प्रायोगिकमानसशास्त्र : मानसशास्त्रीय प्रश्नांचा अभ्यास करण्याची एक पद्धती. मानसशास्त्राची एक शाखा अशा अर्थानेही ही संज्ञा वापरली जात असे तथापि मानसशास्त्राच्या प्रत्येक शाखेत प्रयोगपद्धतीचा वापर होत असल्याने प्रायोगिक मानसशास्त्राची एक वेगळी शाखा आता वस्तुतः मानली जाऊ नये. तरीदेखील वेदन, संवेदन, प्रेरणा, अध्ययन हे प्रायोगिक मानसशास्त्राचे खास विषय आहेत. प्रयोगपद्धतीने मानसशास्त्रातील ज्या विषयांचा अभ्यास केला जातो, ते सर्व विषय प्रायोगिक मानसशास्त्राचे अभ्यासविषय ठरतात आणि त्यांत वरील विषय प्रमुख आहेत.

 

मानसशास्त्रीयप्रयोगांचेस्वरूप : प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणातील निरीक्षण. मात्र इतर नैसर्गिक शास्त्रांशी तुलना करता मानसशास्त्रीय प्रयोगांतील नियंत्रण गुंतागुंतीचे असते. अगोदर जे सिद्ध झालेले आहे त्याचा पडताळा पाहणे किंवा नवे संबंध शोधून काढणे, ही इतर शास्त्रांतील प्रयोगांची उद्दिष्टे मानसशास्त्रीय प्रयोगांतही असतात.

 

मानसशास्त्रीय प्रयोगांत परिवर्त्यांचा (व्हेरिएबल्स) वापर व नियंत्रण करावे लागते. परिवर्त्य म्हणजे कोणतेही मूल्य धारण करू शकणारा गुण होय. ज्यांच्या वर्तनावर परिणाम घडण्याची शक्यता आहे, अशा परिवर्त्यांचाच मानसशास्त्रात विचार होतो.

 

परिवर्त्यांचे दोन मुख्य प्रकार असतात. ते म्हणजे स्वतंत्र आणि अवलंबी परिवर्त्ये. स्वतंत्र परिवर्त्ये ही वर्तनातील कारण-घटक (ॲन्टिसीडेंट फॅक्टर्स) असतात. ज्या परिवर्त्यांचे मूल्य प्रयोगकर्ता स्वतंत्रपणे बंदलू शकतो, त्या परिवर्त्यांना स्वतंत्र परिवर्त्ये म्हणतात. या कारण-घटकांचे उद्दीपक घटक, व्यक्तिसापेक्ष घटक आणि मध्यगामी घटक असे तीन उपप्रकार असतात. याचा अर्थ असा, की व्यक्तीचे वर्तन बाह्य किंवा आंतरिक उद्दीपनाने व्यक्तिविशिष्ट वा मानवनिर्मित सामाजिक कारणांनी अथवा या दोहोंचे मिश्रण असलेल्या मध्यगामी घटकांनी बदलू शकते. बाह्य आणि आंतरिक घटकांत भौतिक घटक (तपमान, जागा, आर्द्रता इ.), जैविक घटक (शारीरिक प्रकृती, पचन, रुधिराभिसरण इत्यादींचा परिणाम), आनुवंशिक घटक (शरीराची ठेवण, आनुवंशिक रोग इ.) आणि कारक घटक (स्नायूंच्या कार्यातून निर्माण होणारे घटक) यांचा अंतर्भाव होतो. अवलंबी परिवर्त्ये ही मानवी व्यवहारातील कार्यघटक (कॉन्सिक्वेन्सेस) असतात. एखाद्या उद्दीपकास अनुसरून व्यक्ती अनेक तऱ्हेने कार्य करू शकते. उद्दीपकामुळे होणारी प्रतिक्रिया, उद्दीपकपरिस्थितीबाबत निर्णय, त्याबाबतचा अभिप्राय किंवा अभिवृत्ती, भावनिक बदल आणि संवेदनात्मक बदल हे सर्व कार्यघटकाचे प्रकार आहेत.

 

स्वतंत्र परिवर्त्ये आणि अवलंबी परिवर्त्ये यांच्यातील कार्यकारणभाव सिद्ध करणे, हा मानसशास्त्रीय प्रयोगाचा प्रमुख हेतू असतो. असा प्रयोग अनेक प्रकारांनी करता येतो. मानवाच्या किंवा प्राण्याच्या वर्तनातील विशिष्ट वर्तन घडून येण्यास कारणीभूत असणारा प्रत्येक स्वतंत्र बाह्य परिवर्त्य घेऊन त्यात पद्धतशीरपणे बदल घडवावयाचा आणि या बदलामुळे अवलंबी परिवर्त्यात कोणता बदल घडून येतो, याचा अभ्यास करावयाचा हा एक प्रकार होय. स्वतंत्र बाह्य परिवर्त्यात बदल न घडविता व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या आंतरिक अवस्थेत बदल घडवून आणून त्याचा वर्तनावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करणे हा दुसरा प्रकार. काही स्वतंत्र परिवर्त्यांची मूल्ये स्थिर ठेवून म्हणजेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवून एखाद्या किंवा काही स्वतंत्र परिवर्त्यांची मूल्ये पद्धतशीरपणे बदलून त्याचा वर्तनावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करणे, हा तिसरा प्रकार होय. बहुतेक मानसशास्त्रीय प्रयोगांमध्ये तिसऱ्या प्रकाराचाच अधिकधिक उपयोग करावा लागतो.

 

मानवाचे वर्तन गुंतागुंतीचे असते. त्यामुळे एखादे वर्तन एकाच स्वतंत्र परिवर्त्यावर अवलंबून नसते. म्हणूनच मानसशास्त्रीय प्रयोगाची सुरुवात करताना अभ्यासविषयाचा कार्यघटक किंवा अवलंबी परिवर्त्य हा कोणत्या स्वतंत्र परिवर्त्यांवर किंवा कारणघटकांवर अवलंबून असेल, याचा प्रथम विचार करावा लागतो. त्यांपैकी नेमक्या कोणत्या स्वतंत्र परिवर्त्याचा अवलंबी परिवर्त्याबरोबरचा कार्यकारणसंबंध शोधून काढावयाचा, हे प्रयोगाचे उद्दिष्ट असते. प्रयोगामध्ये त्या स्वतंत्र परिवर्त्याशिवाय इतर स्वतंत्र परिवर्त्यांच्या मूल्यांवर नियंत्रण ठेवणे जरूर असते. समजा क्ष हा अवलंबी परिवर्त्य अ, ब, क, ड या स्वतंत्र परिवर्त्यांवर अवलंबून आहे आणि आपणास क्ष आणि अ मधील कार्यकारणसंबंध शोधून काढावयाचा आहे तर अशा प्रयोगात ब, क, ड या स्वतंत्र परिवर्त्यांची मूल्ये स्थिर ठेवून, म्हणजेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवून प्रयोगकर्ता अ ची मूल्ये बदलतो त्याप्रमाणे क्ष ची मूल्ये कशी बदलतात याचे निरीक्षण करतो तसेच क्ष आणि अ यांच्यातील कार्यकारणसंबंध निश्चित करतो. काही स्वतंत्र परिवर्त्यांचा मूल्ये बदलून प्रयोगात अभ्यास करावयाचा असतो व काहींची मूल्ये प्रयोगात स्थिर ठेवावयाची असतात, हे दोन्ही साधण्यासाठी मानसशास्त्रीय प्रयोगात ‘नियंत्रित समूह’ व प्रायोगिक समूह’ वापरतात. ज्या व्यक्त्तीच्या अथवा समूहाच्या बाबतीत अभ्यास करावयाच्या स्वतंत्र परिवर्त्याची मूल्ये बदलून अवलंबी परिवर्त्याची मूल्ये कशी बदलतात याचे निरीक्षण करावयाचे असते, त्या समूहास प्रायोगिक समूह म्हणतात. असे केल्यामुळे क्ष केवळ अ ची मूल्ये बदलल्यामुळे बदलतो, इतरांमुळे नाही, हे कळणे सोपे होते. वरील विवेचनाच्या आधारे सर्वसाधारण मानसशास्त्रीय प्रयोगाचा आराखडा पुढीलप्रमाणे होतो :

नियंत्रित समूह

प्रायोगिक समूह

१. प्रयोगापूर्वीचे ‘क्ष’ वर्तनाचे मापन.

२  अ, ब, क, ड या घटकांचे मूल्य स्थिर ‘क्ष’ मूल्य स्थिर.

३. प्रयोगानंतरचे ‘क्ष’ वर्तनाचे मापन.

१) प्रयोगापूर्वीचे ‘क्ष’ वर्तनाचे मापन.

२) ब, क, ड या घटकांचे मूल्य स्थिर ‘अ’ घटकाचे मूल्य बदलते.

३) प्रयोगानंतरचे ‘क्ष’ वर्तनाचे मापन.

 

वरील उदाहरणात अ, ब, क, ड या स्वतंत्र परिवर्त्यांचे मूल्य स्थिर ठेवले असता नियंत्रित समूहाच्या क्ष वर्तनात प्रयोगानंतर काय फरक पडतो तसेच अ च्या मूल्यात बदल घडविला असता क्ष च्या मूल्यात काय फरक पडतो, हे प्रायोगिक समूहावरून कळू शकते. दोन्ही समूहांच्या क्ष वर्तनात काय फरक पडला याची तुलना केली असता, अ मुळे फरक पडू शकतो की नाही हे कळते. कधी कधी असेही घडते, की क्ष वर अ, ब, क, ड यांच्याप्रमाणे प, ट, र इत्यादी इतर घटकांचाही परिणाम घडण्याची शक्यता असते. मात्र तो परिणाम लक्षात न घेण्याइतका अत्यल्प असतो किंवा निश्चित किती होतो, हे माहीत असते. सांख्यिकीच्या साहाय्याने अ या घटकाचा क्ष ह्या घटकावर नेमका परिणाम किती झालेला आहे व नेहमी तो तसाच होईल की नाही, याचा अभ्यास करता येतो.

 

प्रयोगशाळेत तीच परिस्थिती पुन्हा निर्माण करून एकदा आलेले निष्कर्ष पडताळून पाहता येतात. ज्या परिवर्त्यांचा अभ्यास करावयाचा नाही त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य असते, हा मानसशास्त्रीय प्रयोगांचा फायदा होय. मात्र प्रयोगशाळेतील परिस्थिती दररोजच्या जीवनासारखी तंतोतंत उभी करता येत नसल्याने प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष प्रत्यक्ष जीवनाच्या व्यवहारात उपयोगी न पडण्याची शक्यता असते. शिवाय मानसशास्त्रातील मनोविकृतिशास्त्र, सल्लामसलतशास्त्र (काउन्सेलिंग) या शाखांमध्ये प्रयोगपद्धतीचा परिणामकारक उपयोग करता येत नाही, ही या पद्धतीची मर्यादा लक्षात ठेवावी लागते.

 


मानसशास्त्रीयप्रयोगांतवापरलीजाणारीउपकरणे: मानसशास्त्रीय प्रयोगांत मनुष्य आणि प्राणी हेच प्रयुक्त असल्याने मानवाशी संबंधित असलेल्या भौतिकी, खगोलशास्त्र इ. शास्त्रांतील उपकरणे तसेच प्राण्यांच्या बाबतीत प्राणिशास्त्रात वापरली जाणारी उपकरणे आणि प्रयुक्त्या मानसशास्त्रातही वापरतात. अलीकडील काळात विज्ञानात ट्रान्झिस्टर, इलेक्ट्रॉनीय उपकरणे इ. वापरण्यात येत असल्याने त्यांचाही उपयोग मानसशास्त्रात होतो. कालदर्शक (क्रॉनॉस्कोप), विद्युत्‌मस्तिष्कालेखक (इइजी) इ. उपकरणांत सध्या इलेक्ट्रॉनीय मंडलांचा उपयोग होतो. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी प्रकाशमापक, गंधवेदनाचा अभ्यास करण्यासाठी गंधमापक (ऑल्‌फॅक्टोमीटर), त्वचावेदन-प्रयोगात त्वक्‌वेदनमापक (ईस्थेशियोमीटर), अंतरसंवेदनासाठी त्रिमितिदर्शक (स्टिअरिआस्कोप) आणि विपरीतदर्शक (स्यूडोस्कोप), स्मरणप्रक्रियेच्या अभ्यासात स्मरणोपकरण (मेमरी ड्रम,) स्नायूंच्या कार्याच्या अभ्यासासाठी स्नायुकार्यमापक (अर्गोग्राफ), विद्युत्‌रोधक वापरून तयार केलेली उपकरणे त्याचप्रमाणे मानव आणि प्राण्यांसाठी कूटपेट्या (प्रॉब्लेम बॉक्सेस), कूटव्यूह (मेझ), निरनिराळ्या रचना असलेले पिंजरे, विद्युत्‌रोधक आणि घंटा वापरून तयार केलेल्या प्रयुक्त्या इ. वापरण्यात येतात. अभिसंधान आणि अध्ययनाच्या इतर प्रयोगांत प्राण्याच्या मेंदूचा काही भाग काढणे, पायाच्या स्नायूंना विजेचा धक्का देता येईल व प्राण्याकडून काही काम करून घेता येईल अशी उपकरणाची जोडणी करणे, यांसारखी घनस्पर्शमापक (स्टिरीओटॅक्टिक) उपकरणे इ. साहित्य वापरले जाते. प्राण्याच्या आकारमानाप्रमाणे साहित्याचे आकारमानही बंदलावे लागते.

 

ऐतिहासिकआढावा : सामान्यतः अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी भौतिकीच्या अभ्यासातून मानसशास्त्रीय प्रयोगांचा उगम झाला. अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे वापरून व्यक्तीने विविध उद्दीपकांना दिलेल्या प्रतिक्रिया मोजणे किंवा प्राण्याच्या मेंदूचा विशिष्ट भाग काढून टाकला असता प्राण्याचे, काढलेल्या भागाशी संबंधित असलेले, वर्तन कसे घडते याचा अभ्यास करणे, या पातळीपर्यंत मानसशास्त्रीय प्रयोग परिणत झाले आहेत. प्रायोगिक मानसशास्त्राचा प्रारंभ प्रामुख्याने शरीरशास्त्र आणि भौतिकी यांच्यामुळे झाला. या विषयाच्या शास्त्रज्ञांना आपल्या संशोधनात बाह्य घटकांबरोबर मानवी निरीक्षणाची नोंद घेणे आवश्यक वाटू लागले. १७९६ साली ग्रिनिच वेधशाळेत एका साहाय्यक नोकराने दूरदर्शक यंत्रातून नोंद घेताना एकदशांश सेकंदाची चूक केली. त्यामुळे त्याला नोकरीस मुकावे लागले परंतु या घटनेनंतर वीस वर्षांनी बेसेल या शास्त्रज्ञाने असे दाखविले, की कोणत्याही दोन मानवी निरीक्षकांमध्ये कालमापन करण्यात एका सेकंदाचा जरी फरक पडला, तरी तो स्वाभाविक मानला पाहिजे. सारांश भैतिक शास्त्रज्ञांना मानवाच्या ऐंद्रिय अनुभवाची दखल घेण्याची जरूरी वाटली, त्यामुळे प्रायोगिक मानसशास्त्राचा उदय झाला. या कुतूहलामुळेच सुरुवातीचे मानसशास्त्रज्ञ शरीरशास्त्र (व्हुंट, बीने, पाव्हलॉव्ह), भौतिकी (फेक्नर, हेल्महोल्टस) या शास्त्रांत पारंगत होते. या शास्त्रज्ञांनी शरीरशास्त्र, भौतिकी या शास्त्रांच्या प्रयोगशाळांतील उपकरणांचा तसेच नव्याने बनविलेल्या उपकरणांचा वापर मानसशास्त्रीय अभ्यासात केला. प्रायोगिक मानसशास्त्राच्या प्रारंभकालातील काही महत्त्वाच्या शास्त्रज्ञांचे कार्य पुढीलप्रमाणे आहे.

 

जी. टी. फेक्नर (१८०१-८७) यांना वैद्यकशास्त्र व भौतिकीत गती होती. त्यांनी एलिमेंट्सऑफसायकोफिझिक्स (मूळ जर्मन, १८६०) हा प्रायोगिक मानसशास्रावरील पहिला ग्रंथ लिहिला. त्यांनी मानसभौतिकी या विषयाचा पाया घातला. उद्दीपकाची तीव्रता व त्या उद्दीपकामुळे निर्माण होणाऱ्या वेदनानुभवाची तीव्रता यांतील संबंध त्यांनी शोधून काढला. या संबंधावरील त्यांचा नियम फेक्नरचा नियम म्हणून प्रसिद्ध आहे. याशिवाय फेक्नर यांनी सीमापद्धती, स्थिर उद्दीपकपद्धती आणि सरासरी प्रमादपद्धती या मानसभौतिक पद्धती शोधून काढल्या.

 

१८७९ साली लाइपसिक येथे ⇨ व्हिल्हेमव्हुंट (१८३२-१९२०) यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीमध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. या प्रयोगशाळेत विविध देशांमध्ये पुढे ख्याती पावलेले मानसशास्त्रज्ञ उदयास आले. या प्रयोगशाळेत नवीन उपकरणांच्या साहाय्याने दृष्टी, श्रुती, स्पर्श, संवेदना, प्रतिक्रिया-काल, अवधान, भाव इ. विषयांचा अभ्यास झाला. व्हुंट यांनी मानसशास्त्र-विषयक नियतकालिकही सुरू केले.

 

व्हुंट यांच्या तुलनेने ⇨ हेरमानएबिंगहाऊस(१८५०-१९०९) हे स्वतंत्र वृत्तीचे मानसशास्त्रज्ञ होते. स्मृती, धारणा इत्यादींच्या अभ्यासासाठी त्यांनी फेक्नर यांच्या पद्धतींचा वापर केला. स्मृतिमापनासाठी त्यांनी आवृत्त्यांच्या संख्येचा (नंबर ऑफ ट्रायल्स) वापर केला. स्मृतीच्या अभ्यासात त्यांनी व्यंजन-स्वर-व्यंजन अशी त्रि-अक्षरी अर्थहीन शब्दावली वापरली. स्मृतिमापन करताना त्यांनी पूर्णप्रभुत्वपद्धती आणि बचतपद्धती यांचा वापर केला. अर्थहीन शब्दावलीची स्मृती ही पाठाची लांबी, आवृत्त्यांची संख्या आणि पाठांतर झाल्यानंतर लोटलेला काल यांच्यावर अवलंबून असते, हे शोधून त्यांनी विस्मृतीच्या कारणांची चिकित्सा केली.

 

व्हुंटचे ⇨ ओस्वाल्टक्यूल्पे (१८६२-१९१५) हे बारा वर्षे सहकारी होते. एबिंगहाऊस यांनी स्मृतिक्षेत्रात ज्या पद्धतीने काम केले, त्याच पद्धतीने क्यूल्पे यांनी निर्णयप्रक्रियेचा अभ्यास केला. अंतर्निरीक्षण पद्धती वापरून निर्णयप्रक्रियेचा अभ्यास केला असता त्या प्रक्रियेशी निगडित अशी मानसिक प्रक्रिया क्यूल्पे यांना आढळली नाही म्हणून त्यांनी प्रायोगिक पद्धतीचा उपयोग करून असे शोधून काढले, की कार्याकडे कल वा चित्तप्रवृती (डिस्‌पोझिशन टू ॲक्ट) व नियामक (डिटर्मिनिंग) प्रवृत्ती या निर्णयप्रक्रियेशी निगडित अशा मानसिक प्रक्रिया आहेत.

 

मानसशास्त्रीय प्रयोगांत विसाव्या शतकात प्राण्यांचा सर्रास वापर होत असला, तरी ही प्रथा डार्विन, लॉइड मॉर्गन, थॉर्नडाइक, वॉटसन इत्यादींनी एकोणिसाव्या शतकातच सुरू केली. डार्विन यांचा उत्क्रांतिवाद सर्व आधुनिक शास्त्रांनी मान्य केल्याने मानवाच्या अभ्यासात प्राण्यांच्या अभ्यासाचे साहाय्य आवश्यक ठरते, हे तत्त्व प्रस्थापित झाले. मानवाने उद्दीपकास अनुसरून केलेली प्रतिक्रिया भाषिक तसेच स्नायविक असते. या प्रतिक्रियेचे प्रतिबिंब मानवाच्या मज्जासंस्था आणि ग्रंथिसंस्था यांमध्येही दिसून येते. प्राण्यांना मात्र भाषा अवगत नसल्याने त्यांच्या प्रतिक्रिया शारीरिक बदलांद्वारे घडत असतात. असे असले, तरी मानवाप्रमाणे प्राणीही सतर्क वर्तन करू शकतो, हे मान्य झाल्याने अध्ययन, स्मरण इत्यादींच्या अभ्यासात प्राण्यांवरील प्रयोग उपयुक्त ठरले. शिवाय, प्राण्यांचा संकर घडवून आणून आनुवांशिक गुणांचे नियंत्रण करणे, मेंदूच्या विविध भागांवर शस्त्रक्रिया करणे शक्य असल्याने मानसशास्त्रीय प्रक्रियांच्या अभ्यासात मोठ्या प्रमाणावर प्राण्यांचा वापर करण्यात येतो. [⟶ तुलनात्मक मानसशास्त्र].

 

प्रमुखप्रयोगविषय : गेल्या दोन शतकांत प्रयोगपद्धतीच्या साहाय्याने प्रामुख्याने वेदन, संवेदन, निर्णयन, प्रतिक्रिया-काल, अध्ययन, स्मरण, विचार इ. मानसिक प्रक्रियांचा अभ्यास झालेला आहे.

 


वेदनप्रक्रिया : प्रायोगिक मानसशास्त्राच्या प्रारंभकाळात त्वचावेदन, गंध, रुची, दृष्टी, श्रुती या वेदनानुभवांवर प्रयोग केंद्रित झाले. वेदनानुभवाचे स्वरूप कसे असते, उद्दीपकाच्या गुणधर्मांचा वेदनानुभवाच्या गुणधर्मांवर काय परिणाम होतो, वेदनानुभवाचे मापन कसे करणे शक्य आहे इ. प्रश्नांवर अभ्यास केंद्रित झाला. आर्. एल्. व्हेगेल आणि ई. जी. वीव्हर यांनी मानवाचे श्रुतिक्षेत्र निर्धारित केले जी. जे. रिच आणि एस्. एस्. स्टीव्हन्झ यांनी ध्वनिलहरींची वारंवारता आणि ध्वनीची तीव्रता यांचा संबंध निश्चित केला एल्. ए. रिग्झ यांनी अंधारसमायोजनाचा अभ्यास केला ट्रोलंड यांनी प्रकाशाच्या तीव्रतेबाबत प्रयोग केले हेनिंग यांनी गंधसमायोजनानंतर पुन्हा गंधवेदन केव्हा होते, याचा अभ्यास केला. या क्षेत्रातील ही काही उदाहरणे होत. [⟶ वेदन].

 

संवेदन : संवेदन कसे होते, संवेदनाचे स्वरूप काय असते, रंग, आकार, वस्तूचे अंतर, गती यांचे संवेदन कसे घडते, याचा मोठ्या प्रमाणावर प्रायोगिक अभ्यास झालेला आहे. एम्. डी. व्हर्नन यांनी आकृति-आधारभूमि-तत्त्व ध्वनिसंवेदनात वापरता येते हे दाखविले एफ्. सी. म्यूलर-लायर यांनी विपरीत संवेदने कशी होतात याचा अभ्यास केला ब्रन्झविक आणि थाउलेस यांनी वस्तूंच्या प्रकाशपरावर्तन गुणोत्तराचा रंगसंवेदनाशी संबंध प्रस्थापित केला तसेच एच्. जे. हौअर्ड आणि जी. डॉलमन यांनी द्विनेत्र दृष्टी वस्तूचे डोळ्यापासूनचे अंतर समजावून घेण्यास उपयुक्त असते, हे दाखविले. संवेदन ही मूलभूत मानसिक प्रक्रिया असल्याने सर्वाधिक प्रयोग या क्षेत्रात झाले. [⟶ संवेदन].

 

निर्णयन : मानसशास्त्रीय प्रयोगात निरीक्षकाला उद्दीपकास अनुलक्षून निर्णय घ्यावा लागतो. निर्णयप्रक्रिया मानवाच्या वेदन, संवेदन, विचार इ. प्रक्रियांबरोबर संयोग पावलेली असते. निर्णयप्रक्रियेत अंतर्निरीक्षणाप्रमाणेच सूक्ष्मकालदर्शकाचा (टॅचिस्टोस्कोप) वापर करून प्रयोग करता येतात. रॉजर्झ यांनी वजने आणि विविध लांबीच्या रेषा यांच्या साहाय्याने कर्षण (ॲकरिंग) परिणामाचा अभ्यास केला.

 

प्रतिक्रिया-काल : उद्दीपक उपस्थित झाल्यापासून प्रतिक्रिया उत्पन्न होण्याच्या कालास प्रतिक्रिया-काल म्हणतात. प्रतिक्रिया-कालाच्या प्रयोगात सूक्ष्मकालमापक व इलेक्ट्रॉनीय उपकरणांचा वापर करतात. [⟶ प्रतिक्रिया-काल].

 

अध्ययनवाज्ञानसंपादन :  वॉटसन, थॉर्नडाइक, पाव्हलॉव्ह, एबिंगहाऊस, जड इत्यादींनी प्राणी आणि मानव यांच्यावर प्रयोग करून अध्ययन कसे होते, अध्ययनावर कोणते घटक कसा परिणाम घडवितात याचा अभ्यास केला. त्यांच्या प्रयोगांतूनच अध्ययनविषयक उपपत्तींना पुष्टी मिळाली. [⟶ ज्ञानसंपादन].

 

स्मरणप्रक्रिया : एबिंगहाऊस यांनी विस्मरणाचा अभ्यास करून विस्मरणवक्र कसा असतो हे दाखविले. सामान्यतः विस्मरण कसे होते, कोणते घटक विस्मरणास कारणीभूत असतात, स्मरण कसे सुधारावे यांबाबतचा प्रायोगिक अभ्यास करण्यात आलेला आहे. [⟶ स्मृति व विस्मृति].

 

वरील मानसिक प्रक्रियांप्रमाणे ⇨ विचारप्रक्रिया, ⇨ मनोभाव, सामाजिक परिस्थितीतील मानवाचे वर्तन, ⇨ थकवा इ. क्षेत्रांत प्रयोगांच्या साहाय्याने अभ्यास झालेला आहे.

 

मानसशास्त्रीय प्रयोगात मानवाच्या प्रक्रियांची नोंद घेताना श्वसन, रक्तदाब, रुधिराभिसरणाचा वेग, थकवा, रक्तशर्करेचे प्रमाण, ग्रंथिस्त्रावांचे प्रमाण यांसारख्या शारीरिक किंवा ऐंद्रिय प्रक्रियांचे मोजमाप करावे लागते. यासाठी उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर प्रायोगिक मानसशास्त्रात केला जातो.

 

काहीप्रायोगिकमानसशास्त्रीयसिद्धांत : प्रयोगाचे महत्त्व जसे वाढले तसे इतर शास्त्रांप्रमाणे मानसशास्त्रातही सिद्धांत प्रस्थापित होऊ लागले विज्ञानाच्या पद्धतीप्रमाणे काही नियम मांडण्यात येऊ लागले. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे आहेत :

 

(१) कूटपेटीच्या साहाय्याने थॉर्नडाइक यांनी अध्ययनातील परिणामाचा नियम शोधून काढला. त्यांनी प्रयत्न-प्रमाद अध्ययनउपपत्तीही मांडली. (२) १९३२ साली ⇨ एडवर्डचेसटोलमन (१८८६-१९५९) यांनी असे प्रतिपादन केले, की संपूर्ण जीवाचा मनोव्यापार प्रयोजनात्मक असतो, अध्ययन हे प्रयोगातील नियंत्रित परिवर्त्यांप्रमाणे मागणी, भूक, स्नायु-कौशल्ये या मध्यभागी घटकांवरही अवलंबून असते अध्ययनास उद्दीपके आवश्यक असली, तरी ही प्रयोगशाळेतील उद्दीपके सुप्त किंवा प्रासंगिक अध्ययन निर्माण करू शकत नाहीत. (३) ⇨ क्लार्कलेनर्डहल (१८८४-१९५२) यांनी भूमिती आणि भौतिकी यांचा आदर्श समोर ठेवून सोळा सिद्धांत आणि अनेक उपसिद्धांत मांडले. हल यांची भूमिका टोलमन यांच्या भूमिकेच्या विरुद्ध आहे. व्यवसायात्मक अध्ययन उद्दीपक-उद्दीपक संबंधावर अवलंबून नसून उद्दीपक-प्रतिक्रिया संबंधावर अवलंबून असते सवय ही इच्छेवर अवलंबून असते, असेही त्यांनी प्रतिपादन केले. अध्ययन ही प्रक्रिया संथ, सातत्याने होणारी प्रक्रिया आहे की अनपेक्षित, अचानक होणारी आहे तसेच अध्ययन हे सुप्त अवस्थेतही होत असते की प्रलोभक उद्दीपक वापरणे सुरू झाल्यानंतरच होते, यांबाबत प्रयोग करण्यात आले तथापि टोलमन आणि हल यांच्यापैकी कोणाचा सिद्धांत तंतोतंत बरोबर आहे याचा निर्णय अजून लागला नाही. (४) ई. आर्. गथ्री यांनी अध्ययनाशी संबधित अशी साहचर्यप्रणाली मांडली. (५) ⇨ कुर्टल्यूइन (१८९०-१९४७) यांनी क्षेत्र-सिद्धांत आणि अवकाश क्षेत्रीय (टोपोलॉजिकल) मानसशास्त्र या कल्पना प्रयोगांच्या आधारे मांडल्या. [⟶ क्षेत्रीय मानसशास्त्र]. (६) के. गोल्डश्टाइन, माक्स व्हेर्थायमर आणि एन्, आर्, एफ्. मेअर यांनी व्यवसायात्मक अध्ययनास द्विघटक सिद्धांत लावता येईल, असे प्रतिपादन केले आहे. (७) बी. एफ्. स्कीनर यांनी उंदीर, कबूतरे यांच्यावर स्कीनर-पेटीच्या साहाय्याने प्रयोग करून अध्ययनातील दृढीकरणाबाबत सिद्धांत मांडला. (८) रॉबर्ट यर्कीझ, व्होल्फगांग कलर, एच्, लोरेन्ट्स, डब्ल्यू. बी. कार्पेन्टर इत्यादींनी प्राण्यांच्या, विशेषतः वानरांच्या, क्रियाकौशल्यांच्या बाबतीत प्रयोग करून नव्या प्रकारची अध्ययन-उपपत्ती मांडली. त्यातूनच मर्मदृष्टिविषयक अध्ययन सिद्धांत प्रस्थापित झाला. (९) बी. जे. अंडरवुड यांनी अर्थहीन शब्दकांच्या साहाय्याने स्मृतिलाभ, साहचर्यशक्ती, क्रमिक स्थानांचा परिणाम यांविषयी सिद्धांत मांडले. (१०) मानसिक प्रक्रिया या जीवाच्या बाह्य परिस्थितीशी होणाऱ्या जैविक समायोजनाचाच भाग आहेत व प्रायोगिक मानसशास्त्राच्या समस्या समायोजनाशी संबंधित आहेत, असे प्रतिपादन जे. मिलर यांनी केले. [⟶ अनुकूलन].

 

उपयोग : प्रायोगिक मानसशास्त्रातील उपलब्ध संशोधनांचा शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्र, सामाजिक वर्तन, मनोविकृतिशास्त्र इ. क्षेत्रांत अधिकाधिक उपयोग करण्यात येतो. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांदरम्यानच्या काळात मानसशास्त्रीय चाचण्यांच्या वा कसोट्यांच्या वापरात बरीच प्रगती झाली. त्यामुळे पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत बुद्धिमापनाच्या आणि अभियोग्यतामापनाच्या चाचण्यांचा उपयोग करावा, शैक्षणिक प्रावीण्याच्या कसोट्यांवर भर द्यावा, शाळांमध्ये व्यावसायिक मार्गदर्शनाची सोय असावी, अध्ययन-अध्यापनाच्या पद्धतींत उपलब्ध संशोधनाचा उपयोग करावा, विद्यार्थ्यांच्या मानसिक अडचणींबाबत नोंद ठेवून प्रायोगिक गटांच्या साहाय्याने काही प्रयोग करावेत, असे विचार रूढ झाले आहेत. [⟶ मानसिक कसोट्या].

 


 

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सर्व जगभर मोठ्या प्रमाणात औद्योगिक प्रगती झाली आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे औद्योगिक-सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांची उकल करताना प्रायोगिक मानसशास्त्रातील संशोधनाचे साहाय्य होते. विशिष्ट कामासाठी योग्य व्यक्तीची निवड कशी करावी, निवडलेल्या व्यक्तींना प्रशिक्षण कसे द्यावे, काम करणाऱ्यांची गुणवत्ता कायम राखून उत्पादनपातळी कशी राखावी, औद्योगिक संबंध योग्य कसे ठेवावेत, कारखान्यातील भौतिक परिस्थितीचा कामगारांच्या गुणत्तेवर काय परिणाम होतो, काल आणि क्रिया यांतील संबंध (टाइम अँड मोशन स्टडीज), मालाची जाहिरात आणि विक्री यांसारखे अनेक विषय आणि समस्या मानसशास्त्रीय प्रयोगांच्या साहाय्याने सुकर होतात. [⟶ औद्योगिक मानसशास्त्र].

 

दुसऱ्या महायुद्धानंतर जगभर जी राजकीय-आर्थिक उलाढाल झाली तिच्यातून अनेक नवे सामाजिक प्रश्न निर्माण झाले. नव्यानेच स्वतंत्र झालेल्या विकसनशील राष्ट्रांतील समाजांत काही नवे प्रश्न निर्माण झाले. विविध सामाजिक स्तरांवरील समूहांतील संघर्षही निर्माण होत आहेत. प्रायोगिक-सामाजिक मानसशास्त्राचा उपयोग या नव्या सामाजिक परिस्थितीचे आकलन करून घेण्यास व ती काही प्रमाणात सुधारण्यास होऊ शकेल.

 

सामाजिकमानसशास्त्रविषयककाहीप्रयोग : संवेदन, अध्ययन, नेतृत्व, समूहकार्य, स्पर्धा, सहकार इ, सामाजिक दृष्ट्या उपयुक्त विषयांवर अनेक प्रयोग करण्यात येतात.

 

काही मानसशास्त्रज्ञांनी ज्यू आणि प्रॉटेस्टंट धर्मपंथांच्या विद्यार्थिनींचे गट निवडून समूहसदस्यत्वाचे महत्त्व आणि दुःख सहन करण्याची ताकद यांविषयी प्रयोग केले. रक्तदाब मोजण्याच्या यंत्राच्या रबरी पट्ट्यास आतून रबरी काटे लावल्याने दाब वाढविताच दुःखवेदन निर्माण करण्याची व्यवस्था करण्यात आली. हे वेदन निर्माण होत असताना ज्यू लोकांची (किंवा ख्रिस्ती लोकांची) दुःख सहन करण्याची शक्ती (दुसऱ्या गटाच्या मानाने) कमी असते अशी सूचना प्रयुक्ताने द्यावयाची. दंडाला गुंडाळलेल्या काटेरी पट्ट्याचा दाब किती वाढविला असता प्रयुक्त दुःखवेदन झाल्याचे सांगतो याची नोंद ठेवण्यात येते व निष्कर्ष काढण्यात येतो.

 

एम्. शेरिफ यांनी सामाजिक मानसशास्त्रात बरेच प्रयोग केले आहेत. प्रयोगशाळेच्या काटेकोर मर्यादा सांभाळूनही हे प्रयोग करता येतात हे त्यांनी दाखविले. सामूहिक आदर्श किंवा मानदंड (नॉर्म्‌स) कसे निर्माण होतात याचे त्यांनी संशोधन केले. या संशोधनावरून त्यांनी असे मत व्यक्त केले, की प्रत्येक समूह समान उद्दिष्टांनी एकत्र आलेल्या व्यक्तींचा बनलेला असतो सदस्यांमध्ये आंतरक्रियात्मक वर्तन घडत असते सदस्यांची स्थाने व भूमिका निश्चित होतात त्यांच्या श्रेणीही ठरतात आणि यातूनच कोणी कसे वागावे, कोणी निर्णय घ्यावा, नेमके काम कोणी करावे यांसारखे समूहवर्तनाचे सर्वमान्य आदर्श निर्माण होत असतात. वरील प्रयोगात अंधाऱ्या खोलीत एकच प्रकाशबिंदू दृश्यमान असेल, तर जे स्वयंप्रेरित गतिवेदन निर्माण होते ते कोणत्या दिशेने व किती वेगाने होते याविषयी प्रयुक्तांचे निर्णय नोंदण्यात आलेले होते.

 

अलीकडे मोठमोठ्या उद्योगव्यवसायांतही एकत्र काम करणाऱ्यांमध्ये ज्या समस्या निर्माण होतात त्या सामाजिक मानसशास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सोडविण्यात येतात. [⟶ सामाजिक मानसशास्त्र].

 

कोणत्याही मानवी समाजात मनोविकृतीचे प्रमाण दुर्लक्ष करण्याजोगे नसते. तणावाच्या सामाजिक वातावरणात तर हे प्रमाण वाढतच राहते. मनोविकृतीचे प्रश्न सोडविताना प्रायोगिक मानसशास्त्राचा उपयोग होऊ शकेल, असा विश्वास आता निर्माण होत आहे. मनोविकृतीमधील अध्ययन-उपपत्तीचे उपयोजन, मनोविकृतीतील सामाजिक परिस्थितीचे स्थान, मनोविकृत व्यक्तीचे परस्परांशी जडणारे सामाजिक संबंध यांचा अभ्यास प्रायोगिक पद्धतीने होत आहे. प्रयोगांवर आधारलेल्या उपचारपद्धतींचा अधिक उपयोग होऊ लागला आहे.

 

संदर्भ : 1. Calfee, R. C. Human Experimental Psychology, New York, 1976.

            2. Kling.J. W. Riggs, L. A. Experimental Psychology, New York. 1971.

            3. Robinson, P. W. Fundamentals of Experimental Psychology, Englewood Cliffs, N. J., 1976.

            4. Woodworth, R. S. Schloscberg,. H. Experimental Psychology, New York, 1960.

 

काळे, श्री. वा. गोगटे, श्री. ब.