जातभाईंशी पटत नाही मादी भांडकुदळ नसते. टोळ, नाकतोडे आणि इतर कीटक हे याचे भक्ष्य होय. भक्ष्य मिळविण्याकरिता जमिनीवर उतरून तो इकडे तिकडे फिरत असतो. तो तूरूतूरू चालतो आणि थांबल्याबरोबर शेपटीला झटका देऊन ती उभारतो. शेवरीच्या आणि पांगाऱ्याच्या फुलांतला मधुरसही तो पितो.

हा गाणारा पक्षी आहे. निरनिराळ्या प्रकारची मधूर शिळ घातल्यासारखे याचे गाणे असते. सकाळी व तिसऱ्या प्रहरी एखाद्या झाडावर उंच ठिकाणी बसून हा गात असतो व मधूनमधून शेपटी उभारीत असतो. इतर पक्ष्यांच्या आवाजाचीही हा नक्कल करतो.

प्रजोत्पादनाच्या काळात म्हणजे उन्हाळ्यात मादीचे मन आकर्षित करून घ्यावयाचे असल्यामुळे याचे गाणे भरात येते. यांचा जोडा जमल्यावर दोघेही घरटे बांधू लागतात. ते झाडांच्या खोडांच्या किंवा फांद्यांच्या लहानशा पोकळीत किंवा भिंत्तीच्या भोकात बारीक मुळ्या, गवताच्या काड्या, धागे, मऊ पिसे यांचे बनविलेले असते आकार लहान वाटीसारखा असतो. मादी ३–५ अंडी घालते ही फिक्कट निळसर हिरव्या रंगाची असून त्यावर तांबूस तपकिरी ठिपके असतात. अंडी उबविण्याचे काम मादी करते. मात्र पिल्लांना दोघेही भरवतात.

कर्वे, ज. नी.