नटहॅच : हा पक्षी सिट्टीडी या पक्षिकुलातील आहे. संस्कृत भाषेत याला ‘शिलींध्री’ हे नाव दिलेले आढळते. उत्तर भारतात याला ‘कठफोडिया’ म्हणतात पण मराठीत याला नाव आढळत नाही. नटहॅचच्या दोन जाती भारतात आढळतात.

नटहॅचच्या पहिल्या जातीचे शास्त्रीय नाव सिट्टा कॅस्टानिया असे आहे. या जातीचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो. वरची बाजू पाटीसारख्या (स्लेट) निळ्या रंगाची व खालची गडद काळसर तांबूस असतेचोच लांब, मजबूत, टोकदार व काळी चोचीच्या बुडापासून डोळ्यांमधून खांद्यापर्यंत एक काळा पट्टा हनुवटीपासून कानांपर्यंत एक पांढरा पट्टाशेपटी अगदी आखूड असते.

नटहॅच (सिट्टा फ्राँटॅलिस)

दाट जंगलात व गावांच्या किंवा खेड्यांच्या भोवतालच्या दाट झाडीत अथवा आंबराईत हा राहतो. हा वृक्षवासी असून यांची जोडपी वा एकएकटे पक्षी असतात. हा अतिशय चपळ असून केव्हाही स्वस्थ बसलेला दिसत नाही भक्ष्य शोधीत झाडाच्या खोडावर अथवा फांद्यांवर सारखा हिंडत असतो. झाडाच्या सुटलेल्या सालीखाली, भोकात किंवा ढोलीत राहणारे कोळी, सुरवंट, अळ्या आणि किडे हा खातो.

यांच्या प्रजोत्पादनाचा काळ फेब्रुवारीपासून मेपर्यंत असतो. झाडाच्या ढोलीत पाने, शेवाळ, लोकर वगैरे घालून याचे घरटे तयार केलेले असते. ढोलीच्या भिंती हा चिखलाने लिंपतो व पुढच्या बाजूला लिंपणाच्या मध्यावर जाण्यायेण्याकरिता लहान वाटोळे भोक ठेवलेले असते. मादी २–६ पांढरी अंडी घालते. त्यांच्यावर तांबडे ठिपके असतात. नर व मादी दोघेही सगळ्या गृहकृत्यांत भाग घेतात.

नटहॅचच्या दुसऱ्या जातीचे शास्त्रीय नाव सिट्टा फ्राँटॅलिस असे आहे. पहिल्या जातीच्या पक्ष्याएवढाच हा असतो. वरची बाजू जांभळट निळी खालची फिक्कट करड्या जांभळट रंगाची कपाळावर आणि डोळ्यांच्या वर काळा पट्टा हनुवटी व गळा पांढरट चोच लाल डोळे पिवळे पाय तपकिरी. मादीच्या डोळ्यांच्या वर काळा पट्टा नसतो.

सपाट प्रदेशातील आणि डोंगरांवरील दाट जंगलात हा राहतो. डोंगराळ प्रदेशात १,५२५ मी. उंचीपर्यंत तो आढळतो. याच्या सगळ्या सवयी पहिल्या जातीच्या नटहॅचसारख्याच असतात.

यांच्या विणीचा हंगाम दक्षिणेत फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत आणि उत्तर भारतात एप्रिलपासून जूनपर्यंत असतो. पुष्कळदा हा तांबट व सुतार पक्षी यांनी वापरलेल्या ढोल्याच घरट्याकरिता उपयोगात आणतो. मादी ३–५  पांढरी अंडी घालते. त्यांच्यावर अंजिरी किंवा जांभळ्या रंगाचे दाट ठिपके असतात.

कर्वे,ज. नी.