अमरकोश : संस्कृतातील एक प्राचीन शब्दकोश. याच्या कर्त्याचे नाव अमरसिंह. याच्या जीवनाविषयी अधिकृत माहिती मिळत नाही. सहाव्या ते आठव्या शतकांत केव्हातरी हा होऊन गेला असावा, असे विंटरनिट्‌‌ससारख्या विद्वानांचे मत आहे. हा बौद्धमतानुयायी  होता, असे सर्वसाधारणतः मानले जाते. बौद्ध धर्माविरुद्ध भारतात जी चळवळ झाली तीत याचे अमरकोशाखेरीज इतर ग्रंथ नष्ट झाले, अशी एक आख्यायिका आहे. अमरकोशाची रचना अकारविल्हे केलेली नाही. हा छंदोबद्ध असून यातील श्लोक (सु. १,५००) विविध पदार्थांच्या वर्गानुसार तीन कांडांत विभागलेले आहेत. म्हणूनच यास क्वचित त्रिकांड अथवात्रिकांडी अशा नावांनीही संबोधिले जाते. ह्यात मुख्यत्वेकरून त्या त्या कांडात आलेल्या वर्गांशी संबंधित अशा शब्दांना समानार्थक शब्द देण्याची पद्धत अवलंबिलेली आहे. पहिल्याकांडात स्वर्गवर्ग, व्योमवर्ग, दिग्वर्ग, कालवर्ग, धीवर्ग, शब्दादिवर्ग, नाट्यवर्ग, पातालभोगिवर्ग, नरकवर्म आणि वारिवर्ग या वर्गांचा समावेश असून दुसऱ्यात भूमिवर्ग, पुरवर्ग, शैलवर्ग, वनौषधिवर्ग, सिंहादिवर्ग, मनुष्यवर्ग, ब्रह्मवर्ग, क्षत्रियवर्ग, वैश्यवर्ग आणि शूद्रवर्ग हे वर्ग येतात. तिसऱ्या कांडात विशेष्यनिघ्नवर्ग, संकीर्णवर्ग, नानार्थवर्ग, अव्ययवर्ग आणि लिंगादिसंग्रहवर्ग हे वर्ग आहेत. अमरकोशाच्या आरंभीच त्याची परिभाषा स्पष्ट करण्यात आली आहे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याच्या लिंगाची माहितीही यात मिळत असल्यामुळे यास नामलिंगानुशासन असेही म्हणतात. संस्कृत शब्दकोशांतून सर्वसाधारणतः आढळणारे स्यात्, भवेत् वगैरे पदपूरक शब्द अमरकोशात कमी आहेत. या कोशावर सु. पन्नास टीका लिहिल्या गेल्या. त्यांपैकी क्षीरस्वामीची अमरकोशोद्घाटन (सु. अकरावे शतक), बृहस्पती रायमुकुटमणीची अमरकोशपंजिकापदचंद्रिका (१४३१) आणि भानुजी दीक्षितांचीव्याख्यासुधा अथवा रामाश्रमी (सतरावे शतक) या विशेष प्रसिद्ध आहेत. अग्निपुराणात इतर विषयांबरोबरच एक कोश आला असून तो अमरकोशाची संक्षिप्त आवृत्ती असल्यासारखा दिसतो. अमरकोशातील काही श्लोक आणि चरण तर अग्निपुराणाने जसेच्या तसे घेतले आहेत.

संदर्भ : आचार्य, नारायणराम, संपा. नामलिंगानुशासनम्, मुंबई, १९५०.

 मेहेंदळे, म. अ.