मत्तविलास : एकांकी संस्कृत प्रहसन. कांचीचा (विद्यमान कांजीवरम्) पल्लववंशीय राजा, सिंहविष्णुवर्म्याचा पुत्र, महेंद्रविक्रम वर्मा हा त्याचा कर्ता. त्याच्या संबंधीचा स्पष्ट उल्लेख ह्या प्रहसनाच्या आरंभकात आढळतो. ह्या राजाचा निर्देश असलेल्या शिलालेखांतूनही मत्तविलासाचा कर्ता तोच असल्याचे दिसून येते. ‘गुणभर’, ‘अवनीभाजन’, ‘मत्तविलास’ आणि ‘शत्रुमल्ल’ अशा उपाधीही ह्या शिलालेखातून ह्या राजाला देण्यात आलेल्या असून त्या प्रत्यक्ष प्रहसनातही उल्लेखिलेल्या आहेत. इ. स. ६२० च्या सुमारास हा राजा कांचीवर राज्य करीत होता.

ह्या प्रहसनाचे कथानक थोडक्यात असे : सुरापानमत्त असा कपालीनामक एक शैव भिक्षेकरी आपल्या प्रियेसह कांचीत हिंडत असता, त्याचे भिक्षापात्र (शैव पंथाप्रमाणे एक मानवी कवटी) हरवते. एका ढोंगी बौद्ध भिक्षूवर तो चोरीचा आळ घेतो. दोघांचा झगडा चालू असता, एक भ्रष्ट पाशुपत मधे पडून, त्यांचा वाद तात्त्विक पद्धतीने सोडविण्याचा आव आणतो. शेवटी हे भिक्षापात्र उन्मत्तक नावाच्या एकाजवळ मिळते. ते त्याने एका बेवारशी कुत्र्यापासून हिसकावून घेतलेले असते. ते हाती आल्यावर कपालीसकट सारेजण आनंदित होतात.

ह्या प्रहसनात विनोद बेताचाच आहे पण आहे तो बोचरा आणि ढोबळ. लेखनात काव्यगुणही विशेष नाहीत. रचनेत भासनाटकांचे काही विशेष आढळतात पण जे आहे, त्यात अतिरेक वा अश्लिलता नाही. शिवाय मदिरेला मदनमूर्ती मानणारा कपाली, त्याच्या प्रियेवर नजर ठेवणारा पाशुपत, बुद्धाने स्त्रीसंग व सुरापान वर्ज्य मानल्याने कुरकुरणारा भिक्षू, बोलण्याचा तोल गेलेला उन्मत्तक ही पात्रे गमतीची आहेत. बुद्धधर्माचे तात्त्विक ज्ञानही बरेच प्रकटले आहे.

टी. गणपतिशास्त्री ह्यांनी ह्या प्रहसनाचे संपादन केलेले आहे (१९१७).

संदर्भ : 1. Dasgupta.S.N. De, S. K. A History of Sanskrit Literature,Classical Period, Calcutta, 1962.

2. Keith, A. B. Sanskrit Drama, Oxford, 1924.

भट, गो. के.