नायक, पुंडलिक नारायण : (२१ एप्रिल१९५२ – ).कोंकणीतील आघाडीचे कथाकार, कवी व नाटककार. वळवई, गोवा येथील मच्छीमारी समाजात जन्म. माध्यमिक शाळेत शिक्षक आणि त्याचबरोबर महाविद्यालयीन शिक्षण चालू आहे.रानसुंदरी (१९७४)ही मुलांसाठी लिहिलेली अभिनव गीत-कथा, गांवधनी गांवकार(१९७५)हाएकांकिकासंग्रह, गा आमी राखणे(१९७६)हा कवितासंग्रह व बांबर(म. शी. चिखल, १९७६)ही छोटी कादंबरी, एवढी त्यांची पुस्तके आजपर्यंत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या रानसुंदरीला गोवा कला अकादमीच्या बालसाहित्याचे पहिले पारितोषिक व कोंकणी भाषा-मंडळाचे नेहरू पारितोषिक मिळाले आहे. मीन पिकलां खांडयांनी ही खाण धंद्यावरील त्यांची कादंबरी जाग(१९७६–७७)या नियतकालिकात क्रमशः प्रसिद्ध होत आहे. खण, खण माती ह्या त्यांच्या तीन अंकी नाटकाला गोवा कला अकादमीच्या स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले.

 

त्यांनी नीति-अनीतीचे साहित्यिक संकेत झुगारून छोट्याच पण अत्यंत प्रत्ययकारी अशा लघुकथाही लिहिल्या आहेत. त्यांची शैली सुस्पष्ट व प्रभावी आहे. अस्सल ग्रामीण कोंकणीतील शब्दसंपदेचा ते परिणामकारक रीत्या उपयोग करतात. त्यांच्या काव्यात उच्चभ्रू समाजाच्या जुलूमाविरुद्ध बंडखोरी दिसून येते.

सरदेसाय, मनोहरराय