स्वामिनाथन, मोनकोंबू सांबशिवन् : (७ ऑगस्ट १९२५– ). भारतीय हरितक्रांतीचे जनक व जीववैज्ञानिक. अनुप्रयुक्त आनुवंशिकी आणि जीवविज्ञान विषयांच्या कार्याबद्दल प्रसिध्द. जन्म तमिळनाडूमधील कुंभकोणम् येथे. तेथेच त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्रावणकोर विद्यापीठातून प्राणिशास्त्र विषयातील बी.एस्सी (१९४४), कोईमतूर कृषि महाविद्यालयातून कृषि पदवी (१९४७), तसेच केंब्रिज विद्यापीठातून बटाट्यावरील संशोधनासाठी पी.एच्डी. (१९५२) पदवी मिळविली. १९५२ साली त्यांची अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात संशोधकपदी नेमणूक झाली. तिचेही त्यांनी बटाट्यावरील संशोधन चालू ठेवले. यावेळी त्यांच्या निबंधाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. जनूकशास्त्रातील आपल्या संशोधनाचा उपयोग भारतातील अन्न समस्या सोडविण्यासाठी व्हावा असा निर्धार करून ते भारतात परतले.

१९५४ मध्ये स्वामिनाथन भारतात परतल्यावर त्यांची नेमणूक कटकच्या केंद्रीय भात संशोधन केंद्रात वनस्पती शास्त्रज्ञपदी झाली. त्यानंतर वर्षभरातच त्यांचेवर दिल्लीच्या भारतीय शेती संशोधन परिषदेत गहू संशोधनाची जबाबदारी टाकण्यात आली. १९५४-८२ असे अठ्ठावीस वर्ष देशाच्या राजधानीतून शेती संशोधन, प्रसार व नियोजनाशी त्यांचा संबंध आला. १९६६ साली स्वामिनाथन भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक म्हणून रुजू झाले. तेव्हा त्यांनी शेतीच आपली प्रयोगशाळा मानली. शेतकऱ्यांबरोबर प्रत्यक्ष शेतात काम करताना त्यांना शेतकऱ्यांच्या पारंपरिक कृषि पध्दतीच्या मर्यादा लक्षात आल्या. त्यामुळे त्यांनी संस्थेमध्ये गव्हाच्या सुधारीत वाणाच्या निर्मितीचे प्रयोग हाती घेतले. गव्हाचं उत्पादन वाढवणं ही त्या वेळी जगभरातील सर्व राष्ट्रांची समस्या होती. प्रसिध्द कृषिशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते नॉर्मन, बोर्लॉग यांनी भरघोस उत्पन्न देणारी गव्हाची खुजी जात विकसीत केली होती. त्यामुळे मेक्सिकोत दर एकरी उत्पादन चौपटीने वाढले होते. १९४५ पर्यंत गहू आयात करणारा देश १९६० नंतर गव्हाची निर्यात करू लागला होता. बोर्लॉग यांनी भारतीय शेतीची पाहणी केली तर आपल्या वातावरणास योग्य वाण निवडता येईल, शिवाय आपल्या संशोधनाला गती येऊ शकेल अशी सूचना स्वामिनाथन यांनी मांडल्यामुळे डॉ. बोर्लॉग शेतीची पाहणी करण्याकरिता भारतात येऊन गेले. त्यांनी रोपांची निवड व त्यांच्या वर्गीकरणाबाबत मोलाचा सल्ला दिला.

डॉ. बोर्लॉग यांनी पाठविलेल्या गव्हाच्या जातींच्या चाचणीचा सविस्तर अहवाल स्वामिनाथन यांनी तयार केला. आपल्याकडील उत्तम वाण व मेक्सिकोतील वाणांची परीक्षा त्यातून झाली. स्वामिनाथन यांनी गव्हाच्या मेक्सिकन जातीच्या साहाय्याने नवीन गव्हाच्या संकरीत जाती शोधून काढल्या जपानी आणि देशी वाणांशी संकर करून त्यांनी सोनेरी वर्णाचा दाणा असलेल्या कसदार गव्हाचा नवा वाण तयार केला आणि त्या वाणाचा देशभर प्रसार करण्यास उत्तेजन देऊन पाठपुरावा केला. त्यामुळे देशातील गव्हाचे उत्पादन अनेक पटींनी वाढले आणि देशात हरितक्रांतीला सुरुवात झाली. गव्हाबरोबरच तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, कापूस, शेंगदाणा, बटाटा या प्रमुख पिकांचेही उत्पन्न वाढू लागले. ऊस, द्राक्षे, सफरचंद, केळी, आंबा, पपई, पेरु, चिकू अशा फळांच्या उत्पन्नात वाढ झाली. अशा रीतीने तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतात काही उत्पादन वाढले. यामध्ये डॉ. स्वामिनाथन यांचे योगदान मोलाचे ठरते. डॉ. स्वामिनाथन यांनी त्यांच्या प्रारंभीच्या संशोधनात बटाट्याच्या बहुगुणीत जातींचे संशोधन केले. बर्फ पडल्यावर बटाट्याच्या पिकाची हानी होऊन प्रचंड नुकसान होणे ही त्यावेळची मुख्य समस्या होती. स्वामिनाथन यांनी सोलॅनम ॲक्युल या जंगली जातीतून हिमवर्षावातही प्रतिकार करून पिकाची हानी न होऊ देणारा जनुक वेगळा केला आणि सोलॅनम ट्युबरोजम या जातीशी संकर घडवून अलास्का फ्रॉस्टलेस ही नवी जात विकसीत केली. या जातीमुळे बटाट्याच्या उत्पादनात कमालीची वाढ झाल्याने ती अतिशय लोकप्रिय ठरली.

१७७० नंतर डॉ. स्वामिनाथन यांना इंदिरा गांधी यांनी अनेक राष्ट्रीय समित्यांवर सल्लागार म्हणून नेमले. राष्ट्रीय शेती आयोगाचे ते सदस्य होते. दारिद्य्र निर्मुलन प्रकल्पासाठीच्या तज्ञ समितीमध्ये त्यांचा सहभाग होता. कारण सरकाने विज्ञान-तंत्रज्ञान, वाणिज्य, शिक्षण क्षेत्रात त्यांचा वेळोवेळी सल्ला घेतला आहे. १९८०-९३ या काळात भातपिक आणि सागरी किनारपट्टीतील वनस्पती वैविध्य यांचे संरक्षण यांवरील संशोधनाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले होते.

डॉ. स्वामिनाथन यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील समित्यांमध्येही सहभाग राहिला आहे, तसेच वैज्ञानिक क्षेत्रातील संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. राज्यसभेचे ते सदस्यही होते. जीविज्ञान आणि अन्नधान्य संदर्भात उत्पन्न वाढीसाठी केलेल्या संशोधनामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी, गौरविण्यात आले. त्यात जीवविज्ञानावरील संशोधनाबद्दल शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक (१९६४), झेकोस्लाव्हाकियातील मेंडेल मेमोरियल पदक (१९६५), वनस्पती शास्त्रातील योगदानाबद्दल बिरबल सहानी पुरस्कार (१९६६), भारत सरकारचा पद्मश्री (१९६७), पद्मभूषण (१९७२) रामन मागसायसाय पारितोषिक (१९७३), बोर्लॉग पुरस्कार (१९७९), अल्बर्ट आइन्स्टाइन जागतिक विज्ञान पारितोषिक (१९८६), कृषि क्षेत्रातील नोबेल गणला जाणारा पहिला वर्ल्ड फूड प्राइझ पुरस्कार (१९८७), पद्मविभूषण टाइम साप्ताहिकाकडून विसाव्या शतकातील आशिया खंडाच्या इतिहासावर ठसा उमटविणाऱ्या अलौकिक वीस समावेश (१९९९), फ्रँक्लिन रुझवेल्ट फ्रीडम पुरस्कार (२०००), उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव याची डी.लिट. ही सन्मान्य पदवी (२०१३).

डॉ. स्वामिनाथन यांचे पुढील लिखान प्रसिध्द आहे : बिल्डिंग अ नॅशनल फूड सिस्टिम सायन्स ॲन्ड द काँक्वेस्ट ऑफ हंगर व्हीट रिव्होल्यूशन, ए डायलॉग सस्टेनेबल ॲग्रिकल्चर : टूवर्ड्स फूड सिक्युरिटी बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रीकल्चर सायन्स ॲन्ड हार्टग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट.

संदर्भ : 1. Who’s who 1974, Science today, October, 1971.

२. देऊळगावकर, अमुल स्वामिनाथन : मुकमुक्तीचा ध्यास, २०००.

३. डॉ. उ. के., मराठी विश्‍वचरित्रकोश.

४. , ह्यांनी घडवलं सहस्त्रक,.

धुमाळ, राजेंद्र