चौधारी घेवडा (शेंगा)घेवडा, चौधारी : ( हिं. चार कोनी सेम इं. विंग्ड-गोवामॅनिला-प्रिन्सेस-बीन लॅ. सोफोकार्पस टेट्रॅगोनोलोबस कुल-लेग्युमिनोजी). भाजीकरिता सर्वत्र सामान्यपणे पिकविली जाणारी ही वेल मूलतः मॉरिशस बेटातून आणली गेली आहे. हिची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ गोकर्ण, ⇨ अगस्ता, ⇨ घेवडा  इत्यादींच्या कुल आणि उपकुल (लेग्युमिनोजी-पॅपिलिऑनेटी) वर्णनात दिल्याप्रमाणे असतात. शेतात आणि बागेत ही वेल चढविण्यास बळकट कुंपण किंवा मांडव लागतो. पाने संयुक्त, त्रिदली फुले मोठी, निळी, क्वचित पांढरी व फळे (शिंबा, शेगा) गर्द हिरवी, १५–२० सेंमी. लांब असतात शेंगेवर चार धारा असून प्रत्येक धारेच्या पंखाला मऊ त्रिकोनी दाते असतात. शेंगांची आणि मांसल मुळांची भाजी करतात. ब्रह्मदेशात भरपूर पिकवतात.

परांडेकर, शं. आ.

यांची लागवड इतर भाजीपाल्याच्या पिकांप्रमाणे मोठ्या प्रमाणावर करीत नाहीत. बी पावसाळ्यात पेरतात आणि पीक थंडीत येते. आळी करून त्यांत बी लावतात. बी उगवून येऊन वेल वाढू लागले म्हणजे ते कुंपणावर अगर मांडवावर चढवून पसरू देतात. लागणीपासून चार-पाच महिन्यांनी कोवळ्या शेंगांचा पहिला तोडा घेता येतो. शेंगा जसजशा तयार होतात तसतशा त्या काढून घ्याव्या लागतात. एकदा लावलेला वेल दोन वर्षे टिकतो. वेलाच्या मशागतीप्रमाणे आणि विस्ताराप्रमाणे दर आठवड्यास दर वेलापासून सु. २५ शेंगा मिळतात.

भोसले, रा. जि.