सीलेंटेरेटा : (आंतरगुही संघ). प्राणिसृष्टीतील बहुकोशिक अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघातील प्राणी प्रोटोझोआ व पोरिफेरा संघांतील प्राण्यांपेक्षा वरच्या पातळीचे, परंतु इतर प्राण्यांपेक्षा खालच्या पातळीचे आहेत. ⇨रुडोल्फ लोइकार्ट  हे या संघाचे जनक मानले जातात. यामध्ये सु. १०,००० जातींचा समावेश होतो. यातील जवळजवळ निम्मे जीवाश्मांच्या ( शिळारूप झालेल्या अवशेषांच्या ) स्वरूपात आढळतात. प्रोटोझोआमध्ये ऊतक ( समान रचना व कार्य असणारे कोशिकासमूह) नसतात, परंतु सीलेंटेरेटामध्ये ऊतक असतात.काही सीलेंटेरेट एकेकटे तर काही निवही (वसाहत करून राहणारे) प्राणी असतात. निवहांत पॉलिप व मेड्युसा या दोन प्रकारच्या अवस्था असतात. निवहामध्ये प्रत्येक प्राणी वेगवेगळी व ठराविक कामे करीत असतात आणि त्यांत कामाची विभागणी दिसून येते, याला बहुरुपता म्हणतात. सीलेंटेरेटा संघामधील काही थोडे प्राणी गोड्या पाण्यात तर बाकी सर्व समुद्रात राहतात. काही महासागरीय व काही समुद्रतटीय असतात तर काही समुद्राच्या खोल पाण्यात आढळतात. काही पॉलिप खडकाळ भागाला किंवा आधाराला चिकटलेले असतात तर काही स्वतःभोवती चुन्याचे आवरण तयार करून त्याच्यात राहतात. काही (मेड्युसे) मुक्तप्लावी (स्वैर पोहणारे) असतात. सीलेंटेरेट प्राणी सर्वत्र आढळतात. या संघात ओबेलिया, ⇨जेलीफिश, प्रवाळ [⟶ पोवळे ], ⇨समुद्रपुष्प, ⇨हायड्रा  इत्यादींचा समावेश केलेला आहे.

सीलेंटेरेटा संघातील हायड्रोझोआ व ॲक्टिनोझोआ या वर्गांमधील प्राण्यांचे जीवाश्म कँब्रियन संघाच्या खडकांत आढळतात. सिफोझोआ वर्गातील प्राण्यांचे अपुरे ठसे कँब्रियन, पर्मियन आणि जुरासिक संघांच्या खडकांत आढळतात. प्रवाळ जीवाश्मांचे खडक आयोवा, कॅनझस, केंटकी आणि यूरोपमध्ये समुद्राच्या किनारी आहेत. दागिने तयार करण्यासाठी व सजावटीसाठी प्रवाळ वापरण्यात येत असल्याने ते आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. मात्र आता त्यांची संख्या कमी होत असल्याने त्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

सीलेंटेरेट प्राण्यांची लक्षणे : शरीर व त्वचा : या प्राण्यांच्या शरीराचे खंडीभवन झालेले नसते. जवळजवळ सर्व प्राण्यांत अरीय सममिती आढळून येते परंतु ॲक्टिनोझोआमध्ये द्वि-अर सममिती आढळते. पॉलिप अवस्थेमधील प्राण्याचे शरीर पोकळ नळीसारखे असून एक टोक बंद असते. ते खडकाळ भागाला किंवा आधाराला चिकटलेले असते. दुसऱ्या टोकाला तों ड असून त्याभोवती संस्पर्शके असतात. अन्न मिळविणे व निवहाचे पोषण करणे हे त्याचे कार्य असते. मेड्युसा प्राण्याचे शरीर खोलगट बशीसारखे असून काठावर संस्पर्शके असतात. अंतर्गोल पृष्ठाच्या मध्यभागी एक प्रक्षेप असून त्याच्या टोकाला तोंड असते. शरीरात असलेल्या स्नायूकोशिकांमुळे शरीराचे व संस्पर्शकांचे आकुंचन व प्रसरण होत असते.

सीलेंटरेट प्राण्यांच्या त्वचेचे बाह्यत्वचा, जठरचर्म व यांच्यामधील मध्यश्लेषस्तर असे मुख्य तीन स्तर असतात. काही वेळेला मध्यश्लेषस्तरात बाह्यत्वचा व जठरचर्म यांतील कोशिका येतात. बाह्यत्वचेत ⇨दंशकोशिका, उपकला कोशिका, स्नायू कोशिका आणि तंत्रिकाकोशिका असतात. जठरचर्मात उपकला कोशिका, ग्रंथी कोशिका, कशाभिका कोशिका व संवेदी कोशिका असतात.

हालचाल : प्राण्याचे चलन मुख्यतः शरीराची ठेवण, आकार व राहण्याचे ठिकाण यांवर अवलंबून असते. कंकाल असलेल्या पॉलिपामध्ये चलन हळूहळू होत असते. कंकाल नसलेला पॉलिप संस्पर्शकांच्या साहाय्याने खडकाळ भागावर सरपटत जाऊ शकतो. याच संस्पर्शकांच्या मदतीने तो पोहू शकतो. खडकाळ भागात तो कोलांट्या उड्या मारीत बराचसा भाग आक्रमतो. जेलीफिश पाण्यात पोहतात. ॲक्टिनोझोआ वर्गातील बहुतेक प्राणी खडक व मॉलस्कांची कठीण कवचे यांच्यावर किंवा दुसऱ्या काही आधारावर आयुष्यभर राहतात. काही प्रकारचे समुद्रपुष्प व शंखवासी खेकडा यांच्यात ⇨सहभोजिता  आढळून येते.काही सीलेंटेरेट प्राण्यांच्या ऊतकांत शैवाल आढळतात व त्यांच्यात ⇨सहजीवन    आढळून येते.

अन्नग्रहण : सीलेंटेरेटा संघातील जवळजवळ सर्व प्राणी मांसाहारी आहेत. या प्राण्यांच्या संस्पर्शकांवरील दंशकोशिकांच्या दंशाने एक प्रकारचे विषारी द्रव्य भक्ष्याच्या शरीरात टोचले जाऊन ते अर्धमेले होतात. हे भक्ष्य संस्पर्शकांच्या मदतीने तोंडापर्यंत नेले जाते. तेथून तंतुमय स्नायू कोशिकांच्या आकुंचन व प्रसरणामुळे ते पोटात जाते. हा प्रकार हायड्रोझोआ व ॲक्टिनोझोआ वर्गातील जवळजवळ सर्व प्राण्यांत आढळतो. काही सीलेंटेरेट प्राण्यांत विशेषतः सिफोझोआ वर्गात भक्ष्य प्राण्याजवळ आले असता ते श्लेष्मलस्रावात अडकवून नंतर ⇨पक्ष्माभिकांच्या मदतीने तोंडापर्यंत नेले जाते.

सीलेंटेरेट प्राण्यांचे भक्ष्य विविध प्रकारचे असते उदा., प्लवक, कृमी, क्रस्टेशिया वर्गातील प्राणी, मासे, माशांची अंडी इत्यादी. खाल्लेल्या अन्नाचे पाचन पचन गुहिकेत (आंतर गुहिकेत) होते. हायड्रासारख्या प्राण्यांत आंतरकोशिकी व कोशिकाबाह्य पाचन आढळून येते. समुद्रपुष्पामध्ये उपकलेतील एका विशिष्ट पट्ट्यात व आंत्रयोजनीच्या तंतूवर पाचक ग्रंथी असतात.

ज्ञानेंद्रिये : आजूबाजूच्या वातावरणातील उद्दीपनांचे आकलन होण्याकरिता सीलेंटेरेटांमध्ये काही ज्ञानेंद्रिये असतात. ज्ञानेंद्रिये वेगवेगळ्या कोशिकांशी संलग्न असतात. संवेदी कोशिका व त्यांच्यापासून निघणारे संवेदी तंतू यांचे जाळे सर्व शरीरभर पसरलेले असते. हे संवेदी तंतू स्नायू कोशिकांना जोडलेले असतात. हे जाळे काही ठिकाणी दाट व काही ठिकाणी विरळ असते. असे जाळे असल्यामुळे कोणत्याही एका ठिकाणी स्पर्श झाला असता आकुंचनाची लाट सर्व शरीरभर पसरते.

काही सीलेंटेरेट प्राण्यांत ठराविक कोशिका प्रकाशसंवेदी असतात, त्यांना दृक्-बिंदू ( ऑसेली ) म्हणतात. काहींत या विकसित होऊन डोळ्यांसारखे काम करतात. दुसऱ्या प्रकारचे ज्ञानेंद्रिय म्हणजे संतुलन-पुटी. तिच्यात संतुलनाश्म असतात. शरीराचा तोल सांभाळणे हे संतुलनपुटीचे काम आहे.

प्रजोत्पादन :सीलेंटेरेटांमध्ये अनेक प्रकारचे प्रजनन आढळून येते. हायड्रासारख्या प्राण्यांत लैंगिक व अलैंगिक दोन्ही प्रकारचे जनन आढळून येते. अलैंगिक प्रकारांत अनुदैर्घ्य ( लांबीच्या दिशेतील ) व अनुप्रस्थ विखंडन आढळून येते. विखंडित दोन्ही भाग अपूर्ण असतात. प्रत्येक विखंडित भाग उरलेला भाग उत्पन्न करून पूर्ण हायड्रा तयार होतो. यालाच पुनरुद्‌भवनाची शक्ती असे म्हणतात. मुकुलनानेही ( शरीरावर अंकुरासारखे बारीक उंचवटे येऊन त्यांपासून नवीन प्राणी तयार होण्याच्या क्रियेने) हायड्राचे जनन होते. लैंगिक प्रकारच्या जननात अंडाणू व शुक्राणू तयार केले जाऊन निषेचित अंडाणूचा विकास होत जाऊन हायड्रा तयार होतो.


 ओबेलिया प्राण्याच्या निवहांत अलैंगिक क्रियेने व मुकुलनाने नवीन पॉलिप उत्पन्न होत असतात. पॉलिपापासून वेगळ्या रुपाचे मुक्तजीवी प्राणी (मेड्युसे) तयार होतात. काही मेड्युसे अंडाणू उत्पन्न करतात, तर काही मेड्युसे शुक्राणू उत्पन्न करतात. अंडाणूचे निषेचन होऊन निर्माण झालेला जीव एखाद्या आधाराला चिकटतो व त्याच्यापासून पॉलिप तयार होतो. पॉलिपापासून मुकुलनाने ओबेलियाच्या निवहाची वाढ होते व त्याचे जीवनचक्र पूर्ण होते.

पॉलिप अलैंगिक जननाने पॉलिपाला किंवा मेड्युसाला जन्म देतो व मेड्युसा लैंगिक जननाने पॉलिपाला जन्म देतो. याला पिढ्यांचे एकांतरण असे म्हणतात [⟶एकांतरण, पिढ्यांचे]. या क्रियांमध्ये होणारे विदलन पूर्णभंजी असते. डिंभ पक्ष्माभिकामय असून त्याला ‘प्लॅन्यूला’  म्हणतात.

वर्गीकरण : कोशिकेतील रचना व लक्षणे आणि जीवनचक्रातील अवस्था यांतील फरकांमुळे या संघाचे तीन वर्ग करण्यात आले आहेत, ते पुढीलप्रमाणे : (१) ॲक्टिनोझोआ, (२) सिफोझोआ, (३) हायड्रोझोआ.

ॲक्टिनोझोआ : (अँथोझोआ). या वर्गात प्रवाळ व समुद्रपुष्प यांचा समावेश केला आहे. याच्यात सर्व पॉलिप असतात मेड्युसा पिढी नसते. तोंड मुखपथात उघडते. बहुतेक प्राण्यांत ग्रसिका-खाच असते. आंत्र उभ्या पटांमुळे विभागलेले असते. त्यांच्या आतील कडांवर दंशकोशिका असतात. मध्यश्लेषस्तर संयोजी ऊतकांचा झालेला असतो व जनन-ग्रंथी पटांमध्ये असतात. ॲक्टिनोझोआ वर्गात ऑक्टोकोरॅलिया व झोअँथेरिया या दोन उपवर्गांचा समावेश होतो [⟶ ॲक्टिनोझोआ].

(१)ऑक्टोकोरॅलिया : या उपवर्गातील प्राण्यांत पिच्छाकार शाखित स्पर्शके अनेक व आठच्या पटीत असतात. अधर ग्रसिका-खाच असते. हे निवही प्राणी आहेत. या उपवर्गाचे खालीलप्रमाणे सहा गण आहेत.

स्टोलोनीफेरा : पॉलिप देहांकुरापासून उगवतात. कंटिकांचे कंकाल असते. उदा., ट्युबिपोरा, काही प्रवाळ व क्लॅव्ह्युलेरिया.

टेलेस्टॅसिया : प्रत्येक अक्षीय पॉलिपाला पार्श्वपॉलिप असतात. उदा., टेलेस्टो.

ॲल्सायोनेरिया : पॉलिपांचा खालचा भाग संयुक्त होऊन त्याचा मांसल भाग तयार होतो. त्यांचा मुखीय भाग बाहेर दिसतो. कंकाल अक्षीय नसतो. तो चुन्याच्या कंटिकांचा झालेला असतो. उदा., अँथोमॅस्टस  व ॲल्सिओनियम.

हेलिओपोरेशिया : ( सिनोथेकेलिया ). कंकाल मोठा व रवेदार चुन्याचा असतो. उदा., हेलिओपोरा.

गॉर्गोनेरिया : प्रवाळ शृंगी निवह वनस्पतींप्रमाणेच दिसणारे कंकाल अक्षीय व चुन्याच्या कंटिकांचे असते. पॉलिप लहान असतात. उदा., कोरॅलियम   व लाल प्रवाळ.

पेनॅट्युलॅरिया : निवह मांसल असतात. एका मोठ्या अक्षीय पॉलिपाला अनेक द्विरुपी पॉलिपे असतात. कंकाल चुन्याचे असते. उदा., पेनॅट्युला, सी-पेन व रेनीला.

(२)झोअँथेरिया : (हेक्झॅकोरॅलिया). या उपवर्गातील प्राण्यांत स्पर्शके अनेक परंतु कधीही आठ नसतात. कधीकधी ते शाखित असतात. ग्रसिका-खाच दोन, एक किंवा एकही नसते. कंकाल असल्यास भरीव असतो. याचे खालीलप्रमाणे पाच गण आहेत.

ॲक्टिनिएरिया : कंकाल नसतो. पॉलिप कोशिकीय स्तंभाकार असतो. पादबिंब असते. विभाजक पट नेहमी सहा किंवा सहाचे गुणक. उदा., मेट्रिडियम, गोनॅक्टिनिया, ॲडॅम्‌सिया, एडवर्डसिया  इत्यादी.

मॅड्रेपोरॅरिया : (स्क्लेरॅक्टिनिया). याचे प्रवाळ दगडासारखे असतात. पॉलिप लहान असून स्पर्शके सहा किंवा सहाचे गुणक असतात. मुखपथात ग्रसिका-खाच नसते. स्नायू क्षीण. बरेच प्राणी निवही असतात. उदा., फंजिया, बॅलॅनोफाय्‌लिया, ॲस्ट्रॅजिया ॲक्रोपोरा   इत्यादी.

झोअँथीडिया : कंकाल व पादबिंब नसते. आधारित देहांकुराने पॉलिप जोडलेले असतात. काही प्राणी अकशेरुकी प्राण्यांच्या बाह्य भागावर आढळतात. उदा., एपिझोअँथस.

 

अँटिपॅथेरिया : काळे प्रवाळ कंकाल वृक्षासारखा व शृंगी स्पर्शके सहा. उदा., अँटिपॅथस.

सेरिअँथेरिया : नाजूक, लांब, समुद्रपुष्पासारखे तसेच दोन गोलाकार समूहात अनेक स्पर्शके असतात. पादबिंब नसते. मुखपथात एक ग्रसिका-खाच असते. उदा., सेरिअँथस.


 सिफोझोआ :सर्व जेलीफिशांचा समावेश या वर्गात केला आहे. यामधील मेड्युसांचा आकार छत्रीसारखा किंवा घंटेसारखा असतो. शरीराचे एकसारखे चार भाग होऊ शकतात. मध्यश्लेषस्तर श्लेषी असतो. घंटेच्या कडेला सारख्या अंतरावर खाचा असून त्यात संतुलनपुटी असते. जठर-वाहिनी-गुहेला कोष्ठ असतात. मेड्युसा लैंगिक व एकलिंगाश्रयी असतात. जनन-ग्रंथी जठरगुहेत असतात. पॉलिप पिढी जवळजवळ नसते. मेड्युसांचे पुनरुत्पादन अनुप्रस्थ विखंडनाने होते. या वर्गाचे खालील चार गणात विभाजन होते. [⟶ सिफोझोआ].

स्टॉरोमेडूसी : (लूसरनॅरिडा). या गणातील मेड्युसांचा आकार श्लेष्मकोशिकेप्रमाणे असतो. या स्थानबद्घ असून समुद्रातील वनस्पतींना मुखीय वृंताने चिकटलेल्या असतात. उदा., हेलिक्लिस्टस लूसरनॅरिया.

क्यूबोमेडूसी : घंटा घनाकृती व कडा आत वळलेल्या असतात. स्पर्शके चार किंवा चारच्या गटाने आढळतात. उदा., तॅमोया.

 

कॉरोनेटी : घंटेभोवती गोलाकार खाच असते. खोल पाण्यात आढळतात. उदा., पेरिफाय्‌ला व नॉसिथोई.

डिस्कोमेडूसी : (सिमॅओस्टोमी). तोंडाच्या चार कोपऱ्यांतून चार खाचेसारखे मुखीय बाहू निघालेले असतात. उदा., जवळजवळ सर्व जेलीफिश, ऑरेलिया, पेलॅजिया  व ऱ्हायझोस्टोमा.

हायड्रोझोआ : या वर्गातील प्राण्यांत मुखपथ नसतो. आंत्रात विभाजक व दंशकोशिका नसतात. मध्यश्लेषस्तर अकोशिक असतो. मेड्युसाला गुंठिका असते. हे एकेकटे किंवा निवहांत उथळ पाण्यात आढळतात. या वर्गामध्ये खालीलप्रमाणे चार गणांचा समावेश होतो. [⟶ हायड्रोझोआ].

हायड्रॉयडिया : पॉलिप पिढी विकसित झालेली असते. या गणातील प्राणी एकेकटे किंवा निवह करून राहतात. मुकुलनाने दृक्-बिंदू व संतुलनपुटी असलेले मेड्युसे तयार होतात. या गणात हायड्रा, क्लोरोहायड्रा    पेल्मॅटोहायड्रा  ह्या गोड्या पाण्यातील प्राण्यांचा आणि कॉरिमॉर्फा,ट्युब्युलेरिया, बोगनव्हिलिया, ओबेलिया व पॉलीऑर्किस   ह्या सागरी प्राण्यांचा समावेश होतो.

हायड्रोकोरॅलिना : पॉलिप अगदी लहान द्विरुपी (गॅस्ट्रोझोऑइड्स व डॅक्टिलोझोऑइड्स ) असतात. कंकाल चुन्याचे असते. उदा., मिलेपोरा, स्टाय्‌लॅन्थिका   इत्यादी.

ट्रॅकिलिना : पॉलिप पिढी जवळजवळ नसते. मेड्युसाला गुंठिका असते. घंटेच्या वरच्या कडांना संस्पर्शके असतात. संतुलनपुटी असते. उदा., गोनिओनेमस, ॲग्लॅन्था, लिरिओप  व सोल्मॅरिस.

सायफोनोफोरा : या गणातील निवह पोहणारे असून त्यांच्या तोंडाभोवती संस्पर्शके नसतात. वरच्या टोकाला फुग्यासारखा भाग असतो. अनेक दंशकोशिका असतात. मेड्युसे एका देठासारख्या किंवा चकतीसारख्या भागाला चिकटलेले असतात. उदा., फायजेलिया, पॉरपिटा, व्हेलेला  

इ. महासागरीय जलाशयात आढळणारे प्राणी. [⟶ सायफोनोफोरा].

पहा : प्राणिसृष्टीचे संघ व वर्ग.  

जोशी, मीनाक्षी र.