फिंच : बिया खाणाऱ्या आणि गाणाऱ्या लहान पक्ष्यांचा गट. सामान्यपणे पॅसेरिफॉर्मिस गणातील फ्रिंजिलिडी कुलातील पक्ष्यांना फिंच म्हणतात. तथापि फिंच पक्ष्यांच्या वर्गीकरणाविषयी मतभेद असून कधीकधी काही इतर कुलांतील पक्ष्यांनाही (उदा., विणकर फिंच) फिंच म्हटले जाते परंतु येथे फ्रिंजिलिडी कुलातील पक्ष्यांचीच माहिती दिली आहे. पक्षी वर्गातील हे सर्वात मोठे कुल असून प्रत्येक सात पक्ष्यांतील एक पक्षी हा फिंच पक्षी असतो, असा अंदाज आहे. या कुलात सु. ४२५ जाती आहेत. फिंच पक्षी मुख्यत्वे उत्तर गोलार्धात आढळत असले, तरी दक्षिण अमेरिका व आफ्रिकेतही यांच्या थोड्या जाती आढळतात. थोडक्यात ओशिअनिया, ईस्ट इंडिज, मॅलॅगॅसी व अंटार्क्टिका सोडून इतर सर्व प्रदेशांत ते आढळतात. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे हे पक्षी आढळत असले, तरी ते मूळचे तेथील नसून तेथे ते बाहेरून आणले गेले आहेत आणि त्यांनी तेथील परिसराशी जुळवून घेतले आहे.

फिंच पक्षी आकारमानाने लहान (लांबी सु. १० ते २७ सेंमी.) असले, तरी शरीराने हे मजबूत असतात. यांची बोटे लहान व सलग असतात. त्यांच्या नाकपुड्या जवळ असतात व काहींच्या तोंडाभोवती थोडे राठ केस असतात. बहुतेकांची चोच आखूड, मजबूत व शंकूप्रमाणे टोकदार (चिमणीच्या चोचीसारखी) असते मात्र काही जातींत चोच चांगलीच लांब असते. चोचीचे स्नायू बळकट असतात तसेच काहींच्या चोचीच्या कडा धारदार तर काहींच्या करवतीप्रमाणे दंतुरही असतात. मजबूत चोचीमुळे हे पक्षी कठीण कवचाची फळे व बिया, तसेच कठीण बिया फोडू शकतात. तसेच काही फळीतील बिया बाहेर काढण्यासाठी चोचीचा वापर करतात. हे मुख्यत्वे बिया खातात काही फिंच पक्षी वनस्पतींचे इतर भाग, कीटक वगैरेही खातात तर काही लांब चोचीचे फिंच पक्षी फुलांतील मकरंदही खातात. यांना नऊ आद्य पिसे असून यांच्या शेपटात १२ पिसे असतात. यांच्या पिसाऱ्याचा रंग विविध प्रकारचा असतो. करडा ते तपकिरी तसेच पिवळा, जांभळा, तांबडा, हिरवा, निळा, काळा व पांढरा हे रंग आणि या रंगांच्या मिश्रणांच्या छटाही आढळतात. नर व मादी दिसायला बहुधा सारखीच असतात परंतु काही जातींत नरांचे रंग (विशेषतः विणीच्या हंगामात) अधिक आकर्षक असतात. काही जातींचे भूप्रदेश ठरलेले असतात तर काही जातींचे गट स्थूल अशा भूप्रदेशांत राहतात आणि काही जातींचे पक्षी स्थलांतर करणारे आहेत. सर्वसाधारणपणे फिंच पक्षी गाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कॅनरी बेटावर आढळणारे जंगली कॅनरी वा सेरीन फिंच (सेरिनस कॅनॅरिया) हे गाण्याबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत [⟶ कॅनरी पक्षी]. काही फिंच पक्षी इतर पक्ष्यांच्या आवाजाची नक्कलही करतात. विशेषतः प्रजोत्पादनाच्या काळात सर्व फिंच पक्षी अधिक प्रमाणात गातात. काहींचे गाणे सुस्वर असून कानाला गोड लागते, तर काहींचे गाणे बेसूर असते. एक फिंच पक्षी एका दिवसांत २,३०० वेळा गाणे म्हणाल्याची नोंद आहे.

फिंच पक्ष्यांची घरटी टोपलीसारखी असतात ती काट्याकुट्या, गवत, मुळ्या, हरिता, दगडफूल, सालींचे तंतू वगैरेंची बनविलेली असतात आणि त्यांच्या आतील बाजूस केस, लोकरीचे तंतू, बारीक मुळ्या व पिसे यांचे अस्तर असते. घरटी उंच झाडांवर, झुडपांवर तसेच जमिनीवरही केलेली आढळतात. काहींच्या घरट्यांवर आच्छादनही असते. साधारणतः घरटी बांधल्यावर हे पक्षी जोडीने राहतात इतर वेळी काहींचे थवे आढळतात. एका हंगामात मादी दोन वा तीन वेळा २ ते ६ (क्वचित ८) अंडी घालते. अंड्यांवर ठिपके, रेषा व पट्टे असतात. काहींमध्ये मादी तर काहींत नर आणि मादी आळीपाळीने अंडी उबवितात. पिले मादीसारखी दिसतात व त्यांचे संगोपन दोघेही करतात.

काही जातींचे फिंच पक्षी फळाफुलांची नासाडी करून उपद्रव देतात उलट काही जातींचे फिंच पक्षी तणांचे (उदा., थिसल गवत) बी व उपद्रवी कीटक खाऊन शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात.

फ्रिंजिलिडी कुलातील फ्रिंजिला हा वंश नमुनेदार असून यातील चॅफिंच (फ्रिंजिला सीलोबिस) व ब्रांब्लिंग (फ्रि. माँटिफ्रिंजिला) या जाती प्रामुख्याने ब्रिटन व यूरोप येथे आढळतात. फळबाग वा शेतमळे येथे यांची वस्ती असते. त्यांपैकी चॅफिंच पक्षी दिसावयाला सुंदर आहे. याची पुढील बाजू फिकट गुलाबी तपकिरी, डोके निळसर करडे, पंख तपकिरी व त्यांवर पांढरे पट्टे शपूट तपकिरी व पार्श्वभाग हिरवट असल्याने तो अतिशय आकर्षक दिसतो. त्याचा आवाजही गोड आहे.

हॉफिंच (कोकोथास्टिस कोकोथ्रास्टिस) हा आयर्लंडपासून जपानपर्यंतच्या थंड प्रदेशात आढळतो. याचा रंग चमकदार तपकिरी असून याच्या खांद्यांवर पांढरे ठिपके असतात. याची चोच मोठी असून अत्यंत कठीण बिया फोडण्यात तो पटाईत आहे. ज्या बिया फोडण्यास सु. ४५ किग्रॅ. एवढे बळ लागेल अशा कठीण बिया तो चोचीने फोडू शकतो. अमेरिकन गोल्डफिंच पक्षी झगझगीत पिवळ्या रंगाचा असून त्याच्या डोक्याचा वरचा भाग काळा असतो.

क्रॉसबिल या फिंच पक्षाची चोच विषेश प्रकारची म्हणजे तिची पुढील टोके कातरीच्या पात्यांप्रमाणे एकमेकांना छेदणारी असतात. त्यामुळे त्याला पाइन वृक्षाचे शंकू उघडून त्यांतील बीजुके बाहेर काढून घेता येऊ शकतात. गोल्डफिंच पक्ष्याची चोच सुईसारखी असून तिच्या साहाय्याने तो फुलांतील मकरंद खाऊ शकतो.

फ्रिंजिलिडी कुलातील चार उपकुलांपैकी जिओस्पायझिनी या उपकुलामध्ये चार्ल्स डार्विन यांना गालॅपागस बेटांवर आढळलेल्या फिंच पक्ष्यांचा समावेश होतो. हे फिंच पक्षी डार्विन यांच्या क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) सिद्धांताच्या दृष्टीने आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सवयींच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या पक्ष्यांचा अभ्यास केल्यावर डार्विन यांना असे आढळले की, प्रत्येक बेटांवर दहा-बारा जातींचे फिंच पक्षी असून प्रत्येक जातीचा आहार निरनिराळा आहे. यांच्या काही जाती जमिनीवरच्या मोठ्या बिया काही मध्यम आकारमानाच्या बिया तर इतर काही अगदी छोट्या बिया खातात काही जाती झुडपांच्या बिया खातात, तर काही जातींची उपजीविका कीटकांवर चालते. काही जाती फुलांतील मकरंद तर दुसऱ्या काही जाती कॅक्टसांच्या पानांतील रस खाऊन राहतात. अशा प्रकारे निरनिराळ्या जातींच्या फिंच पक्ष्यांनी आपले अन्न मिळविण्याचे निरनिराळे मार्ग अवलंबिले व पर्यायाने त्यांच्यात वेगवेगळे फरक पडत जाऊन नवनवीन जाती निर्माण झाल्या. यावरून येथील सर्व जाती या एकाच जातीपासून निर्माण झाल्याचे अनुमान डार्विन यांनी केले.[⟶ क्रमविकास].

फिंच पक्ष्यांचे अन्न मिळविण्याचे इतरही मार्ग आहेत. काही फिंच पक्षी इग्वाना या सागरी सरड्यासारख्या प्राण्याच्या पाठीवर बसून त्याच्या पाठीवरील गोचिड्या खातात. काही फिंच पक्षी मोठ्या सागरी पक्ष्यांच्या पाठीवर बसून त्याला चोच मारून बाहेर येणारे रक्त पितात. जिओझापिझा स्कॅंडेन्स व वुडपेकर फिंच (कॅमाऱ्हिंकस पॅलिडस) या दोन जातींचे फिंच पक्षी ‘आयुध वापरणारे’ म्हणून प्रसिद्ध आहेत. यापैकी पहिला फिंच पक्षी झाडाची फांदी वा काटेरी काडी चोचीत धरतो व तिच्या साहाय्याने फटीत दडून बसलेली अळी बाहेर काढतो व खातो. अळी खाताना चोचीतील काडी पायांत धरतो. एक अळी खाऊन झाल्यावर पुन्हा काडी चोचीत धरून दुसरी अळी बाहेर काढून खातो. अशा तऱ्हेने पोट भरेपर्यंत तो अळ्या बाहेर काढीत राहतो. वुडपेकर फिंच हा सुतार पक्ष्याने झाडात केलेली छिद्रे कीटकांसाठी धुंडाळतो. मात्र त्याची जीभ आखूड असल्याने त्याला किटक पकडता येत नाही. त्यामुळे तो चोचीत काटा पकडून तो छिद्रात घालतो. कीटक काट्याला टोचला जाऊन काट्याबरोबर बाहेर येतो व मग हा पक्षी कीटक खातो. या आयुधामुळे चोचीच्या कार्याचा आवाका वाढून ते परिणामकारकही होते. अशा प्रकारे प्राप्त परिस्थितीमध्ये जिवंत राहण्यासाठी हे पक्षी अन्न मिळविण्याचे विविध मार्ग शोधून काढतात व त्यांतूनच त्यांचा क्रमविकास होत राहतो.

भारतामध्ये तांबूस शेपटीचा फिंच-लार्क (ॲमोमॅनीस फीनिक्युरस) व काळ्या पोटाचा फिंच-लार्क (एरेमोटेरिक्स ग्रिसिया) या दोन जातींचे फिंच पक्षी आढळतात. यांपैकी पहिला गंगेच्या उत्तरेस तर दुसरा भारतीय उपखंडात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र आढळतो. हे दोन्ही पक्षी चिमणीएवढे असतात. तपकिरी रंगाचा बुलफिंच हिमालयात व चीनमध्ये आढळतो.

इनामदार, ना. भा. ठाकूर, अ. ना.