कीटोनांचे आधिक्य : (कीटोनरक्तता, कीटोसीस). शरीरात वसेचा अपचय (जटिल पदार्थांचे साध्या पदार्थांत रूपांतर करून ऊर्जा उत्पन्न करणारी क्रिया) होत असताना तिचे शेवटचे स्वरूप कार्बन डाय-ऑक्साइड व जल असे होऊन त्या स्वरूपात वसा (स्निग्ध पदार्थ) उत्सर्जित (शरीराबाहेर टाकणे) होते. या अपचय क्रियेमध्ये बिघाड झाल्यास किंवा वसा-अपचय अधिक प्रमाणात होऊ लागल्यास वसेपासून वसाम्ले अधिक प्रमाणात तयार होतात. या वसाम्लांचा अपचय होत असताना मधल्या अवस्थेत जे पदार्थ तयार होतात त्यांना ‘कीटोने’ असे म्हणतात[→ कीटोने]. ही कीटोने शरीरात साठून राहणे या अवस्थेला कीटोनाचे आधिक्य असे म्हणतात. वसाअपचयाचे हे कार्य यकृतात चालते. या विकारात उच्छ्‌वासाला कीटोनांमुळे फळांसारखा गोड वास येणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, अशक्तता, डोकेदुखी, शिसारी, अस्वस्थता, ओकाऱ्या होणे इ. लक्षणे आढळतात.

कीटोनांमध्ये मुख्यतः तीन रासायनिक पदार्थाचा अंतर्भाव होतो : (१)ॲसिटोॲसिटिक अम्ल, (२) बीटा-हायड्रॉक्सिब्युटिरिक अम्ल व (३) ॲसिटोन.

वसाम्लापासून प्रथम यकृतातील एंझाइमाच्या (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थाच्या) क्रियेने ॲसिटोॲसिटिक अम्ल तयार होते आणि त्याच्यापासूनच पुढचे दोन पदार्थ उत्पन्न होतात. या क्रियेचे चित्रण खाली दर्शविले आहे.

28

प्राकृतावस्थेत (शरीराच्या सर्वसाधारण अवस्थेत) रक्तातील कीटोनांचे प्रमाण अत्यल्प म्हणजे सु. दर १०० मिली. मध्ये १ ते ३ मिग्रॅ. एवढेच असून त्यांचा दैनिक उत्सर्ग सु. ०·३ ग्रॅ. असतो. काही अप्राकृत अवस्थांमध्ये हे प्रमाण अनेक पटींनी वाढते. दीर्घकाल लंघन, मधुमेह, ज्वर, गर्भिणीविषबाधा (गर्भाच्या अस्तित्वामुळे गरोदर स्त्रीला होणारी विषबाधेची लक्षणे) व  ⇨ गलगंड  या विकारांत कीटोनांचे रक्तातील आणि त्यामुळे मूत्रातील प्रमाण वाढलेले आढळते. मूत्रपरीक्षेमध्ये कीटोनांचे आधिक्य ओळखण्याची विशिष्ट पद्धत आहे  [→ मूत्र].

मधुमेहात इन्सुलीन कमी पडल्याने कार्बोहायड्रेट म्हणजे शर्करासमान पदार्थांचा पूर्ण अपचय होऊ शकत नाही. त्यामुळे शरीरव्यापारासाठी संचित वसेचा उपयोग अधिकाअधिक होत जातो. असा अधिक उपयोग होऊ लागल्याने वसा-अपचयाच्या मधल्या अवस्थेतील ही कीटोने अधिक तयार होऊन त्यांचे रक्तातील आणि मूत्रातील प्रमाणही वाढलेले आढळते. मधुमेहातील एक उपद्रव म्हणजे अम्लरक्तता (रक्तातील अम्लाचे प्रमाण जास्त असणे) तिच्या सुरुवातीपासून कीटोन मूत्रात उत्सर्जित होऊ लागते. म्हणून या उपद्रवाचे निदान करण्यास मूत्रातील कीटोनाची परीक्षा फार उपयुक्त आहे.

कीटोनांच्या आधिक्यामुळे अनेक वेळा मधुमेहाच्या रोग्याला बेशुद्धावस्था येते. तिला मधुमेहजन्य बेशुद्धी म्हणतात. अशा प्रकारची बेशुद्धी बहुधा निदान न झालेल्या मधुमेहाच्या रोग्यात आढळते. कीटोनांच्या आधिक्यामुळे चयापचयात्मक (शरीरातील रासायनिक आणि भौतिक घडामोडींमध्ये निर्माण होणारी) अम्लरक्तता वाढते, कोशिकांतर्गत द्रव आणि विद्युत् प्रवाहामुळे ज्यांचे घटक अलग होतात असे) पदार्थ कमी होतात. ओकाऱ्यांमुळे शरीर-द्रवांच्या उत्सर्जनात भर पडते. अशा अवस्थेत बाहेरून दिलेल्या इन्सुलिनाच्या क्रियाशीलतेवर गंभीर परिणाम होतो. अशा रोग्याला ताबडतोब रुग्णालयात ठेवणे अत्यंत जरुरीचे असते. रोग्याच्या पूर्वेतिहासावरून मधुमेहजन्य बेशुद्धी असल्याची खात्री असल्यास १०० एकक विद्राव्य इन्शुलिन ताबडतोब इंजेक्शनाने जीवरासायनिक तपासणी करण्यापूर्वीच देतात. रुग्णालयात दाखल होताच सुषिरीद्वारे (रबरी किंवा धातूच्या नळीद्वारे) मूत्र काढून त्याची तपासणी करणे, नीलेतून पाणी व लवण यांचे मिश्रण ठराविक गतीने सुरू करणे, जठरातील साचलेले द्रव्य काढून टाकणे, संसर्गित रोग उदा., फोड, विद्रधी (गळू) वगैरे असल्यास त्यावर इलाज करणे, रक्तातील शर्करेचे प्रमाण तपासणे इ. इलाज करतात.

बेशुद्धीविरहित कीटोनांच्या आधिक्याचे दोन प्रकार आढळतात : (१) सौम्य व (२) गंभीर. सौम्य प्रकारात मूत्र तपासणीत नायट्रोप्रुसाइड परीक्षा व्यक्त (पॉझिटिव्ह) मिळते आणि फेरिक क्लोराइड परीक्षा अव्यक्त मिळते. अशा रोग्याची इन्शुलिनाची दररोजची मात्रा एक तृतीयांश ते एक चतुर्थांशाने वाढवून काही दिवसांनंतर पुन्हा मूत्र तपासणी करतात. गंभीर प्रकारात नायट्रोप्रुसाइड परीक्षा व फेरिक क्लोराइड परीक्षा दोन्ही व्यक्त मिळतात. अशा रोग्याला रुग्णालयात ठेवूनच योग्य ते इलाज करतात [ → मधुमेह]

ढमढेरे, वा. रा.

पशुंतील कीटोनांचे आधिक्य : जनावरांमध्ये अस्सल जातीच्या धष्टपुष्ट दुधाळ गाईंना व्याल्यानंतर थोड्याच दिवसांत हा रोग होण्याचा संभव असतो. कारण गाईला आपले स्वत:चे आणि गर्भाचे पोषण, प्रसूतीचा त्रास व नंतर दूध देणे ह्या सर्वांचा एकदम ताण पडल्यामुळे आणि त्या प्रमाणात शरीराचे योग्य पोषण न झाल्यामुळे हा विकार होतो. दुभत्या गाईच्या शरीरातील सर्व अवयव कार्यक्षम व सुस्थितीत राहण्याकरिता तिच्या रक्तात भरपूर द्राक्षशर्करा (ग्लुकोज) असावी लागते. अयोग्य व अपुरे अन्न देण्याने तिच्या अन्नातील लवणांचे व वसेचे योग्य मिश्रण आणि पचन होत नाही व त्याचा परिणाम कीटोन द्रव्ये वाढण्यात होतो. दुसरे कारण व्यालेल्या गाईने जास्त दूध द्यावे म्हणून तिला प्रथिनयुक्त पदार्थ (उदा., हरभरा, तूरडाळ) ही जास्त प्रमाणात दिली आणि चारा-वैरण ही योग्य प्रमाणात दिली नाही तरीही हा रोग उद्‍भवतो.

लक्षणे : व्यालेली गाय ५-६ दिवसांत आजारी होते. चारा खाणे, रवंथ करणे बंद होते. दुधाचे प्रमाणही कमी होते. मलावरोध होतो. श्वासोच्छ्वास जलद होतो, झटके व आचके येतात. ताप मुळीच नसतो, उलट, कान व पाय गार पडतात. श्वासास व लघवीस कीटोनांचा विशेष प्रकारचा गोड वास येतो.

व्यवच्छेदक निदान : जनावर एकदम आजारले, मलूल होऊन दूध देणे बंद झाले म्हणजे गर्भाशय किंवा हृदयासारख्या नाजूक अवयवास विकार झाल्याचा संशय येतो. दुग्धज्वर वा कॅल्शियमन्यूनता या रोगांचीही पुष्कळ लक्षणे अशीच असतात. पण ह्या रोगाने आजारी झालेल्या जनावराची लघवी तपासली असता कीटोने आढळते. तयार मिळणाऱ्या ॲसिटेटाच्या गोळीवर रोग्याची दोन थेंब लघवी टाकल्याबरोबर पांढरी गोळी गुलाबी रंगाची होते.

चिकित्सा : रोग्यास स्वच्छ, आरामशीर गोठ्यात एका बाजूस ठेवतात. द्राक्षशर्करा टोचतात. पचण्यास हलकी चारा-वैरण व आंबोणातून भरपूर गूळ देतात. द्राक्षशर्करेत कॉर्टिसोन मिसळून दिल्यास रोगी लवकर बरा होतो.

खळदकर, त्रिं. रं.