द्रविड (द्राविड) संस्कृति : भारतातील एक संस्कृती. भारतीय इतिहासात आणि संस्कृतीत द्रविडांचा मोठा वाटा आहे. सर्वसाधारणपणे भारतीय संस्कृतीची संमिश्र वाढ मुख्यत्वेकरून आर्य आणि द्रविड यांमधील संपर्क आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांमुळे झाली, हे आता सर्वमान्य झाले आहे.

द्रविड संस्कृतीचे अभ्यासक, द्रविड हे कोण होते आणि त्यांचा भारताशी संबंध कसा आला, ह्याचा प्रथम विचार करतात. द्रविडांचे मूलस्थान, त्यांचा वांशिक एकजिनसीपणा आणि त्यांचे भारतात झालेले आगमन ह्यांबद्दल विविध मते मांडली जातात. सध्याची भारतातील लोकवस्ती पाहता द्रविड वंशाचे व संस्कृतीचे लोक दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने सापडतात. असे असेल, तरी ते तेथे कसे आले व कोठून आले यांबद्दल मात्र निर्णायक मत कोणीच देऊ शकत नाही, काही भाषाशास्त्रज्ञ तर द्रविड हा भाषासमूह आहे. मानववंश नाही, असे मत मांडतात. द्रविड वंश हा भारतातील सर्वांत सुसंस्कृत प्राचीन मानववंश आहे, असे एक मत मांडले जाते. काहींच्या मते द्रविड हे एकसंघ नसून त्यांच्या दोन शाखा होत्या. तमिळ बोलणारे आणि मुंडारीसारख्या भाषा बोलणारे कोलेरियन ह्या द्रविड वंशाच्या दोन शाखा पूर्वी मानल्या जात परंतु आता हे मत ग्राह्य धरण्यात येत नाही. काहींच्या मते द्रविड वंशाचे लोक ऑस्ट्रेलियातील आदिवासींशी संलग्न असले पाहिजेत, तर काहींच्या मते वर उल्लेखिल्याप्रमाणे ते मूळचेच भारतीय असावेत. सर्वसाधारणपणे द्रविड वंशीय लोक कमी उंचीचे, काळ्या वर्णाचे, काळ्या डोळ्याचे, लांबट डोक्याचे, रुंद नाकाचे, जाड ओठांचे, कुरळ्या केसांचे असे मानले जातात. परंतु शतकानुशतके चाललेल्या वंशसंमिश्रणाच्या प्रक्रियेत द्रविडांची अथवा आर्यांची शारीर, वांशिक अथवा सांस्कृतिक वैशिष्ट्ये अबाधित व अविकृत राहिली असतील, असे मानणे योग्य ठरणार नाही.

काहींच्या मते दक्षिण भारतामध्ये जे नवाश्मयुगीन संस्कृतीचे लोक होते, त्यांचे वंशज म्हणजे द्रविड होत. द्रविड लोक भारताबाहेरून येऊन भारतात स्थायिक झाले सिंधू संस्कृतीचे लोक द्रविड असावेत द्रविड भूमघ्य समुद्राच्या पूर्वेकडील भागातून अथवा पश्चिम आशियातून येऊन दक्षिण भारतात स्थायिक झाले महाश्मयुगीन संस्कृतीशी त्यांचा संबंध होता, अशी विविध मते नमूद केलेली आढळतात. इतर काही द्रविड हे आर्यपूर्व भारताचे मूळचे रहिवासी असल्याचे मत मांडतात. याचा पुरावा म्हणून वैदिक संस्कृतीवरही द्रविड भाषांचा परिणाम झाल्याची उदाहरणे दाखवतात. कॉल्डवेलच्या मते द्रविड हे तुरानियन वंशाचे असून ते दुसरीकडून भारतात आले. या सर्व मतांतून कोणतेही एक मत निर्णायक म्हणून ग्राह्य धरणे सोपे नाही. द्रविड संस्कृतीची प्राचीनता, द्रविड भाषांची वैशिष्ट्ये आणि द्रविडांची वांशिक वैशिष्ट्ये ह्यांबद्दल आता फारसे दुमत नाही. काही वर्षांपूर्वी द्रविड संस्कृतीचे मूल्यमापन यथार्थपणे झालेले नव्हते. भारतीय संस्कृतीत जे जे उत्कृष्ट, ते ते सर्व आर्य संस्कृतीचे असे मानण्याकडे कल होता. आता हे मत ऐतिहासिक दृष्ट्या, भाषाशास्त्रीय दृष्ट्या, तद्वतच वंशशुद्धतेच्या दृष्टीने अग्राह्य ठरले आहे.

भारतामध्ये चार मुख्य भाषिक वंश मानण्यात येतात आणि त्यांतील द्रविड भाषावंश महत्त्वाचा मानला जातो. या भाषेच्या वंशाचे लोक मुख्यत्वेकरून दक्षिण भारतात आढळतात. परंतु भारतीय जीवनाचा शेती हा पाया असल्याने अशा प्रकारच्या परंपरागत आणि मूलभूत आर्थिक जीवनामध्ये निरनिराळ्या मानवी वंशांचा व जातिजमातींचा संकर व्हावा, यात अस्वाभाविक काहीच नाही. असे असूनही दख्खन आणि दक्षिण भारतामध्ये द्रविड भाषागट प्रामुख्याने आढळून येतो. द्रवि़डांची प्राचीन भाषा जरी तमिळ आहे, तरी कन्नड, मल्याळम्, तेलुगू त्याचप्रमाणे कुई–गोंडी, कुई आणि ओराडम हेही द्रविड भाषेचे आविष्कार मानले जातात. त्याचप्रमाणे मध्य, उत्तर आणि पश्चिम भारतातही द्रविड भाषा–संस्कृतीचे काही छोटे छोटे गट आढळून येतात, असे भाषाभिज्ञांचे मत आहे. बलुचिस्तानातील ब्राहुई भाषा गट हा द्रविड भाषेचाच एक आविष्कार मानला जातो. या दृष्टीने पाहता द्रविड भाषा व संस्कृती प्राचीन काळी भारतात बऱ्याच मोठ्या प्रदेशात प्रचलित होती, असे मानण्यास पुरावा मिळतो. याशिवाय उत्तर भारतातील अनेक स्थलनामांतून अवशिष्ट स्वरूपात दिसून येणाऱ्यात द्रविड भाषिक संज्ञा, वैदिक वाङ्‌मयामध्ये उल्लेखिलेल्या अनेक अनार्य जमाती, खुद्द वैदिक संस्कृतीतही आढळून येणारे द्रविड भाषिक धागे, हिंदू धर्माच्या कर्मकांड, विचार, आचार व दैवतशास्त्र यांत आढळून येणारा द्रविड संस्कृतीचा प्रभाव ह्यांवरून आर्यपूर्व काळातही ही संस्कृती भारतात स्थिर, प्रभावी व विस्तृत स्वरूपात होती असे दिसते.


 आर्यपूर्वकाळातील द्रविड संस्कृतीचे स्वरूप सर्व भारतभर एक जिनसी होते किंवा काय, याची पूर्ण कल्पना करता येत नाही. सिंधू संस्कृतीमध्ये द्रविड संस्कृतीचे प्रतिबिंब काही बाबतींत पहावयास मिळते असे मानले, तर मात्र इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकामध्ये द्रविड संस्कृती ही पूर्णतया नागरी संस्कृती होती, असेच मानावे लागेल परंतु याबाबत मतभेद आहेत व या रहस्याचा उलगडा सिंधू संस्कृतीच्या मुद्रांवर आढळून येणाऱ्या लिपीच्या वाचनानंतरच होऊ शकेल. ह्या संबंधात फादर हेरास ह्यांनी मांडलेल्या मताचा उल्लेख करणे इष्ट ठरेल. त्यांच्या मते सिंधू संस्कृतीच्या मुद्रांवरील लिपी हे तमिळचे प्राचीन स्वरूप होय परंतु हे मत अद्याप फारसे ग्राह्य मानण्यात येत नाही. याउलट, सिंधू संस्कृतीच्या लिपीपासूनच ब्राह्मीचा उगम झाला, असे मत मांडणारेही काही तज्ञ आहेत. सिंधू संस्कृती जर द्रविड संस्कृतीचे प्राचीन रूप मानले, तर हे रूप पुरंदर इंद्राच्या आधिपत्याखाली भारतात येणाऱ्या आर्यांनी विरूप केले, असे काहीचे मत विचारात घेणे अवश्य ठरते. भारतात शिरणाऱ्या आर्यांना त्यांच्या आधीपासून भारतात राहणाऱ्या दास, दस्यू व निषाद ह्यांचे अस्तित्व प्रत्ययास आले असले पाहिजे. दास, दस्यू हे केवळ भारतातच होते असे नाही, तर ते पूर्व इराण, अफगाणिस्तान, वायव्य व पश्चिम भारत, आणि संभवतः गंगेचे खोरे इतक्या विस्तृत प्रदेशांत विखुरले असावेत.

हे दास, दस्यू अथवा आर्यपूर्व द्रविड असोत अगर नसोत, परंतु ह्यांची संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण होती. तिचा उगम भारताबाहेर भूमध्य समुद्राच्या पूर्वेच्या भागात झाला, असे एक मत नमूद केलेले आहे. सिंधू संस्कृतीतील मानवी सांगड्याच्या अभ्यासातही मेडिटरेनियन वंशाचे लोक अधिक प्रमाणात तेथे असल्याचे आढळून आले आहे. या लोकांच्या सुसंस्कृत जीवनद्धतीचा प्रभाव भटक्या आर्यांवर पडला यात काहीच शंका नाही. याचाच अर्थ असा की, द्रविडांचे मूलस्थान कोणतेही असो, भारतात तरी हे लोक आर्यपूर्व आहेत असे म्हणावे लागते. ह्यांचा आर्य धर्माशी आणि संस्कृतीशी मनोहर मिलाफ झाला. हे द्रविड लोकसुद्धा अत्यंत पुढारलेले होते. शैव पंथ आणि योगमार्ग हे सिंधू संस्कृतीचे, म्हणजेच पर्यायाने द्रविड संस्कृतीचे, वैशिष्ट्य होय. सिंधू संस्कृतीमध्ये ज्या मातृदेवतांच्या मूर्ती सापडलेल्या आहेत, त्यांवरून प्राचीन संस्कृतीचे लोक मातृदेवता आणि पितृदेवता ह्यांच्या रूपाने जीवोत्पत्तीच्या आणि विश्वाच्या कल्पनांची मांडणी करण्याइतके प्रगत होते असे दिसते. याउलट, आर्यांमध्ये पृथ्वीमाता व द्यौष्णिता अशा तऱ्हेच्या अस्पष्ट निसर्गदेवतांच्या कल्पनांची मांडणी केलेली आढळते.

द्रविड संस्कृतीच्या विकासातील सर्व दुवे जुळवता येत नाहीत. द्रविड संस्कृतीतील तमिळ ही इतरांपेक्षा सर्व प्राचीन भाषा मानली जाते. तमिळ अथवा द्रविड हे प्राचीन द्रमिल अथवा द्रमिळ ह्या मूळ शब्दांची नंतरच्या काळातील रूपे होत, असे मानले जाते. आर्यपूर्व लिसियन लोक मेडिटरेनियन विभागामध्ये राहत असत. हे लोक स्वतःला ‘त्रिमिली’ असे म्हणवून घेत. ह्या शब्दाचेच द्रमिळ–तमिळ हे रूप असावे–असेही एक मत आहे. यातूनच इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकाच्या मध्यास तमिळ असे रूप प्रचलित झाले असावे, असे मानले जाते.

द्रविड संस्कृतीमध्ये तमिळ, तेलुगू, मल्याळम्, कन्नड इ. भाषा बोलणाऱ्यांचा समावेश होतो. परंतु ह्या सर्वांमध्ये तमिळ भाषेच्या आद्य शब्दसमुच्चयामध्ये जे वैशिष्ट्यपूर्ण शब्द सापडतात त्यांवरून कॉल्डवेल ह्यांनी प्राचीन द्रविड संस्कृती किती प्रगत होती, ह्याचे विश्लेषण केले आहे. ते म्हणतात, “प्राचीन द्रविडांत राज्यसंस्था होती. राजे भरमक्कम सुसंरक्षित वास्तूंमध्ये राहून छोट्या छोट्या विभागांवर राज्य करीत असत. प्राचीन द्रविडांमध्ये अक्षरवटिका प्रचलित असून ती टोकदार उपकरणाने पानांवर कोरली जाई. अशा अनेक लिखित पानांचे एक पुस्तक तयार होत असे. देवाचे अस्तित्व ते मानीत व त्याला ‘को’ म्हणजे राजा म्हणत. देवांकरिता ते देवालयेही बांधीत. त्यांच्यामध्ये कायदेपद्धती आणि परंपरा ह्या दोन्हीही प्रचलित होत्या….त्यांच्यामध्ये कथिल, शिसे आणि जस्त ह्यांशिवाय इतर धातूंचाही वापर होता…..औषध–पद्धती, नगरे व ग्रामे, नावा आणि जहाजे ह्या सर्वांची माहिती त्यांना होती. शेतीची कला त्यांना उत्तम प्रकारे अवगत होती. धनुष्यबाण, भाले आणि तलवारी ह्यांचा ते वापर करीत असत. सूतकताई, विणकाम आणि रंगकाम ह्यांची माहितीही त्यांना होती. ते उत्कृष्ट मृत्पात्रेही करीत असत”.


 अशा तऱ्हेची प्रगत संस्कृती असलेल्या द्रविडांचा आर्यांवरही प्रभाव पडावा हे साहजिक आहे. हिंदू परंपरेच्या धर्मग्रंथांचे आगम आणि निगम असे दोन विभाग पडतात. तज्ञांच्या मते आगम धर्मातील कित्येक धार्मिक विधी द्रविड संस्कृतीच्या प्रभावामुळे आर्य धर्मामध्ये शिरले. पूजेमध्ये फुले वाहणे, दीपारती करणे आणि देवापुढे बली देणे ह्या बाबी, मद्य आणि मांस, होमातील अग्निमुखाने आकाशस्थ देवांना पाठवण्याच्या कल्पनेपेक्षा वेगळ्या आहेत तरीही त्या आता हिंदू धर्मामध्ये मान्यता पावल्या आहेत. तीच बाब पूजा करण्याची. काहींच्या मते द्रविड ‘पू’ म्हणजे ‘फुले’ ह्या शब्दापासून पूजा हा संस्कृतेतर शब्द संस्कृत भाषेत आला असावा कारण ‘पूज’ हा धातू किंवा तत्सम वा तद्धव शब्द कुठल्याही इंडो–यूरोपीय भाषांमध्ये सापडत नाही. आर्यांची होमपरंपरा विशिष्ट वर्गातच सीमित राहिल्याने द्रविडांची पूजेची कल्पना जास्त लोकप्रिय झाली असावी. धार्मिक विधी आणि पूजाप्रकार ह्यांशिवाय द्रविडांच्या अनेक देवदेवतांही हिंदू धर्मामध्ये समाविष्ट केल्या जाऊन मान्यता पावल्या. हिंदू धर्मात नंतरच्या काळामध्ये मानाची जागा मिळालेल्या देवदेवता मूलतः द्रविडांच्या असाव्यात, असे आता सर्वसामान्यपणे मानले जाते. शिव व उमा ह्या मूळच्या आर्य धर्मीय देवता आहेत, असे आता मानले जात नाही. वैदिक धर्मातील देवता मुख्यत्वेकरून निसर्गदेवता होत्या, याउलट उमा आणि शिव ह्या देवता मेडिटरेनियन वंशीय लोकांच्या म्हणजेच द्रविडांच्या मातृदेवता आणि पितृदेवता ह्यांचेच आर्यांनी मान्यता दिलेले उदात्तीकृत रूप होय. काहींच्या मते उमा म्हणजे मेडिटरेनियन लोकांची मा देवता आणि शिव म्हणजेच तमिळ शिवम्‌, ह्या तमिळ शिवनचा अर्थ तांबडा असा होतो. ह्या वैशिष्ट्यपूर्ण गुणाचे प्रत्यंतर ‘नीललोहित’ ह्या शिवाच्या वैदिक संज्ञेमध्ये पहावयास मिळते. अशाच तऱ्हेच्या तुलनात्मक संज्ञा दुर्गा, विष्णू, कुमार, गरूड, गणेश, हनुमान इ. देवतांच्या बाबतींत विशिष्ट गुणांनुसार मिळू शकतात.

द्रविड संस्कृतीचा प्रभाव आर्य अथवा हिंदू धर्मीयांवर इतर बाबतींतही पडला. आर्यांचे मूळ अन्न यव, मांस आणि मदिरा तर सध्या हिंदूंचे अन्न तांदूळ, गहू, कडधान्य, तेल इ. आहे. आर्य लोकरीचे कपडे वापरीत, तर सध्याचा भारतीय वेश कापसाच्या कपड्यांचा आहे. आधुनिक भारतीय आर्यभाषांतील वाक्यरचना वैदिक संस्कृतातील वाक्यरचनेपेक्षा द्रविड भाषांतील वाक्यरचनेशी जास्त मिळतीजुळती आहे. त्याचप्रमाणे लग्नकार्यामध्ये अथवा इतर मंगलप्रसंगी नारळाचा, नागवेलीच्या पानांचा आणि सुपारीचा वापर हिंदू धर्मामध्ये आर्येतरांपासून आला, असे मानले जाते.

भारतीय वेश, भाषा, भाषांचे व्याकरण, देवदेवता, पूजाप्रकार आणि सामाजिक चालीरिती ह्यांमध्ये काहीसा द्रविड संस्कृतीचा ठसा उमटलेला आहे. हा ठसा जास्त दृग्गोचर कसा होत गेला, ह्याचे सलग दिग्दर्शन करता येत नाही. आर्य धर्मावर इतका प्रभाव पाडणारे आणि मूलतः भारताच्या विस्तृत भूभागावर पसरलेले द्रविड दक्षिण भारतामध्येच कसे एकत्रित झाले आणि राहिले, यांवरही फारसा प्रकाश पडत नाही. परंतु आज तरी ते दक्षिणेत दिसतात आणि ते ज्या स्वरूपात दिसतात, त्यांवरून त्यांच्या द्रविड संस्कृतीवरही आर्य संस्कृतीचा प्रभाव बराचसा पडलेला आहे, हेही उघड आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील आजची द्रविड संस्कृती जशी पूर्णांशाने द्रविड संस्कृती मानता येणार नाही तशीच भारतात इतरत्र पूर्णपणे आर्य संस्कृती प्रचलित आहे, असेही मानण्याचे कारण नाही.

या सरमिसळीतूनच द्रविड संस्कृतीचे प्राचीन स्वरूप जाणावयाचे असल्यास प्राचीन ऐतिहासिक काळातील तमिळ वाङ्‌मयात जी माहिती मिळते, तिचा उपयोग करणे इष्ट ठरते. आर्य आणि द्रविड यांचा सांस्कृतिक संगम कसा व कोणत्या स्वरूपात झाला, याची अत्यंत स्थूल रूपरेषा आतापर्यंतच्या विवेचनात मांडली गेलेली आहे. या संकराचा सलग इतिहास फारसा ज्ञात नाही, हेही वर उल्लेखिले आहे. याशिवाय दाक्षिणात्य द्रविड भाषांमध्ये तमिळ ही सर्वप्राचीन मानली जाते. यामुळे प्राचीन तमिळ वाङ्‌मय आणि तमिळ भाषेतील शिलालेखांमध्ये प्रतीत होणारी द्रविड संस्कृती कशी होती, ह्याचे विवेचन पुढीलप्रमाणे : दक्षिणेमध्ये म्हणजेच द्रविड संस्कृतीच्या प्रदेशात इसवी सनाच्या सुरुवातीपासून आणि त्याच्या आधी तीन-चार शतके पांड्य, चेर, चोल इ. राजवंश होऊन गेले. पांड्यांचा उल्लेख मीगॅस्थीनीझने केलेला आहे, तर चेरांचा उल्लेख अशोकाचा शिलालेख आणि प्राचीन तमिळ वाङ्‌मय यांत येतो. चोल राज्याच्या दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशात पांड्यांचे राज्य होते. चेरांच्या ताब्यात कोंगू देशाचा बराचसा भाग होता. चोलांची राजधानी उरगपुर (उरय्यूर), सध्याचे कावेरीच्या तीरावरील तिरुचिरापल्लीच्या अगदी जवळ होते पांड्यांची मदुराई, चेरांची वंजी येथे होती. नंतरच्या काळात पल्लवांची राजधानी कांची येथे होती. त्यांच्या प्रदेशाला तोडमंडलम् असे म्हणत.


 या राजांचा, राज्यांचा, संस्कृतींचा आणि इतर सर्वसामान्यांच्या जीवनाचा वृत्तांत आपल्याला प्राचीन तमिळ वाङ्‌मयामध्ये पहावयास मिळतो. विद्वान व कवि ह्यांची एक सभा पांड्य राजाच्या आश्रयाखाली मदुराई येथे काम करीत होती. या सभेने वाङ्‌मयीन निकष आणि रचना ह्यांबद्दल प्रमेये ठरविली होती. ह्या संस्थेलाच संघम् अशी संज्ञा होती. अशा प्रकारच्या तीन संघम्-सभा होऊन गेल्या. यांतील तिसऱ्या संघम्‌चा काल इसवी सनाचे पहिले–दुसरे शतक असा सर्वसाधारणपणे मान्य करण्यात आला आहे परंतु सर्वच्या सर्व संघम्‌कालीन वाङमय आज उपलब्ध नाही. त्यावरून प्राचीन ऐतिहासिक काळातील द्रविड संस्कृतीची माहिती मिळते. दक्षिणेत सुप्रसिद्ध असलेली शिलप्पधिकारम् आणि मणिमेखलै ही काव्येही संघम् वाङ्‌मयामध्ये अंतर्भूत केली जातात. संघम् वाङ्‌मयाची अखेर इ. स. दुसऱ्या शतकामध्ये झाली असे समजले जाते. संघम् वाङ्‌मयाचे युग संपल्यानंतरचा सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास फारसा ज्ञात नाही [⟶ संघम् साहित्य]. कारण पल्लवांच्या मध्यकाळात दक्षिणेत संस्कृतमधील विद्यांच्या व संस्कृत साहित्याच्या प्रभावाची म्हणजे संस्कृतीकरणाची मोठी लाट उसळल्याने मूळची द्रविड संस्कृती शुद्ध स्वरूपामध्ये फारशी पहावयास मिळत नाही. सहाव्या शतकामध्ये कळभ्रांच्या स्वाऱ्यांमुळे सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय विस्कळितपणा निर्माण झाला. यानंतरचा दक्षिण भारताचा, म्हणजेच द्रविड संस्कृती कोणत्या तरी स्वरूपामध्ये जिवंत ठेवणाऱ्यांचा, इतिहास ज्ञात असल्याने तो येथे देण्याची आवश्यकता नाही.

संघम् वाङ्‌मय, ताम्रपट, शिलालेख इत्यादींवरून प्राचीन ऐतिहासिक काळातील दक्षिणेतील राज्यवस्था कशी होते, ह्याची बरीचशी माहिती मिळते. जुन्या तमिळमधील प्रचारातील शब्दसंहती अभ्यासल्यास राज्यसत्ता व कायदेकानू त्या काळी अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळतो. राजसंस्था अस्तित्वात असल्याचा पुरावा संघम् वाङ्‌मयातही दिसून येतो. राजा एकतंत्री असे, ह्यात काही शंका नाही परंतु त्याला सल्ला देण्याकरिता मंत्रिमंडळही असे. राजाचा खजिना जमीन–महसूल, निरनिराळ्या जकाती व युद्धांतील लूट ह्यांनी भरला जाई. अशा तऱ्हेची राज्यव्यवस्था ग्राम हे घटक धरून अंमलात आणली गेली होती. सर्वोच्च अधिकार राजाचा असला, तरी तमिळ वाङ्‌मयामध्ये सभामंडपांचा उल्लेख असल्याने गावकऱ्यांनी एकत्र जमण्याच्या ग्रामपरिषद अथवा पंचायती यांसारखी काही व्यवस्था असावे असे दिसते. परंतु ग्रामसभेवर एक राज्यसभा असे आणि तिला न्यायदानाचे विस्तृत अधिकार असावेत.

संरक्षणात रक्षकांशिवाय सैन्याचाही वाटा मोठा असे. युद्धतंत्रही प्रगत स्वरूपाचे होते. संघम् वाङमयातील एका प्राचीन काव्यामध्ये प्राकार, खंदक, गोपुरे, बुरूज इत्यादींचे उल्लेख आलेले आहेत. सैन्यात चार दले होती त्यांमध्ये घोडे आणि हत्ती ह्यांना बरेच महत्त्व होते. संघम् वाङ्‌मयातील एका महाकाव्यात एका प्रचंड सैनिकी तळाचे वर्णन आले आहे. त्यानुसार सैन्याची छावणी विविध तऱ्हेच्या तंबूंची उभारलेली असे. राजाकरिता वेगळा विभाग असून त्यावर हत्यारी स्त्रियांचा पहारा असे. युद्धामध्ये पराजितांची जनावरे अथवा त्यांचे नगारे विजयचिन्हे म्हणून पळविले जात असत.

आधीच्या काळामध्ये जरी ग्रामसभा होती, तरी नंतरच्या काळामध्ये ही व्यवस्था बदलली असे दिसते. उत्तरेतील आर्यांच्या संपर्कामुळे नंतरच्या काळामध्ये ऊर, सभा आणि नगरम् अशा तीन परिषदा अस्तित्वात आल्या. यांतील सभा ही फक्त ब्राह्मणांची असे. ऊर गावातील सर्व भूधारकांची असे, तर नगरम् ही बहुधा व्यापाऱ्यांची असे. ह्याचाच अर्थ असा, की नंतरच्या काळामध्ये जात, शेती आणि आर्थिक स्थिती ह्यांना प्राधान्य मिळाले. ते काही जरी असले, तरी ग्रामपरिषदेकडे पाणिपुरवठा, कालवे ,रस्ते आणि विद्यालये व देवालये यांची बांधणी त्याचप्रमाणे कर गोळा करणे इ. महत्त्वाची कामे असत. ग्रामाशिवाय राष्ट्र, नाडू, कोट्टम, विषय, वळनाडू अथवा मंडलम् इ. राज्यकाराभाराचे विविध घटक होते. ह्या सर्वांवर राजातर्फे देखभाल करण्याकरिता अधिकारी नेमलेले असत. ह्याशिवाय बेलिफ, खजिनदार, भूमापन अधिकारी इ. प्रकारचे आधिकारी नेमले जात.

द्रविडांची कुटुंबपद्धती मातृसत्ताक होती, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. परंतु पल्लवकालापासूनच राजानंतर त्याचा थोरला मुलगा गादीवर येण्याची पद्धती अनुसरली जात असल्याचा पुरावा मिळतो. राजकन्यांचे स्थान काय असावे, याबद्दल प्राचीन द्रविड वाङ्‌मयात माहिती मिळत नाही. परंतु राज्यकारभारात नसले, तरी इतर क्षेत्रांमध्ये राजाइतकेच राणीलाही महत्त्व असे, असे दिसते.


सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे चित्र प्राचीन संघम् वाङ्‌मयामध्ये बरेचसे मिळते. त्यानुसार प्राचीन द्रविड हे निरनिराळ्या काळांमध्ये व्यापारात, जलवाहतुकीत आणि शिक्षणामध्ये प्रगत होते. संघम् वाङ्‌मयामध्ये मात्र भारतीय आर्य आणि द्रविड ह्यांच्या संस्कृतिक संपर्काचा पुरावा मिळतो. ह्यामुळे प्राचीन द्रविड ह्यामुळे प्राचीन द्रविड संस्कृतीच्या समाज रचनेचे विशुद्ध स्वरूप मांडणे काहीसे कठीण आहे. ह्याचे प्रत्यंतर संघम् वाङ्‌मयामध्ये उल्लेखिलेले निरनिराळे राजेरजवाडे कौरव–पांडवांशी संबंध लावतात यावरून येते. प्राचीन ऐतिहासिक तमिळ वाङ्‌मयामध्ये समाजाची रचना निरनिराळ्या गटांमध्ये झाल्याचे दिसून येते. आर्य पूर्व काळातील समाजाचे चित्र एका कवितेमध्ये आढळून येते. यानुसार तुडियन्‌, पाणन्, पळइयन् आणि कडंबन्‌ ह्या चार कुडींचा (गट) समाज बनलेला होता. या कवितेत असेही सांगितले आहे, की युद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या सैनिकापेक्षा भाताच्या लोंब्यांनी पूजा करण्यास योग्य असा दुसरा श्रेष्ठ देव नाही. अर्थात हीही कल्पना ऐतिहासिक दृष्ट्या नंतरच्या काळातील वाटते.

प्राचीन संघम् वाङ्‌मयावरून द्रविड प्रदेशातील लोकांच्या वेशभूषेची आणि आहाराची कल्पना करता येते. पुरुष दोन वस्त्रे वापरीत. केस कापून ठाकठीक केले जात. कपड्यांना खळ लावून कडकपणा आणला जाई आणि स्त्रीपुरुष विविध प्रकारचे अलंकार वापरीत असत. धान्य, मांस आणि मासे त्याचप्रमाणे निरनिराळ्या भाज्या, दूध आणि दुधाचे पदार्थ लोकांच्या आहारात होते. तांबूलभक्षणाचीही प्रथा द्रविडांत होती, असे दिसते. मनोविनोदनासाठी पोहणे अगर मित्रमंडळीसह सहलीस जाणे, निरनिराळ्या तऱ्हेची तंतुवाद्ये वाजविणे, चित्रकला व नृत्यकला इ. कलाची उपासना करणे या प्रकारांचा अवलंब केला जाई.

अशा तऱ्हेने समृद्ध जीवन जगणारे प्राचीन द्रविड हे सुस्थितीत असावेत. संघम् वाङ्‌मयातील एका काव्यामध्ये शुभ मुहूर्तावर बाधलेल्या एका राजवाड्याचे वर्णन आहे. त्यानुसार राजवाड्याला अनेक दालने व मजलेही असत. आतील भाग उत्कृष्टपणे सजविलेला असे. याउलट गरीबांची घरे मात्र साधी असत. त्यांमध्ये कातड्याचे अथवा चटईचे बिछाने असत. श्रीमंत लोक गरिबांकरिता अन्नछत्रही उघडीत असत. सर्वसाधारणपणे सामाजिक नीतीमत्ता उच्च दर्जाची होती, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही.

संघम् वाङ्‌मयावरून तत्कालीन द्रविड देशामध्ये शेती आणि व्यापारउदीम संघटित स्वरूपात चालत असावा, असे दिसून येते. भारतात आलेले आर्य हे भटक्या वृत्तीचे आणि मांसाहारी होते. परतु भारतात आलेल्या आर्यांच्या अहारपद्धतीमध्ये द्रविडांमुळे बदल झाला. शेती हा द्रविडांचा एक प्रगत व्यवसाय होता. प्राचीन तमिळ काव्य तिरुक्कुरळमध्ये शेतकरी हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असल्याचे नमूद केलेले आहे. ऊस, कापूस, आणि काळी मिरी ह्यांचेही उत्पादन होई. द्रविडांच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर रेशीम व लोकर ह्यांचेही उत्पादन होत असे. ह्याशिवाय नंतरच्या काळामध्ये द्रविड संस्कृतीच्या प्रदेशातून सागरी व्यापार मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याचा उल्लेख मिळतो. संघम् वाङ्‌मयामध्ये निरनिराळ्या बंदरांचा आणि व्यापारी वस्तूंचा जो उल्लेख आढळतो, त्याला इसवी सनाच्या पहिल्या–दुसऱ्या शतकांतील ग्रीक व रोमन प्रवाशांच्या वृत्तांतांत पुष्टी मिळते याशिवाय बैलगाड्यांचाही वापर जमिनीवरच्या वाहतुकीसाठी केला जात असे. मलबारचा किनारा व आग्नेय आशियातील देशांशी केला जाणारा सागरी व्यापार, तमिळ वा द्रविड भाषिकांच्या हाती प्राचीन काळी होता. निरनिराळ्या जहाजांचे उल्लेख प्राचीन तमिळ वाङ्‌मयामध्ये आढळून येतात. असे असले, तरी प्राचीन वाङ्‌मयातून द्रविडांच्या सर्व प्रकारच्या सांस्कृतिक हालचालींची माहिती मिळते असे मात्र नव्हे. लग्नसंस्थेबद्दल जी माहिती वाङ्‌मयातून मिळते ती संपूर्ण नाही आणि जी मिळते तीसुद्धा आर्यसंपर्कपूर्व द्रविडांची कितपत असेल, ह्याबद्दल शंकाच वाटते. अशा तऱ्हेच्या पुराव्यावरून मिळणारी माहिती विशुद्ध द्रविड संस्कृतीची असेल, असे म्हणणे धाडसाचे होईल. म्हणून विवाह संस्थेसंबधी पुढे दिलेली माहिती केवळ प्राचीन द्रविडांबद्दलचीच होती, असे मानण्याचे कारण नाही. वाङ्‌मयीन पुराव्यावरून विवाहित स्त्री ‘ताली’ वा मंगळसूत्र यावरून ओळखली जात असे. विवाहाच्या आधी सधवा व सापत्य स्त्रिया वधूला स्नान घालीत असत. विवाहाशी संलग्न असणाऱ्या इतर धार्मिक विधींचा उल्लेख मात्र अजिबात मिळत नाही.


उमा आणि शिव व इतर अनेक देव प्राचीन द्रविडांचे असूनही ते आर्य धर्मात प्रतिष्ठा पावले, हे आता सर्वमान्य झालेले आहे. यानंतरच्या आर्य–द्रविड संपर्कामध्ये आर्यांच्या तद्वतच द्रविडांच्याही धर्मकल्पना परस्पर सांस्कृतिक देवाणघेवाणींमुळे बदलल्या हे उघड आहे. ह्यामुळे संघम् वाङ्म‌यामध्ये वैदिक आणि द्रविड ह्या दोन्ही धर्मांची सरमिसळ झाल्याचे चित्र आपणास पहावयास मिळते. शेषशायी विष्णू, अर्धनारीश्वर, कृष्ण आणि सुब्रह्मण्य ह्यांचाही उल्लेख या वाङ्‌मयात मिळतो. ब्राह्मण समाज घरात निरनिराळ्या तऱ्हेचे यज्ञ करीत असे, अशा प्रकारचे उल्लेख संघम् वाङ्‌मयात मिळतात. पिंडदान, यज्ञ, ब्राह्मणांना दान ह्या गोष्टी वैदिक धर्माचा द्रविडांवर सुरुवातीस किती प्रभाव होता हे दाखवितात परंतु द्रविड भूमीतील सर्वसामान्यांचा धर्म मात्र ग्रामदेवता आणि जादूटोणा यांवरच आधारित होता असे दिसते. घरावर लिंबाची पाने लावणे आणि मुलावरून मोहऱ्या ओवाळून टाकून डोळ्यात काजळ घालणे, अशा तऱ्हेच्या चाली लोकांमध्ये प्रचलित होत्या. मणिमेखलै काव्यात मृतांना जाळणे अथवा त्यांचे अवशेष मोठमोठ्या मृत्कुंभात ठेवून पुरणे, ह्या दोन्ही चालींचा उल्लेख आढळतो. अशा तऱ्हेची सरमिसळ इसवी सनाच्या सुरुवातीपासूनच असल्याचे वाङ्‌मयीन पुराव्याने सूचित केलेले आहे. याचा अर्थ प्राचिन द्रविडांच्या धार्मिक कल्पना ह्या काळाच्या बऱ्याच आधी संकरित होत गेल्या. द्रविड भूमीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सु. आठव्या–नवव्या शतकांमध्ये तिरुज्ञानसंबंधर, तिरुनावुक्करसर (अप्पर), सुंदरर आणि माणिक्कवाचगर ह्यांनी भक्तिसंप्रदायाची शिकवण द्रविड भूमीमध्ये पल्लवित केली परंतु ही कथा नंतरच्या काळातील होय.

प्राचीन द्रविडांचे वाङ्‌मय काय होते, किती होते आणि कशा स्वरूपाचे होते ह्यांबद्दलची सविस्तर माहिती मिळत नाही. संघम् वाङ्‌मयाचे वैशिष्ट्य असे की, प्रत्येक कवितेच्या शेवटी कवीचे नाव आणि कविता निर्मितीची पार्श्वभूमी लिहिलेली आढळते. ह्या माहितीचे सत्यान्वेषण करणे हे एक अवघड काम आहे. सुमारे बाराव्या शतकात कंबन हा तमिळमधील महाकवी होऊन गेला. परंतु संघम् वाङ्‌मयावर संस्कृत वाङ्‌मयीन कल्पना व ध्येये ह्यांचा प्रभाव निश्चितपणे आढळून येतो. त्यामुळे प्राचीन द्रविडांचे वाङ्‌मय कोणते आणि त्याचे खास द्रविड स्वरूप कसे होते, हे अलगपणे सांगता येणे कठीण आहे. प्रगत आणि विकसित संस्कृती असणाऱ्या द्रविडांना विविध कलांचे ज्ञान असावे, असे अनुमान करता येते. राजप्रासादाची रचना कलात्मक, उपयुक्त आणि संरक्षणात्मक होती, ह्याचाही उल्लेख केलेला आहे. सिंधू संस्कृतीप्रमाणे अनेक मजले घरे , उत्कृष्ट स्नानगृहे, योजनापूर्वक बांधलेली गटारे, संडास वा शौचकूप, धान्याची गुदामे ही या काळातील वास्तुशास्त्राची वैशिष्ट्ये होत परंतु नंतरच्या काळातं ही परिस्थिती पालटली. आर्य संस्कृतीचा प्रभाव जसजसा वाढत गेला, तसतशी द्रविडांची अशी वैशिष्ट्ये अविशुद्ध स्वरूपात फारशी राहिली नसावीत. इ. स. पू. दुसऱ्या–पहिल्या शतकांतील काही उत्कीर्ण लेख तमिळ भाषेत असले, तरी ते ब्राह्मी लिपीत लिहिलेले आहेत, ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे.

संघम् वाङ्‌मयामध्ये उत्कृष्ट वास्तू, प्रासाद, बाजार, देवालये इत्यादींची विलोभनीय वर्णने येत असली, तरी त्यांचे अवशेष फारसे उपलब्ध झालेले नाहीत. इसवी सनाच्या सहाव्या शतकापर्यंतच्या विविध प्रकारच्या वास्तुतंत्राचे अवशेष फारसे मिळत नाहीत. द्रविड भूमीत सध्या जी शैलोत्कीर्ण मंदिरे, इतर देवालये आणि ब्राँझच्या मूर्ती सापडतात, त्या सर्व सहाव्या शतकानंतरच्या आहेत. मामल्लपुरम् येथील शैलोत्कीर्ण मंदीरे, कांचीची बांधलेली देवालये आणि चोल काळातील ब्राँझच्या मूर्ती सुविख्यात आहेत. किंबहुना देवालयांच्या वास्तुशैलीत द्रविड शैली महत्त्वाची आहे. ह्या द्रविड शैलीचे देवळातील खांब पल्लवकालीन मंदिरांमध्ये पहावयास मिळतात. द्रविड पद्धतीच्या मंदिरांची शिखरे उत्तर भारतातील नागर पद्धतीच्या शिखरांपेक्षा अगदी वेगळी आहेत. याशिवाय मंडप आणि गोपुरे हेही द्रविड वास्तुशैलीचे वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार मानले जातात.

द्रविड संस्कृताच्या विविध अंगांची विस्कळित माहिती आणि तुटक पुरावा व त्याबरोबर द्रविड भूमीचे झपाट्याने झालेले आर्यीकरण, ह्यांमुळे द्रविड संस्कृतीचे सारसर्वस्व सापडणे सहजसाध्य नाही.

संदर्भ : 1. Chatterji, S. K., Dravidian Origins and the Beginnings of Indian Civilization : Modern Review, Dec.1924.

           2. Guha, B. S. Racial Elements in the Population, Oxford pamphlet on Indian Affairs, No. 22, Bombay, 1944.

           3. Majumder, D. N. Races and Cultures of India, Bombay, 1961.

           4. Majumdar, R. C., Ed. The Vedic Age, Bombay, 1957.

           5. Risley, H. H. The People of India, London,1915.

देव, शां. भा.