डायोफँटस, ॲलेक्झांड्रियाचे : ग्रीक गणितज्ञ. बीजगणितातील कार्याबद्दल प्रसिद्ध. त्यांचे जन्मस्थान आणि एकूण जीवन यांविषयीची माहिती उपलब्ध नाही. ते ८४ वर्षे जगले असा निष्कर्ष त्यांच्या विषयीच्या एका गमतीदार कूट प्रश्नावरून काढता येतो. काहींच्या मते ते इ. स. तिसऱ्या शतकाच्या मध्यास होऊन गेले, तर ॲलेक्झांड्रियाचे हीरो (इ. स. पहिले शतक) यांचे ते समकालीन असावेत असाही एक अंदाज आहे. त्यांच्या बीजगणितातील लेखनामुळे त्यांना बीजगणिताचे पितामह हे नामाभिधान नंतरच्या काही गणितज्ञांनी दिले. बीजगणिताची उत्क्रांती तीन अवस्थामधून झाली असे मानतात. त्या अवस्था म्हणजे (१) शब्दांकित, (२) संक्षेपांकित व (३) चिन्हांकित. संक्षेपांकित अवस्थेची सुरुवात डायोफँटस यांनी केली. डायोफँटस यांचा प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे Arithmetica. हा ग्रंथ त्यांनी तेरा भागांत लिहिला होता. परंतु त्यांपैकी सहा भागच उपलब्ध आहेत. या ग्रंथामध्ये विविध प्रकारची उदाहरणे सोडविलेली आहेत. त्यामध्ये एक, दोन, तीन किंवा चार चलांची एकघाती समीकरणे, द्विघाती समीकरणे व एक किंवा अधिक चलांतील अनिश्चित समीकरणे आहेत. सर्व समीकरणांचे निर्वाह (समीकरण सोडवून मिळणारे उत्तर) धन संख्या येतील अशीच उदाहरणे दिलेली आहेत [⟶ संख्या सिद्धांत]. ऋण संख्या ही संकल्पना त्या वेळी ज्ञात नव्हती. अज्ञाताकरिता त्यानी एकच चिन्ह वापरले आहे. बाणाच्या टोकासारखे दुसरे एक बीजगणितीय चिन्ह त्यांनी सध्याच्या ऋण चिन्हासारखे वापरले. धन चिन्ह वापरात नव्हते. बेरीज दाखविण्याकरिता दोन पदे शेजारी शेजारी लिहिलेली आढळतात. डायोफँटस यांचे Moriastica, Porismata, Arithmetica आणि De Polygonis Numeris  हे चार ग्रंथ उपलब्ध आहेत.

मिठारी, भू. चिं.