बायव्हाल्‌व्हिया: (शिंपाधारी प्राणी). मॉलस्का (मृदुकाय) संघातील प्राण्यांचा एक वर्ग. या वर्गातील बहुतेक प्राणी समुद्रात व काही गोड्या पाण्यात राहतात. किनाऱ्यापासून सु. १,४५० मी. इतक्या खोलीच्या समुद्रात ते आढळत असले, तरी उथळ समुद्रात त्यांची संख्या व विविधता ही सर्वांत अधिक असतात. २५० मी. पेक्षा अधिक खोल पाण्यात ते विरळाच असतात. मनुष्याचे अन्न म्हणून त्यांचा अतिशय उपयोग होते. मोतीही त्यांच्यापासून मिळतात. त्यांच्या कवचापासून पूर्वीच्या काळात तयार झालेल्या चुनखडकांच्या प्रंचड राशी अनेक देशांत आढळतात.

बायव्हाल्‌व्हिया शरीर एका द्विपुट म्हणजे दोन शिंपांच्या कवचाने झाकलेले असते. त्यांपैकी एक शिंप शरीराच्या उजव्या व दुसरी डाव्या बाजूस असते. पृष्ठीय (वरच्या किंवा उत्तर) काठावर असणाऱ्या बिजागरीने व बंधनीने शिंपा जोडल्या गेलेल्या असतात. बिजागरी असलेल्या काठाच्या समोरील म्हणजे अधर (खालच्या) काठाशी शिंपा अलग होऊन कवच उघडू शकते व अभिवर्तनी (एक भाग दुसऱ्या भागाजवळ आणणाऱ्या) स्नायूंच्या साहाय्याने ते मिटू शकते.

आ.१ सागरी बायव्हाल्‌व्हियांच्या राहणीची काही उदाहरणे : (१) फोलॅस : खडक पोखरणारा (२) ऑस्ट्रिया : कालव, खाद्य व खडकासारख्या आधारावर वाढणारा (३) माया (४) टॅगेलस (५) एन्सिस : पूर्णपणे चिखलातील किंवा वाळूतील बिळात राहणारे (६) योल्डिया : अंशतः चिखलातील किंवा वाळूतील बिळात राहणारे (७) न्यूक्युला : चिखला-वाळूच्या पृष्ठावरून रांगत जाणारे (८) व्हीनस : चिखला-वाळूच्या पृष्ठभागातून नांगराच्या फाळाप्रमाणे रांगत जाणारे (९) मायटिलस : एखाद्या आधारास सूत्रगुच्छाने चिकटलेला (१०) टेरेडो : लाकडात बीळ पोखरून राहणारा (११) पेक्टेन : शिंपा हालवून थोडे पोहू शकणारा.

बहुतेक बायव्हाल्व्हिया स्वच्छंद हिंडू शकतात. पाण्याच्या तळाशी असलेल्या वाळू-मातीच्या पृष्ठभागात नांगराच्या फळाप्रमाणे पाय खुपसून किंवा पृष्ठावरून रांगत-सरकत आपले भक्ष्य मिळवीत ते जातात. पेक्टेनासारखे काही थोडे बायव्हाल्‌व्हिया आपल्या शिंपा हालवून काही थोडे क्षण पोहू शकतात. काही बायव्हाल्‌व्हिया बिळे करून राहतात व त्यांचे सर्व शरीर किंवा त्याचा काही भाग पुरला गेलेला असतो. टेरेडो वंशाचे प्राणी लाकडात बिळे करतात व लाकडी जहाजास त्यांचा उपद्रव होतो [⟶ टेरेडो]. लिथोफॅगा, सॅक्सिकॅव्हा यांसारखे काही वंश खडकात बिळे करून राहतात. बिळे करून राहणारे प्राणी फारसे हिंडत नाहीत. बायव्हाल्‌व्हियांचा तिसरा प्रकार अचल प्राण्यांचा. अचल प्राणी लहानपणी किंवा सर्व आयुष्यभर एकाच जागी खिळून असतात. त्यांची एक शिंप खडकाला किंवा इतर आधाराला चिकटलेली असते. काही वंशांचे प्राणी एका शृंगमय पदार्थाच्या सुतासारख्या धाग्यांच्या जुडग्याने (त्याला सूत्रगुच्छ म्हणतात) एखाद्या आधाराला चिकटविलेले असतात. पायाच्या पश्च भागावर असलेल्या ग्रंथीतून दाट स्त्राव बाहेर पडून व तो घट्ट होऊन सूत्रगुच्छ तयार होतो.

आ. २. मेरेट्रिक्साच्या कवचाच्या पृष्ठीय भागाचे दृश्य : (१) अग्र कडा, (२) पश्च कडा, (३) डावी शिंप, (४) उजवी शिंप, (५) ककुद, (६) ल्युन्यूल, (७) बंधनी. अग्र कडेपासून पश्च कडेपर्यंतच्या अंतरास कवचाची लांबी व तुटक रेषेने दाखविलेल्या अंतरास कवचाची जाडी म्हणतात.

बहुतेक बायव्हाल्‌व्हियांच्या दोन्ही शिंपा सारख्याच आकाराच्या व आकारमानाच्या असतात. एकाच जागी राहणाऱ्या वंशापैकी काही एकाच शिंपेवर पडून राहतात व त्यांची ती शिंप अधिक मोठी असते. कालवांसारख्या काही वंशांची एक शिंप खडकासारख्या आधारावरच स्त्रावाने तयार होते आणि ती अनियमित आकाराची व दुसऱ्या, मोकळ्या शिंपेपेक्षा मोठी असते.

शरीर वर्णन : बायव्हाल्‌व्हियांच्या मऊ शरीराच्या उत्तर पृष्ठापासून त्वचेसारखा जो प्रावार (शिंपेच्या लगेच खाली असणाऱ्या त्वचेच्या बाहेरच्या मऊ घडीचे आवरण) वाढलेला असतो त्याच्या दोन पाली (भाग) झालेल्या असतात आणि त्यांपैकी एक उजव्या व दुसरी डाव्या शिंपेत अस्तरासारखी चिकटलेली असते. प्रावाराच्या आत शिंपेत जी पोकळी असते तिला प्रावारगुहा म्हणतात.

प्राण्याच्या शरीराचे आंतरांग प्रावारगुहेच्या मध्यभागी असते व ते उत्तर कडेपासून खाली लोंबत असते. त्याने शिंपांच्या आतील सु.अर्धी जागा व्यापिलेली असते. अंतस्त्य (अंतर्गत इंद्रियांच्या) पुंजाच्या अधर पृष्ठापासून वाढलेले एक मांसमय व परशूच्या किंवा नांगराच्या फाळाच्या आकाराचे इंद्रिय असते, त्याला पाय म्हणतात. रांगत सरकत जाण्यासाठी किंवा पाण्याच्या तळाशी असलेला गाळ पोखरण्यासाठी किंवा क्वचित उडी घेण्यासाठी पायाचा उपयोग होतो. मायटिलसासारख्या वंशातील प्राण्यांचे पाय बारीक असतात व कालवांसारख्या प्रचलन न करू शकणाऱ्या वंशांना पाय नसतो. आंतरांगाच्या उजव्या व डाव्या बाजूला आणि तिच्या व शिंपांच्या मधे असणाऱ्या जागेत, उत्तर भागापासून खाली लोंबणारे क्लोम (कल्ले) असतात. क्लोमावरील रोमकांनी (राठ बारीक केसांनी) पाण्याचा प्रवाह निर्माण केला जातो आणि शिंपांच्या आतील भागात पाण्याचे परिसंचरण (अभिसरण) घडून येते.

आ. ३. मेरेट्रिक्साच्या ढाब्या शिंपेच्या आतील भागाचे दृश्य : (१) अग्र कडा, (२) पश्च कडा, (३)पृष्ठीय कडा, (४) अधर कडा, (५) प्रावाररेषा, (६) प्रावारखात, (७) बंधनी. (८) अग्र अभिवर्तनी व्रण, (९) पश्च अभिवर्तनी वर्ण, (१०) बिजागरी व तिचे दात. अग्र कडेपासून पश्च कडेपर्यंत अंतरास कवचाची लांबी व पृष्ठीय कडेपासून अधर कडेपर्यंतच्या अंतरास कवचाची रुंदी किंवा उंची म्हणतात.

दोन शिंपांतील प्रावाराचे काठ एकमेकांस नुसता स्पर्श करून असतात किंवा चिकटलेले असतात व सामान्यतः त्यांच्या पश्च (मागच्या) कडांत दोन फटी असतात. त्यांपैकी एका म्हणजे अधर फटीच्या वाटे बाहेरील पाणी प्रावारगुहेत येते. त्या पाण्यामुळे प्राण्यास आवश्यक अशा ऑक्सिजनाचा व अन्नाचा पुरवठा होतो. दुसऱ्या म्हणजे उत्तर फटीतून पाणी प्रावारगुहेतून बाहेर जाते व मल घेऊन जाते. कित्येक वंशांतील प्राण्यांच्या प्रावारांच्या पश्च कडांत नुसत्या फटी असण्याऐवजी तेथील प्रावाराच्या दोन नळ्या तयार झालेल्या असतात. त्यांना निनाल म्हणतात. त्यांच्यापैकी अधर निनाल (अंतर्वाही म्हणजे पाणी आत आणणारा निनाल) सामान्यतः मोठा असतो. त्याला क्लोम (किंवा ब्रँकियल) निनाल व उत्तर निनालाला गुदनिनाल (अपवाही म्हणजे पाणी व मल बाहेर नेणारा निनाल) म्हणतात. हे निनाल सुटे वा एकमेकांस चिकटलेले असतात व आखूड किंवा लांब असतात. कित्येक वंशांतील निनालांची लांबी कवचाच्या लांबीच्या चौपट असते. आखडून कवचाच्या आत घेता येतील असे निनाल व त्यासाठी आवश्यक ते स्नायू कित्येक वंशांत असतात. खुल्या पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचा बाहेरील पाण्याशी अनायासे संबंध होऊ शकतो पण बिळे करून राहणाऱ्यांचा तसा सबंध घडवून आणण्याचे कार्य निनालांकडून होते.

आ. ४ टेलिना टेन्युइसाच्या डाव्या शिंपेचे व अंतरांगाचे सोपे करून दाखविलेले दृश्य (उजवी शिंप व प्राघार-पाली दाखविलेल्या नाहीत पाण्याच्या ओघाची दिशा बाणांनी दाखविली आहे) : (१) अपवाही निनाल, (२) पश्च अभिवर्तनी स्नायू, (३) निलय, (४) क्लोम, (५) ओष्ठीय स्पर्शक, (६) अग्र अभिवर्तनी स्नायू, (७) मुख, (८) पाय किंवा पाद, (९) आंतरांग गुच्छिका, (१०) गुदद्वार, (११) अंतर्वाही निनाल.

आ. ५ बायव्हाल्वियांच्या अनुप्रस्थ (आडव्या) छेदांचे व्यवस्था चित्र : (अ) प्रोटोब्रँकियांचे क्लोभ (आ) फिलिब्रँकियांचे क्लोम (इ) यूलॅमेलिब्रँकियांचे क्लोम (ई) सेप्टिबँकियांचे क्लोम. प्रत्येक चित्रात १ या आकड्याने क्लोम दर्शिवेले आहेत.

बायव्हाल्‌व्हियांना डोके नसते. त्यांचे तोंड अग्रभागी व शरीराच्या मध्यरेषेवर असते. तोंडाच्या दोन्ही बाजूंना दोन पानासारखे, ओष्ठीय स्पर्शक (स्पर्शज्ञान, शोध घेणे, पकडणे किंवा चिकटणे इ. कार्यांकरिता उपयोगात आणली जाणारी लांब, सडपातळ व लवचिक इंद्रिये) असतात. तोंडात रेत्रिका (शृंगी वा कायटिन या कठिण पदार्थाच्या दातांसारख्या संरचनांनी युक्त अशी कानशीसारखी फीत) नसते. पाण्याच्या प्रवाहाबरोबर येणाऱ्या सूक्ष्मकणरूपी अन्नावर शरीराचा निर्वाह होते. तोंडाच्या द्वारे पुढे गेल्यावर आखूड ग्रसिका (घशापासून जठरापर्यंत अन्न वाहून नेणारी नलिका) व तिच्यानंतर गोलसर जठर लागते. त्याच्यापुढे लांब आंत्र (आतडे) सुरू होते व ते अनेक वळसे घेत पायामधून पार झाल्यावर ह्रदयावरणातून जाते व निलयाने (ह्रदयातील शुद्ध रक्ताच्या कप्प्याने) वेढले जाऊन पुढे जाते व पश्च अभिवर्तनी स्नायूच्या उत्तर भागाशी त्याचे गुद असते. यांना दोन अलिंदे (अशुद्ध रक्ताचे कप्पे) व एक निलय असणारे स्पष्ट स्पंदनशील ह्रदय असते व ते एका मोठ्या ह्रदयावरणी गुहेने वेढले गेलेले असते. ह्रदयाशी जोडलेल्या राहिण्या व नीला यांच्या तंत्रातून (व्यूहातून) रंगहीन रक्ताचे अभिसरण होते. ह्रदय बिजागरीच्या खाली जवळच असते. नळीसारख्या दोन वृक्क ग्रंथी (शरीरातील निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणारी इंद्रिये) ह्रदयावरणाखाली असतात. तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) सामान्यतः गुच्छिकांच्या (ज्यांच्यापासून तंत्रिका तंतू निघतात अशा तंत्रिका कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांच्या) तीन जोड्यांचे असते. त्यांपैकी एक जोडी तोंडाच्या बाजूशी असते. ती दुसऱ्या एका व पायात असलेल्या जोडीशी आणि तिसऱ्या एका व पश्च अभिवर्तनी स्नायूच्या खाली असलेल्या जोडीशी तंत्रिका तंतूंनी जोडलेली असते. या गुच्छिकांपासून निघाणाऱ्या तंत्रिका स्नायू, क्लोम इत्यादींकडे गेलेल्या असतात. प्रावाराच्या कडांशी व विशेषतः अधर निनालांवर स्पर्शग्राही इंद्रिये असतात. काही वंशांतील प्राण्यांना डोळे असतात व ते प्रावाराच्या पालींच्या अग्र काठावर असतात.

आ. ६. सॉलनो कर्टसस्ट्रिगिलॅटसाचे निनाल (सागरी प्राणी) : (१) डावीशिंप, (२) उजवीशिंप, (३) पाद, (४) अंतर्वाही निनाल.

बहुसंख्य बायव्हाल्‌व्हिया एकलिंगी पण काही उभयलिंगी (नर व मादीची इंद्रिये एकाच प्राण्यात असलेले) असतात व काही आपले लिंग आलटून पालटून बदलू शकतात. बहुसंख्य बायव्हाल्‌व्हियांचे अंडाणू (स्त्रीजनन कोशिका) व शुक्राणू (पुंजनन कोशिका) कवचाबाहेरील पाण्यात टाकले जातात व तेथेच त्यांचे निषेचन (फलन) होते. यदृच्छया निषेचन झाल्यावर युग्मनजापासून (फलन झालेल्या अंडाणूपासून) पक्ष्माभिका (ज्यांच्या लयबद्ध फटकाऱ्यांनी प्राण्याला स्थलांतर करता येते वा द्रव पदार्थात प्रवाह उत्पन्न करता येतात अशा केसांसारख्या वाढी) असणारा व काही अंशी ॲनेलिडांच्या (वलयी प्राण्यांच्या) ट्रोकोफोर डिंभाशी साम्य असणारा एक पटिका डिंभ (व्हेलिजर डिंभ) तयार होते [⟶डिंभ]. लौकरच त्याच्याच कवच ग्रंथी तयार होते व तो पाण्याच्या तळाशी जातो आणि बायव्हाल्‌व्हियाचे एक नवे बारीक पिल्लू तयार होते. गोड्या पाण्यातील यूनिओनिडी कुलातील प्राण्यांचे जनन मात्र एक वेगळ्याच व असामान्य रीतीने होते.

कोणत्याही शिंपेच्या उत्तर काठीशी चोचीसारखा किंवा टोक असलेला भाग असतो, त्याला ककुद म्हणतात. काही वंशांचे ककुद बारीक व इतरांचे मोठे असतात. वंशपरत्वे ते सरळ, अग्र दिशेस वळलेले किंवा क्वचित पीळ पडलेले असतात. कित्येक कवचांच्या ककुदाच्या अग्र भागात एक लांबट वाटोळा व इतर कित्येकांच्या ककुदाच्या पश्च भागात तसाच पण अधिक लांबट खळगा असतो. त्यांना अनुक्रमे ल्युन्यूल व एस्कचॉन अशी नावे आहेत. कित्येक वंशांत अशा दोन्ही प्रकारचे खळगे असतात. अशा खळग्यांचा अर्धा भाग एका व अर्धा दुसऱ्या शिंपेवर असतो. कित्येक शिंपांचे ककुद बिजागरीच्या काठाजवळच असतात पण काहींचे ककुद व बिजागऱ्या कमीअधिक अंतरावर असतात व शिंपा जुळलेल्या असताना ककुद दूर राहतात. अशा कवचांचे ककुद व बिजागऱ्या यांच्यामध्ये जो त्रिकोणाकार चपटा भाग असतो, त्याला क्षेत्र म्हणतात. शिंपेचा अधर काठ ज्याचा पाया आहे व ककुदाच्या चोचीच्या जागी शिरोबिंदू आहे असा त्रिकोण काढला आहे अशी कल्पना केली, तर तो सामान्यतः विषमभुज असतो, म्हणून शिंप विषमभुज आहे असे म्हणतात. बहुतेक शिंपा विषमभुज असतात. शिरोबिंदूंपासून त्रिकोणाच्या पायाला लंब रेषा काढली तर निर्माण होणाऱ्या दोन त्रिकोणांपैकी लहान अग्र व मोठा पश्च भागात असतो.

आ. ७ लाकूड पोखरून बीळ करून राहणाऱ्या टेरेंडोच्या शरीराची पूर्णाकृती (सागरी प्राणी).

बायव्हाल्‌व्हियांना शिंपा उघडणारे स्नायू नसतात. ते काम बंधनींमुळे घडून येते. बंधनीचे आतील व बाहेरची असे दोन प्रकार असतात. बाह्य बंधनी शृंगमय पदार्थाची असते आणि ती बिजागरीच्या कडेशी व

सामान्यतः कुकुदाच्या पश्च भागी बसविलेली असते. अंतस्थ बंधनी ही समांतर धागे जुळून तयार झालेल्या गठ्ठ्यांची व रबराप्रमाणे स्थितिस्थापक (विकृती निर्माण करणारी प्रेरणा काढून घेतल्यावर मूळ स्थिती परत प्राप्त होणारी) असते. ती बिजागरीच्या पट्टीत असलेल्या खळग्यात बसविलेली असते. दरवाजाच्या बिजागरीजवळ रबराचा तु क डा ठेवून दरवाजा मिटावा तशी अंतस्थ बंधनी असते व कवच मिटलेले अस ता ना ती दाबली गेलेली असते. ती स्थितिस्थापक असल्यामुळे कवच उघडण्याकडे तिची प्रवृत्ती असते. बाह्य बंधनीचे काम कंसावर स्प्रिंगेप्रमाणे होते. शिंपा मिटलेल्या असताना ती वाकलेली असते पण संधी मिळताच ताठ होण्याची तिची प्रवृत्ती असते. प्राण्याने आपले अभिवर्तनी स्नायू सैल सोडले की, कवच उघडते. काही वंशाच्या कवचात वरील दोहोंपैकी एकच बंधनी असते.

आय ८ पेक्टेन : (फक्त एकच म्हणजे पश्च अभिवर्तनी स्नायू, बिजागरी सरळ, तिला पंखासारखे फाटे असतात सागरी प्राणी) उजवी शिंप : (अ) आतील बाजू (आ) बाह्य बाजू. अधिक जवळ असतो. एकच स्नायू असणाऱ्या बायव्हाल् व्हियांना मोनोमायरिया व दोन स्नायू असणाऱ्यांस डायमायरिया म्हणतात. प्रावाराचे स्नायू शिंपेस जेथे चिकटलेले असतात तेथे रेषेसारखा किंवा अरुंद खोबणीसारखा वण राहत असतो, त्याला प्रावाररेषा म्हणतात. कित्येक शिंपल्यांतली प्रावाररेषा त्यांच्या अधर काठास समांतर अशा मार्गाने एका स्नायुव्रणापासून दुसऱ्या स्नायुव्रणापर्यंत अविचलित मार्गाने गेलेली असते. अशा प्रावाररेषेस साधी किंवा अभिन्न म्हणतात परंतु प्रत्येक शिंपांतली प्रावाररेषा पश्च स्नायू व्रणापाशी जाऊन पोहोचण्याच्या आधी मागे एक वाकण घेऊन नंतर

आ. १० आर्का : (दोन अभिवर्तनी स्नायूंचे व्रण व प्रावाररेषा स्पष्ट आहेत बिजागरी रेषा सरळ, दात पुष्कळ, सारख्या आकारमानाचे व बारीक सागरी प्राणी): (अ) डाव्या शिंपेची आतील बाजू (आ) उजव्या शिंपेची बाह्य बाजू.

आ. ९ मायाटिलस : (सूत्रगुच्छाने लाकडास चिकटून राहतो सागरी प्राणी) : (१) पाद, (२) सूत्रगुच्छ.

काही बायव्हाल्‌व्हियांना दोन व काहींना एकच अभिवर्तनी स्नायू असतो. हे स्नायू शिंपांच्या आतील पोकळीत एका शिंपेपासून दुसरीपर्यंत गेलेले असतात व शिंपेस चिकटलेले असतात त्या जागी त्यांचे वण राहतात. काही शिंपांत असे दोन वण असतात. त्यांपैकी एक अग्र व दुसरा पश्च कडेजवळ असतो. दोन्ही वण सारख्याच आकार मानाचे असतात किंवा पश्च वण अधिक मोठा असतो. काही शिंपात एकच वण असतो. तो शिंपेच्या मध्याजवळ पण सामान्यतः पश्च कडेस अधिक जवळ असतो. एकच स्नायू असणाऱ्या बायव्हाल् व्हियांना मोनोमायरिया व दोन स्नायू असणाऱ्यांस डायमायरिया म्हणतात. प्रावाराचे स्नायू शिंपेस जेथे चिकटलेले असतात तेथे रेषेसारखा किंवा अरुंद खोबणीसारखा वण राहत असतो, त्याला प्रावाररेषा म्हणतात. कित्येक शिंपल्यांतली प्रावाररेषा त्यांच्या अधर काठास समांतर अशा मार्गाने एका स्नायुव्रणापासून दुसऱ्या स्नायुव्रणापर्यंत अविचलित मार्गाने गेलेली असते. अशा प्रावाररेषेस साधी किंवा अभिन्न म्हणतात परंतु प्रत्येक शिंपांतली प्रावाररेषा पश्च स्नायू व्रणापाशी जाऊन पोहोचण्याच्या आधी मागे एक वाकण घेऊन नंतर पुढे गेलेली असते. वळणाच्या अशा आखातासारख्या भा गा ला प्रावारखात म्हणतात. ज्या प्राण्यांना प्रत्याकर्षक (मागे ओढून घेता येणारा) निनाल असतो त्यांच्या प्रावाररेषेला असे आखात असते. प्राण्याला का ही उपद्रव झाल्यावर त्याने आपले निनाल कवचात खेचून घेतले असताना ते जेथे मावत असत ती जागा प्रावारखाताने दर्शविली जाते. प्रावारखात अर्थात कवचाच्या पश्च भागात असते.

आ. ११. ऑस्ट्रिया : (कालव, डावी शिंप, ही अधिक मोठी असून आधाराला चिकटलेली असते फक्त पश्च अभिवर्तनी स्नायू असतो बिजागरी आखूड, तिच्यावर दात नसतात सागरी प्राणी).

आ. १२. बिजागऱ्यांचे काही प्रकार : (अ) न्यूक्युला : [दात संख्येने पुष्कळ व जवळजवळ सारख्या आकाराचे व आकारमानेचे आर्का याच्या आकृतीतील (आ. १०) तसेच दात पहा]: (१) बंधनीचा खळगा (आ) ट्रायगोनिया : (तीन दात खोबणी पडलेले, मधला दात द्विशाखी असतो) : (१) उजवी शिंप, (२) डावी शिंप (इ) स्पाँडीलस : (दात थोडे पण बळकट व सारख्या आकारमानाचे, दातांची स्थाने बंधनीच्या खळग्याशी सममित असतात एका शिंपेचे दात दुसऱ्या शिंपेतील अनुसरून खळग्यात बसतात) : (इ१) उजवी शिंप, (इ२) डावी शिंपः(१) दात, (२) बंधनीचा खळगा (ई) ल्यूसिना : उजवी शिंप (दात संख्येने मोजके आणि निरनिराळ्या आकारांचे व आकारमानांचे एक दात ककुदाच्या जवळच खाली, दुसरा त्याच्या अग्र व तिसरा पश्च भागात) : (१) दात, (२) बंधनी.

शिंपा घट्ट मिटून घेता येतील अशी बिजागरीची रचना असते. ती ज्या प्रक्षेपांची बनलेली असते त्यांना दात म्हणतात. एका शिंपेच्या बिजागरीने दात दुसऱ्या शिंपेच्या बिजागरीच्या दातांच्या मधे बसतील अशी त्यांची स्थाने असतात. शिंपेच्या ज्या भागावर दात असतात, त्याला बिजागरीरेषा म्हणतात. ती सामान्यतः वक्र व क्वचित सरळ असते. कित्येक शिंपांच्या बिजागरी असलेल्या काठाशी उभ्या पत्र्यासारखी पट्टी झालेली असते आणि तिच्यावर दात असतात. तिला बिजागरी पट्टी म्हणतात. बिजागऱ्यांचे वंशपरत्वे अनेक प्रकार आढळतात. त्यांच्यात थोडे किंवा पुष्कळ, लहान किंवा मोठे, नाजूक किंवा बळकट व सारख्याच किंवा निरनिराळ्या आकाराचे व आकारमानांचे दात असतात. काही वंशांतील दात अविकासित असतात व काही थोड्यांत ते नसतातही. बायव्हाल्‌व्हियांचे वंश किंवा जाती ठरविण्यासाठी बिजगाऱ्यांचा निकष म्हणून उपयोगात होत असल्यामुळे त्यांचे सविस्तर अध्ययन करण्यात आलेले आहे पण त्यांचे सूक्ष्म प्रकार ओळखणे हे तज्ञांचेच काम आहे. बिजगाऱ्यांचे काही ठळक प्रकार आ. १२ मध्ये दाखविलेले आहेत.

आ. १३ गोड्या पाण्यातील बायव्हाल्‌व्हियाचे कवच व प्रावार यांचा उभा छेद : (१) परिकवच, (२) प्रचिनाकार स्तर, (३) मुक्ताम स्तर, (४) स्त्रवणाचे मुक्ताम स्तर उत्पन्न करणाऱ्या कोशिका, (५) पक्ष्मामिकामय उपकला.  प्रावाराच्या स्त्रावाने कवच निर्माण झालेले असते. ते सामान्यतःतीन थरांचे बनलेले असते. पृष्ठभागी हिरव्या किंवा तपकिरी रंगाचा व शंखद्रव्य (काँकिओलीन) या शृंगमय पदार्थाचा पातळ थर असतो, त्याला परिकवच किंवा बाह्य त्वचा म्हणतात. परिकवच टिकाऊ नसते व जीवाश्मात (शिळारुप अवशेषात) बहुधा आढळत नाही. आतील दोन थर कॅल्साइट किंवा ॲरॅगोनाइट यांच्या स्वरूपात असणाऱ्या कॅल्शियम कार्बोनेटाचे असतात. परिकवचांच्या आतला थर कॅल्साइटाचा असतो. कार्बनी (सेंद्रिय) पदार्थाचे वेष्टन असलेले कॅल्साइटाचे सूक्ष्म स्तंभ कवचाच्या पृष्ठाला जवळजवळ लंब असतील असे रचले जाऊन हा थर तयार होतो म्हणून त्याला स्तंभी थर म्हणतात.त्याच्या आतील थराची रचना पटलित असते व तो थर मोत्यासारख्या दिसणाऱ्या किंवा चिनी मातीच्या पांढऱ्या भांड्यासारख्या दिसणाऱ्या पदार्थाचा असतो आणि ॲरॅगोनाइटाचे व कार्बनी पदार्थाचे पातळ पापुद्रे एकावर एक रचून तो तयार झालेला असतो. ॲरॅगोनाइटाचे पापुद्रे अतिशय पातळ असले म्हणजे आतला थर मोत्यासारखा व ते जाड असले म्हणजे तो पोर्सलिनासारखा दिसतो. कित्येक कवचांत मौक्तिकमय थर असत नाही. काही थोड्या वंशांत स्तंभी थर नसतो. कवचाच्या ककुदाजवळचा भाग आधी तयार झालेला असतो व शरीराची वाढ होताना त्याच्यात भर पडून कवचाची वाढ होते. वेळोवेळी पडलेली भर दाखविणाऱ्या संकेंद्री रेषांसारख्या खुणा म्हणजे वृद्धिरेषा पुष्कळ कवचांच्या पृष्ठभागावर दिसतात पण कित्येकांचे पृष्ठ गुळगुळीत असते व कित्येकांच्या पृष्ठभागावर संकेंद्री किंवा अरीय (त्रिज्यीय) रेषा, खोबणी किंवा वरंबे असतात. काहींच्या पृष्ठभागावर पुटकुळ्या किंवा काटे असतात. कवचांचे काठ साधे किंवा दंतुर असतात. बऱ्याचशा वंशांची कवचे पूर्ण मिटू शकतात पण काहींच्या शिंपा एकत्र जुळलेल्या असताना एखाद्या जागी लहानमोठी फट राहते. ती सामान्यतःपश्चभागी असते व तिच्यातून निनाल बाहेर जातात. कधीकधी अग्र भागातही फट असते व तिच्यातून पाय किंवा सूत्रगुच्छ बाहेर जातात.

 प्रौढ शिंपल्यांची  लांबी वंशपरत्वे २ मिमी. पासून तो ट्रिडॅक्ना वंशातील प्राण्यांप्रमाणे २ मी. पर्यंत अ स ते. ट्रिडॅक्नाचे मध्यम आकारामानाचे प्राणीसुद्धा आपले कवच घट्ट मिटून घेऊ शकतात. ते सामान्यतःप्रवालभित्तीत गुंतून वाढत असतात त्यामुळे पाणबुड्यांना त्यांचा धोका असतो. एखाद्या उघड्या कवचात चुकून त्यांचा हात किंवा पाय शिरला व प्राण्याने कवच मिटून घेतले, तर पाणबुड्याची सुटका होणे अत्यंत कठीण असते. 

बायव्हाल्व्हियांच्या विद्यमान जातींची संख्या सु. अकरा हजार व जीवाश्म जातींची सु. पंधरा हजार भरते.

 जीवाश्म : बायव्हाल्‌व्हियांचे जीवाश्म मुख्यत्वे शिंपांच्या व त्यांच्यावरील स्नायूंच्या खुणांच्या रूपात आढळतात. ॲक्टोनोडोंटॉइडिया या मध्य कँब्रियन (सु. ५४ ते ५१ कोटी वर्षांपूर्वींच्या) काळातील गणाचे जीवाश्म हे बायव्हाल्व्हियांचे माहीत असलेले सर्वांत जुने जीवाश्म आहेत. काहींच्या मते या आधीच्या पूर्व कँब्रियन (सु. ६० ते ५४ कोटी वर्षापूर्वीच्या) काळातील रिबीरॉयडा गटाचे प्राणी हे बायव्हाल्व्हियांपैकी असावेत परंतु प्राण्यांच्या वर्गीकरणातील त्यांचे स्थान अजून निश्चित झालेले नाही. यावरून बायव्हाल्व्हिया कँब्रियनाच्या सुरुवातीस अवतरले असावेत आणि कदाचित ते लिंपेटासारख्या मोनोप्लॅकोफोरा या गणाच्या एक शिंपा असलेल्या अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांपासून क्रमविकसित (उत्क्रांत) झाले असावेत. त्या वेळी प्राण्याच्या शिंपेत दोन ठिकाणी कॅल्शियमीभवन (कॅल्शियमाची लवणे साचण्याची क्रिया) झाल्याने बायव्हाल्‌व्हियाप्रमाणे दोन शिंपा निर्माण झाल्या असाव्यात आणि त्या परिकवचातील शंखद्रव्याने जोडल्या गेल्या असाव्यात. ऑर्डोव्हिसियन (सु. ४९ ते ४४ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील बायव्हाल्व्हिया अधिक प्रगत व त्यांचे काही गण आताच्यासारखे (उदा., न्यूक्युलॉयडा, टेरॉयडा इ.) होते. मध्य ऑर्डोव्हिसियन काळापर्यंत प्रभेदनाचे (साध्यापासून गुंतगुंतीचे प्रकार निर्माण होण्याच्या प्रक्रियेने) त्यांचे कित्येक वंश निर्माण झाले होते. तसेच त्यांनी अनेक प्रकारच्या परिसरांशी जुळवून घेतले होते. मात्र पुराजीव महाकल्पात (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) त्यांची संख्या थोडीच होती आणि प्रवारखात असणारे थोडेच वंश तेव्हा होते. पुराजीव महाकल्पाच्या शेवटी त्यांच्यात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले त्यांचे आधीचे बहुतेक वंश नामशेष होऊन नवीन वंश अवतरले आणि कार् बॉनिफेरस कल्पात (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) त्यांनी ⇨  ब्रॅकिओपोडांची जागा घेतली. मध्यजीव (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) व नवजीव (गेल्या ६-५ कोटी वर्षांच्या) काळात त्यांचा उत्कर्ष होऊन त्यांचे प्रकार व संख्या खूप वाढली. जुरासिक ते क्रिटेशन (सु. १८.५-९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील इनोसेरॅमस, ट्रायगोनिया, हिप्प्युरिटॉयडा हे आणि मुख्यत्वे क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील रुडिस्ट (उदा.,हिप्प्युराइटस, रेक्वीनिया इ.) हे मध्यजीव महाकल्पातील काही महत्त्वाचे गट आहेत. क्रिटेशस काळाच्या अखेरीस कित्येक वंश नष्ट होऊन पॅलिओसीन कल्पात (सु.६.५ ते ५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) नवे वंश निर्माण झाले.नवजीव महाकल्पात प्रावारखात असलेल्या वंशांची व हेटेरोडोंटांची भरभराट होऊन तृतीय कल्पात (सु.६.५ ते १.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) हे महत्त्वाचे अपृष्ठवंशी प्राणी झाले. हल्ली यांच्यापैकी हेटेरोडोंट हा गट प्रमुख असून बायव्हाल्‌व्हियापेक्षा गॅस्ट्रोपोडांचे महत्त्व वाढले आहे.

निःसंशयपणे गोड्या पाण्यात राहणाऱ्या बायव्हाल्‌व्हियाचे सर्वांत जुने जीवाश्म कार् बॉनिफेरस काळातील आहेत. काहींच्या मते या आधीच्या काळातही यांचे काही वंश असावेत. दगडी कोळशाच्या जोडीने आढळणाऱ्या गाळाच्या कित्येक थरांत यांचे पुष्कळ जीवाश्म आढळतात. यावरून अशा दलदलीच्या भागात (उदा.,यूरोपातील) त्यांची विशेष भरभराट झाली होती, असे दिसून येते.

 बायव्हाल्व्हियांच्या जीवाश्मांच्या वर्गीकरणाच्या निरनिराळ्या बाबींवर आधारलेल्या अनेक पद्धती असून त्यांपैकी कोणतीच सर्वमान्य झालेली नाही. एम्. न्यूमायर यांची पद्धती पुराजीववैज्ञानिकांना मान्य आहे, तर पी. पेल्सेनियर यांची पद्धती प्राणिवैज्ञानिकांना पसंत आहे.

 आतापर्यंत बायव्हाल्विहयांनी विविध प्रकारच्या जीवनप्रणाली व परिसर यांच्याशी जूळवून घेतल्याचे दिसून येते तथापि पुष्कळ अधिकुलांच्या प्राण्यांत पुराजीव काळापासून अल्पसेच बदल झाले आहेत. त्यामुळे त्यांचा जीवाश्म म्हणून विशेष उपयोग होत नाही. मात्र काही बायव्हाल्विहया हे विशिष्ट काळाचे सूचक जीवाश्म म्हणून उपयुक्त ठरले आहेत उदा.,तृतीय कल्पाचा प्रारंभ सूचित करणारे व्हेनेरिकार्डिया. मात्र हल्ली अशा माहितीसाठी एखाद्या सूचक जातीऐवजी बायव्हाल्व्हियांच्या समुदायाचा वापर केला जातो. तापमान व लवणता यांच्यात होणाऱ्या बदलांचा परिणाम इतर मॉलस्कांप्रमाणेच बायव्हाल्व्हियांवरही होतो. त्यामुळे केवळ काळाबद्दलचीच नव्हे, तर त्या काळातील परिस्थितिवैज्ञानिक माहितीही त्यांच्यावरून मिळू शकते.

भारतीय उपखंडात बऱ्याच ठिकाणी बायव्हाल्व्हियांचे जिवाश्म असून त्यांपैकी पुढील आढळ महत्त्वाचे आहेत. काश्मीरमध्ये मध्ये ट्रायासिक (सु. २१.५ ते २० कोटी वर्षांपूर्वींच्या) काळातील थोडे जीवाश्म आढळले आहेत. याच काळातील मिठाच्या डोंगरामधील वालुकामय चुनखडकांमध्ये बायव्हाल्व्हियांचे विपुल जीवाश्म आढळल्याने त्यांना बायव्हाल्व्हिया थर असे नाव पडले. काश्मीरमधील उत्तर ट्रायसिक (सु. २० ते १८.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील चुनखडकांमध्ये मायोफोरिया, हीर्नेशिया क्लॅमिस, स्पूडोमोनोटिस, लिमा या वंशांचे जीवाश्म आढळले आहेत. ऊमिया मालेच्या [⟶ गोंडवनी संघ] खडकांत बायव्हाल्व्हियांचे जीवाश्म आढळले असून हिमालयातील गिउमल वालुकाश्मात ऑस्ट्रिया, ग्रीफिया, ट्रायगोनिया इ. वंशांचे जीवाश्म आढळले आहेत. पूर्व घाटातील पाँडिचेरी-तिरुचिरापल्ली भागात निर्वंश झालेल्या अनेक बायव्हाल्विहयांचे क्रिटेशस काळातील जीवाश्म आढळले आहेत.

पहा : कालव टेरेडो पुराप्राणिविज्ञान मॉलस्का.

संदर्भ : 1. Easton, W. H. Invertebrate Paleontology, New York,1960. 

             2. Hyman, L. H. The Inveriebrates, Vol. VI, New York, 1967. 

             3. Morton, J. E. Molluscs, New York, 1963. 

             4. Parker, T. J. Haswell, W. A. A Textbook of Zoology, Vol. I, London, 1960. 

             5. Wilbur, K. M. Yonge, C. M., Ed., Physiology of Mollusca, Vol. I. New York, 1964.

             6. Woods. H. Palaeontology Invertebrate, Cambridge, 1961.

केळकर, क. वा. ठाकूर, अ. ना.