एव्हान्झ, हर्बर्टमॅक्‍लिन : (२३ सप्‍टें. १८८२ — ). अमेरिकन शारीरशास्त्रज्ञ व संशोधक. जीवविज्ञान व वैद्यक या विषयांत महत्त्वाचे संशोधनत्यांचे शिक्षण कॅलिफोर्निया विद्यापीठ व जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ येथे झाले. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात (१९०८ – १५) व कॅलिफोर्निया विद्यापीठात (१९१५ — ५२) ते शारीरशास्त्राचे प्राध्यापक होते. १९३० — ५२ या काळात कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ एक्सपेरिमेंटल बायॉलॉजी या संस्थेचे संचालक आणि जीवविज्ञानाचे प्राध्यापक होते. १९५२ पासून याच संस्थेचे ते सन्माननीय संचालक व प्राध्यापक आहेत.

त्यांनी १९२२ मध्ये इ जीवनसत्त्वाचा शोध लावला. ओ. एच्. आणि जी. ए. एमर्सन यांच्याबरोबर एव्हान्झ यांनी संशोधन करून हे जीवनसत्त्व प्रथमच शुद्ध स्वरूपात मिळविले व त्याचे रासायनिक संघटनही शोधून काढले. मानवात ४८ गुणसूत्रे (एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आनुवंशिक लक्षणे नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक) असतात असे त्यांनी दाखविले. पोष ग्रंथीतील प्रवर्तकांसंबंधीही (हॉर्मोनांसंबंधीही) त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. शरीरातील रक्ताचे घनफळ ठरविण्यासाठी नीलेत टोचून भरण्यायोग्य असे निळे रंजकद्रव्य त्यांनी शोधून काढले. या रंजकद्रव्याला ‘एव्हान्झ ब्ल्यू’ असे म्हणतात.

ते अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, लंडनची रॉयल सोसायटी इ. अनेक मान्यवर संस्थांचे सदस्य आहेत. जिनिव्हा, पॅरिस, बर्मिंगहॅम इविद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिलेल्या आहेत. शारीर (शरीराच्या संरचनेसंबंधीचे विज्ञान), ऊतकविज्ञान (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहांचे विज्ञान), कोशिकाविज्ञान (पेशींची संरचना, कार्य व पुनर्जनन यांसंबंधीचे विज्ञान), जीवरसायनशास्त्र, पोषण इ. विषयांवरील त्यांचे सु६०० संशोधनपर निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.

कानिटकर, बा. मो.