आरण्यके व उपनिषदे : ‘आरण्यक’ म्हणजे अरण्यातच ज्या ब्राह्मणभागाचे किंवा वेदभागाचे पठण करावयाचे तो भाग. मुळात उपनिषदे हीच आरण्यके होत. अनेक प्राचीन उपनिषदे वर्तमान आरण्यकांचे भाग आहेत. उपनिषद म्हणजे गुरुसन्निध बसून शिकावयाची अध्यात्मविद्या. उपनिषदाचा हा व्युत्पत्यर्थ असला, तरी उपासना, रहस्य किंवा गूढ ज्ञान असाही त्याचा अर्थ आहे. उपनिषदे व आरण्यके म्हणजेच ‘वेदान्त’, म्हणजे वेदांचा अखेरचा भाग होय. वेदान्त हा शब्द मुख्यतः उपनिषदांना लागत असला, तरी ब्रह्मसूत्रे व त्यांवरील आचार्यांची भाष्ये, त्याचप्रमाणे स्वतंत्र रीतीने लिहिलेले त्याच विषयावरील ग्रंथ ह्यांनाही लागतो. हा शब्द मुळात वाच्यार्थाने आरण्यके व उपनिषदे यांनाच लागतो व त्यांवरील विवेचनाला आणि तदनुसारी विचारांना तो लक्षणेने लागतो.

सर्व आरण्यके ही ब्राह्मणग्रंथांची अखेरची प्रकरणे होत. आरण्यकांतील तत्त्वज्ञानप्रधान प्रकरणे उपनिषदे म्हणून विशेषतः निर्दिष्ट केली गेली आहेत. अगदी प्राचीन काळी आरण्यक व उपनिषद हे दोन्ही शब्द पर्यायशब्द होते. आज प्रसिद्ध असलेली प्राचीन उपनिषदे ज्या आरण्यकांचे भाग आहेत, त्यांतील उपनिषदांव्यतिरिक्त भागांनाही उपनिषद ही संज्ञा आरण्यकांमध्ये दिलेली दिसते. शतपथ ब्राह्मणाचा भाग असलेले बृहदारण्यक म्हणजे मोठे आरण्यक, हेच बृहदारण्यकोपनिषद म्हणून निर्दिष्ट केले जाते. आज प्रसिद्ध असलेल्या ऐतरेयोपनिषदाच्या पूर्वीचा ऐतरेयारण्यकाचा भागही त्या उपनिषदाचा भाग समजला जात होता त्यावर आद्य शंकराचार्यांनी केलेले भाष्य उपलब्ध आहे. जैमिनीय उपनिषद्‌ब्राह्मणाचा केनोपनिषद  हा भाग आहे. जैमिनीय उपनिषद्‌ब्राह्मण  हे आरण्यक आहे व त्यासच उपनिषद ही संज्ञा आहे.

पाणिनी व बुद्ध यांच्यापूर्वी (सु. इ. स. पू. ६ वे शतक) म्हणजे ब्राह्मणकालाच्या अखेरीस आरण्यके व प्राचीन तेरा किंवा चौदा उपनिषदे निर्माण झाली, याबद्दल बहुतेक संशोधकांचे एकमत आहे. वानप्रस्थ व संन्यासी यांनीच ही अरण्यात पठण करावी अशी कल्पना उपनिषत्कालीच निर्माण झाली असली, तरी औपनिषद तत्त्वज्ञानाची किंवा विचारांची चर्चा ग्रामांत व नगरांत होत होती, असे उपनिषदातील चर्चाप्रसंगांच्या वर्णनांवरून लक्षात येते. उदा., जनक राजाने भरविलेल्या वादसभेत झालेल्या अनेक ब्रह्मवेत्त्यांच्या चर्चेचा वृत्तांत व जनकाच्या महालात झालेल्या चर्चांचाही वृत्तांत बृहदारण्यकात (अध्याय ३ व ४) आलेला आहे. अश्वपती कैकेय याच्या राजमहालात झालेली अनेक ब्रह्मवेत्त्यांची आत्मा व ब्रह्म यांची चर्चा छांदोग्योयनिपदात (अध्याय ५) आली आहे.

आज प्रसिद्ध असलेली आरण्यके सहा आहेत. ऋग्वेदाचे ऐतरेयारण्यक व कौषीतकी किंवा शांखायनारण्यक, कृष्णयजुर्वेदाचे तैत्तिरीयारण्यक, शुक्‍लयजुर्वेदाचे बृहदारण्यक, सामवेदाचे जैमिनीय उपनिषद्‌ब्राह्मण आणि कृष्णयजुर्वेदाच्या मैत्रायणीय शाखेचे मैत्रायणीयोपनिषद किंवा आरण्यक  ही ती होत. मैत्रायणीयोपनिषद फारसे प्राचीन नसावेब्रह्मसूत्रांच्या संदर्भात भाष्यकारांनी कोठेही त्याचा वचनोद्धार केलेला दिसत नाही त्याचप्रमाणे त्यातील संसार दुःखमय आहे, हा प्रधान विचार व इतरही अनेक भाग बुद्धोत्तरकालीनतेचे निदर्शक आहेत परंतु मॅक्स म्यूलरने याही उपनिषदाचे प्राचीन उपनिषदांच्या बरोबरच भाषांतर केले आहे. ऐतरेयारण्यकाऐतरेयोपनिषद, शांखायनारण्यकाकौषीतकी उपनिषद, तैत्तिरीयारण्यकात तैत्तिरीय उपनिषदमहानारायणोपनिषद, जैमिनीय उपनिषद्‌ब्राह्मणात केनोपनिषद अंतर्भूत आहेत. परंतु बृहदारण्यकोपनिषद  व मैत्रायणीयोपनिषद  ही सबंध आरण्यकेच होत. महानारायणोपनिषद हे सूत्रकालाच्या आरंभी तैत्तिरीयारण्यकाला जोडले असावे, असा संशोधकांचा कयास आहे. छांदोग्योपनिषदही तांड्य  या सामवेदीय ब्राह्मणाचे आरण्यकच असावे, असे त्याच्या रचनेवरून दिसते. आरण्यक म्हणून निर्दिष्ट असलेली उपनिषदे व इतर आरण्यकसमकालीन प्राचीन उपनिषदे पुढीलप्रमाणे होत : ईशोपनिषद हे शुक्‍लयजुर्वेद संहितेचा अखेरचा अध्याय होय. ईश  व इतर प्राचीन उपनिषदे म्हणजे केन, कठ किंवा काठक, प्रश्न, मुंडक, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य, बृहदारण्यक, कौषीतकीश्वेताश्वतर  ही उपनिषदे सर्व उपनिषदांमध्ये प्राचीन अर्थात ब्राह्मणकालीन होत. केन प्रश्न  यांत गद्य व पद्य अशा दोन्ही शैलींचे भाग आहेत. ईश, कठ, मुंडक श्वेताश्वतर ही उपनिषदे प्रामुख्याने श्लेकात्मक आहेत. पद्यात्मक उपनिषदे प्राचीन उपनिषदांतील गद्यात्मक असलेल्या बाकीच्या उपनिषदांपेक्षा आधुनिक असावीत असे काहींचे मत आहे. गद्यातमक उपनिषदांत काही श्लोकही आले आहेत म्हणून पद्यात्मक उपनिषदे गद्योत्तरकालीन आहेत असे म्हणता येत नाही. श्लोकात्मक म्हणजे छंदोबद्ध रचना ही ऋग्वेदापासून चालत आलेली आहेगद्य आधीचे होय असे म्हणता येत नाही. परंतु वरील पद्यात्मक काही उपनिषदे गद्योत्तरकालीन असण्याची शक्यता नाकारता येत नाही, एवढेच. आद्य शंकराचार्यांचे उपर्युक्त श्वेताश्वतरउपनिषदाशिवाय अन्य उपनिषदांवर भाष्य आहे. त्याशिवाय माण्डूक्योपनिषदावरही त्यांचे भाष्य आहे. माण्डूक्योपनिषदाचा काल निश्चित नाही परंतु त्याच्यावर गौडपादांच्या कारिका असल्यामुळे ते बरचसे प्राचीन असावे. शंकराचार्यांनी जाबालोपनिषदाचा ब्रह्मसूत्रभाष्यात उल्लेख केला आहे त्यावरून तेही प्राचीन उपनिषद असावे असे म्हणता येते. त्याशिवाय परमहंस, सुबाल, गर्भ, अथर्वशिरस, वज्रसूचि  मह हीही उपनिषदे प्राचीन होत, असे काहींचे मत आहे परंतु ब्रह्मसूत्रावरून हे सूचित होत नाही. ही प्राचीन उपनिषदे सोडून सुमारे दोनशे उपनिषदे उपलब्ध आहेत. सर्वसाधारणतः योग, संन्यासविधी, भक्ती, जप, विष्णूचे अवतार, शंकर, गणपती, देवी इत्यादीकांचा महिमा यांचे वर्णन ह्या निरनिराळ्या उपनिषदांत आहे. ह्यांतील बरीच उपनिषदे पौराणिक विषयांना वाहिलेली आहेत, म्हणून ती अर्वाचीन असावीत यात शंका नाही.

ब्राह्मणग्रंथांमध्ये मुख्य भाग हा यज्ञप्रक्रिया सांगणारा आहे व ती प्रक्रिया सांगणारे ब्राह्मणकार पौरोहित्याचा व्यवसाय करणारे होते परंतु आरण्यके व उपनिषदे यांतील विचार सांगणाऱ्यांत पुरोहितांबरोबर इतर व्यवसायी ब्राह्मणेतरही दिसतात. वानप्रस्थ व संन्यास यांचा अधिकार ब्राह्मणेतरांनाही वेदकाली मान्य होता किंबहुना अरण्यवासी लोकांत गृहस्थाश्रम वा यज्ञकर्म न करणारे असेही लोक प्रमुख होते, असे अनुमान करण्यास फार मोठा आधार आहे. शांखायनारण्यकात असा स्पष्ट उल्लेख आहे, की प्राचीन तपस्वी व चिंतक मुनी प्रजेची व यज्ञाची कामना करीत नव्हते आम्हाला त्याची गरज नाही, असे ते म्हणत होते.

छांदोग्योपनिषदात राजा अश्वपती कैकेय व बृहदारण्यकोपनिषदात सम्राट जनक यांच्याकडे यज्ञकर्ते ब्राह्मण तत्त्वज्ञान शिकण्याकरिता येत असत, असे वर्णिले आहे. छांदोग्योपनिषदात म्हटले आहे, की ही अध्यात्मविद्या क्षत्रियांकडेच असल्यामुळे तिच्या सामर्थ्याने क्षत्रियांचे शासन या जगात स्थापित झाले. यावरून काही जर्मन संशोधकांचे असे मत झाले, की वैदिक यज्ञकर्त्या ब्राह्मणांना उपनिषद तत्त्वज्ञान क्षत्रियांनीच प्रथमतः शिकवले. स्त्रियाही ब्रह्मवेत्त्या होत्या. गार्गी वाचक्‍नवी ही ब्रह्मवेत्त्यांच्या सभेत तात्त्विक वादविवाद करते, असे बृहदारण्यकात वर्णन आले आहे. चैत्ररथ राजा हा शूद्र होता व तो गाडीवान रैक्वाकडे अध्यात्मविद्या शिकण्याकरिता गेला असे छांदोग्यात म्हटले आहे. सत्यकाम जाबालाला आपले गोत्र काय व पिता कोण हे माहीत नव्हते. तरीही हारिद्रुमत गौतम ऋषीने त्याचे उपनयन करून त्याला ब्रह्मविद्या शिकवली. आरुणेय उद्दालकाचा वेदविद्यासंपन्न पुत्र श्वेतकेतू हा पित्यासह पांचालांच्या समितीत त्यांचा राजा प्रवाहण जैवली याच्याकडे पंचाग्निविद्यानामक अध्यात्मविद्या शिकण्याकरिता गेला, असे छांदोग्यात म्हटले आहे.


आरण्यकांचे वा प्राचीन उपनिषदांचे उपासना व तत्त्वज्ञान हे मुख्य विषय आहेत. उपासना म्हणजे ध्यान होय. या ध्यानाचे मुख्य विषय प्राण, आत्मा वा सगुणब्रह्म हे होत. उदा., ऐतरेयारण्यकात महाव्रत नामक यज्ञाचे स्वरूप व त्यामध्ये म्हणावयाच्या उक्थ किंवा शस्त्रनामक ऋचांचे आध्यात्मिक अर्थ सांगितले आहेत. ते अर्थ ध्यानी घेऊन महाव्रतकर्म केल्याने विशेष फलप्राप्ती होते, असे सांगितले आहे. हे अर्थ ध्यानात घेणे ही कर्मांग उपासना होय. महाव्रतकर्मात शस्त्रसंज्ञक ऋचांचे विविध समुदाय आहेत. त्या भिन्न भिन्न समुदायांना प्रौग, मरुत्वतीय, निष्केवल्य इ. नावे आहेत. निष्केवल्य शस्त्रनामक मंत्रसमुदाय म्हणत असताना तो समुदाय सगुण परमात्मारूप पक्ष्याच्या आकाराचा आहे, असे समजून त्याची उपासना करण्यास सांगितले आहे. ते सर्वच मंत्रसमुदाय सगुण परमात्मा म्हणजे सुवर्णमय पुरुष होय, असे समजूनही ध्यान करावयास सांगितले आहे. या ध्यानाच्या योगाने ध्यानकर्ता परलोकी सुवर्णमय पुरुष (सगुण परमात्मा) बनतो, असे फल सांगितले आहे. हाच मंत्रसमुदाय प्राणरूप आहे, आत्मरूप आहे, अशी ही उपासना सांगितली आहे. आत्मरूप म्हणजे उपासकाचे स्वरूप. त्याचप्रमाणे हा उपासक कालात्मक आणि अग्न्यादी देवतात्मक आहे, अशा प्रकारचे ध्यान विहित केले आहे. शांखायनारण्यकात व तैत्तिरीय उपनिषदात संहितानामक उपासना सांगितल्या आहेत. उदा., अवरपरा संहिता. वाणीचा प्राणाशी, प्राणाचा वायूशी, वायूचा विश्वेदेवांशी, विश्वेदेवांचा स्वर्गलोकाशी व स्वर्गलोकाचा ब्रह्माशी संयोग म्हणजे अवरपरा संहिता आहे. असे ध्यान केले म्हणजे प्रजा, पशू, यश, ब्रह्मवर्चस् व स्वर्गलोक यांच्याशी ध्यानकर्त्याचा संयोग होतो, अशी फलप्राप्ती सांगितली आहे. अग्निहोत्र, दर्शपूर्णमास, सोमयाग, अश्वमेध इ. यज्ञकर्मे प्रत्यक्ष न करता तत्संबंधी विशिष्ट गुणयुक्त ध्यान केल्याने त्या यज्ञांची फले प्राप्त होतात, असे आरण्यकांमध्ये म्हटले आहे. उदा., शांखायनारण्यकात आध्यात्मिक अग्निहोत्र, छांदोग्योपनिषदात आध्यात्मिक सोमयाग आणि बृहदारण्यकात अश्वमेधाची विश्वात्मता उपासनाविषय म्हणून सांगितली आहे. आध्यात्मिक अग्निहोत्र असे : प्राण हा आहवनीय अग्नी, अपान गार्हपत्य अग्नी, व्यान हा अन्वाहार्य पचननामक अग्नी, मन हे धूम, मन्यू म्हणजे अंगार, श्रद्धा ही दूध, वाणी ही समिधा, सत्य ही आहुती, जीवात्मा हा रस. अशा प्रकारची उपासना केल्यास स्वर्गलोक प्राप्त होतो.

कर्मकांडास फाटा देण्याची कल्पना ज्या वैदिकांमध्ये आली त्यांनी कर्मकांडाच्या ऐवजी ध्यानात्मक उपासनेनेच कर्मकांडाची फलनिष्पत्ती होते, असा विचार मांडला, असे आरण्यकातील कर्मकांडविषयक उपासनांवरून सिद्ध होते.

तत्त्वज्ञान : ब्रह्म किंवा परमात्मा हा उपनिषदांचा मुख्य विषय. उपनिषदांतील तत्त्वज्ञानात्मक विचारांची पद्धती दोन प्रकारची आहे. एक उपदेशात्मक व दुसरी युक्तिवादात्मक. युक्तिवाद व उपदेश हे काही ठिकाणी एकमेकांत मिसळले आहेत. छांदोग्य उपनिषदात सहाव्या व आठव्या अध्यायांत आणि बृहदारण्यकातील याज्ञवल्क्य-मैत्रेयी संवादात उपदेशाबरोबरच युक्तिवादही सांगितला आहे परंतु कठोपनिषदात आत्मज्ञान तर्काने म्हणजे युक्तिवादाने प्राप्त होत नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. आत्मा किंवा ब्रह्म स्वयंप्रकाश आहे, त्याचा साक्षात्कार होतो, असे बृहदारण्यकात म्हटले आहे. याचा अभिप्राय शंकराचार्य असा सांगतात, की प्रत्यक्षरूप अनुभव म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण मिळाल्यावर शंका किंवा प्रश्नच शिल्लक राहत नाही. उपनिषदांच्या तत्त्वज्ञानामध्ये विश्वसृष्टीची उत्पत्ती व रचना, जीवात्म्याचे स्वरूप, आत्मतत्त्व व ब्रह्मतत्त्व, जीवात्म्याची गती किंवा पुनर्जन्म व मोक्ष हे विषय येतात. ब्रह्मरूप किंवा आत्मरूप सत्‌तत्त्वातून सृष्टीची उत्पत्ती क्रमाने सांगितली आहे. छांदोग्य उपनिषदात प्रथम आत्मा म्हणजे सत्‌तत्त्व. त्यातून क्रमाने तेज, जल व पृथ्वी झाल्याचे सांगितले आहे. तैत्तिरीय उपनिषदात आत्मा प्रथम, नंतर अनुक्रमे आत्म्यातून आकाश, वायू, अग्नी, जल अथवा आपस्, पृथ्वी, ओषधी-वनस्पती, अन्न आणि मनुष्य अशी उत्पत्ती सांगितली आहे. छांदोग्य उपनिषदात तेज, जल व पृथ्वी या तत्त्वांचे विविध मिश्रण होऊन ही दृश्यसृष्टी जन्माला आली आहे, असा निष्कर्ष काढला आहे. अन्यत्रही उपनिषदांत यापेक्षा सृष्टीच्या उत्पत्तीचा अन्य क्रम सांगितला आहे. सृष्ट्युत्पत्ती सांगण्याचे मुख्य प्रयोजन सृष्टीच्या विचाराकडून आत्म्याच्या किंवा ब्रह्माच्या विचाराकडे नेणे हेच असल्यामुळे विकासक्रम कसा आहे याबद्दल विविध मते असू शकतात, असे म्हणता येते.

हे सगळे विश्व परमात्म्याचा किंवा ब्रह्माचाच आविष्कार आहे ब्रह्मरूपाने किंवा परमात्मरूपाने दृश्य विश्व हे एकात्मकच आहे त्याच्या मुळाशी असलेले ब्रह्मतत्त्व व माणसाचा जीवात्मा भिन्न नाहीत असा विचार सर्व प्राचीन उपनिषदांमध्ये सांगितला आहे. ब्रह्म हे मूर्त व अमूर्त, मर्त्य व अमृत या द्विविध रूपांचे आहे. ब्रह्माचे शुद्ध व अंतिम स्वरूप अमर व निर्गुण होय तो केवळ आत्मरूप द्रष्टा, विज्ञाता वा प्रज्ञान होय. हे स्वयंप्रकाश तत्त्वच सत्, चित् व आनंदस्वरूप आहे. जीवात्म्यास असे स्वरूप साक्षात प्रत्ययास आले म्हणजे जीवात्मा मुक्त होतो. असा प्रत्यय येण्याकरता शम, दम, उपरती, तितिक्षा, एकाग्रता, मुमुक्षता आणि अध्यात्मचिंतन या साधनांची आवश्यकता असते. वित्तैषणा, पुत्रैषणा व लोकैषणा किंवा ऐहिक समृद्धी व स्वर्गादी लोक यांची इच्छा टाकून देऊन केवळ आत्म्याचे श्रवण, मनन व निदिध्यासन केल्याने ब्रह्मसाक्षात्कार किंवा आत्मसाक्षात्कार होतो. उक्त साधन-संपत्तीच्या योगाने चित्त शुद्ध होऊन हा साक्षात्कार प्राप्त होतो.

जे जीवात्मे मनुष्यजन्मात आत्मसाक्षात्काराने मुक्त होत नाहीत, त्यांना पापपुण्यकर्मानुसारे संसारगती प्राप्त होते. पाप व पुण्य समान असल्यास मनुष्यजन्म प्राप्त होतो. पुण्य अधिक असल्यास देव, गंधर्व इ. योनींत ते जन्म घेतात व ज्यांचे पापकर्म अधिक असते ते पशुकीटकादी योनींत जन्म घेतात. मरणोत्तर स्थितीचे आणखी दुसऱ्या प्रकारे वर्णिलेले स्वरूप असे आहे : पुण्यकर्म करणाऱ्यांचा मरणोत्तर प्रवास पितृयाण व देवयान या मार्गांनी होतो. पितृयाण मार्गाने देवताज्ञानरहित अशी पुण्यकर्मे करणारे जातात. ते चंद्रलोकी चिरकाल वास करून पुन्हा मर्त्यलोकी मनुष्यादी जन्म घेतात. देवताज्ञानसहित पुण्यकर्माच्या योगाने देवयानमार्ग प्राप्त होतो. ते देवादी ब्रह्मलोकापर्यंतच्या स्थितीस प्राप्त होतात व पुन्हा मृत्युलोकी परतत नाहीत. देवलोकात असताना, म्हणजे स्वर्गात असतानाच त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन ते मुक्त होतात. अधिक पापकर्मे करणारे मात्र पश्वादी स्थावरान्त योनींत जन्म घेतात वा नरकातही जातात.

श्वेताश्वतरोनिषदात ज्ञानमार्गाबरोबरच भक्तिमार्गाचा प्रथम उल्लेख येतो. कठोपनिषद व श्वेताश्वतरोपनिषद यांमध्ये योगविद्येचाही उपदेश केलेला दिसतो. एकंदर प्राचीन उपनिषदे अद्वैतवादी आहेत मात्र त्यांत मायावादाचा निर्देश नाही. श्वेताश्वतरोपनिषदात माया म्हणजे प्रकृती व मायी म्हणजे परमेश्वर असे म्हटले आहे. द्वैतवादास आधारभूत असलेली काही वाक्ये कठश्वेताश्वतर यांमध्ये सापडतात. कठोपनिषदात म्हटले आहे, की दोन सुंदर पक्षी, एक भोक्ता व दुसरा केवल द्रष्टा असे, एकाच वृक्षावर निवास करतात. श्वेताश्वतरात म्हटले आहे, की भोक्ता, भोग्य व प्रेरक असे हे ब्रह्म त्रिविध आहे.


मूळ उपनिषदे ब्रह्मचिंतनपर किंवा आत्मचिंतनपर आहेत. मूळ प्राचीन उपनिषदांना सर्वश्रेष्ठ प्रामाण्य किंवा महिमा प्राचीन भारतीयांत प्राप्त झालेला पाहून शैव, वैष्णव इ. विविध दैवतावादी संप्रदायांनी आपापल्या संप्रदायांची उपनिषदांच्या शैलीत मांडणी केली व तीही उपनिषदे म्हणून मान्य झाली. उदा., कालाग्‍निरुद्र, कठरुद्र, कृष्ण, गोपालतापनी, दत्तात्रेय, नृसिंहतापनी, पाशुपतब्रह्म, वनदुर्गा, हयग्रीव, नारायणतापनी, त्रिपुरातापनी, रामतापनी, गणपत्यथर्व, गणेशतापनी  इत्यादी. वरील तापनी उपनिषदांचे प्रत्येकी दोन भाग असतात, पूर्वतापनी व उत्तरतापनी.

उपनिषदांतून अद्वैत, विशिष्टाद्वैत, शुद्धाद्वैत, द्वैताद्वैत व द्वैत तत्त्वज्ञाने निर्माण झाली. या अद्वैतादी तत्त्वज्ञानांच्या आचार्यांनी उपनिषदे व ब्रह्मसूत्रे  ह्यांच्यावर आपापल्या संप्रदायांनुसार भाष्ये वा टीका लिहिल्या. शैव, वैष्णव, शाक्त इ. संप्रदाय मुळात अवैदिक होते परंतु त्यांनी उपनिषदे व ब्रह्मसूत्रे ह्यांच्यावर भाष्ये लिहून उपनिषदांचा आधार आपापल्या संप्रदायांना घेतला. विशिष्ट द्वैत हे शैव आणि वैष्णव अशा दोन्ही संप्रदायांमध्ये मान्य आहे त्याचप्रमाणे द्वैतही मान्य आहे. केवलाद्वैत म्हणजे शांकरतत्त्वज्ञान हेही शैव, वैष्णव, शाक्त इ. संप्रदायांमधील काही लोकांना मान्य आहे. अद्वैत-द्वैत इत्यादींपैकी कोणतेही तत्त्वज्ञान स्वीकारून शैव, वैष्णव, शाक्त इत्यादिकांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा आधार उपनिषदे होत, असे दाखवून दिले. याचे तात्पर्य असे, की विविध भक्तिसंप्रदायांना किंवा देवतासंप्रदायांना समाजातील आपले अधिष्ठान दृढ करण्याकरिता उपनिषदांचा म्हणजे वेदान्ताचा आधार आहे, हे दाखवावे लागले. म्हणून शैव, वैष्णव इ. संप्रदायांची तत्त्वज्ञानेसुद्धा ‘वेदान्त’ ह्या नावानेच मिरवितात. जैन, बौद्ध, न्याय-वैशेषिक ही दर्शने मात्र उपनिषदांचा आधार घेऊन आपली तत्त्वे किंवा सिद्धांत मांडीत नाहीत. जैन व बौद्ध तर उपनिषदांचे प्रामाण्यही स्वीकारीत नाहीत. न्याय-वैशेषिक दर्शनांना उपनिषदे प्रमाण म्हणून मान्य आहेत परंतु ती स्वतःच्या तत्त्वज्ञानाची मांडणी उपनिषदांच्या अधिष्ठानावर करीत नाहीत.

सांख्यदर्शनामध्ये दोन प्रवृती दिसतात. हे दर्शन मुळापासून अखेरपर्यंत न्याय-वैशेषिकांप्रमाणेच उपनिषदांच्या आधारे निर्माण झाले नाही ते युक्तिवादावरच आधारलेले आहे परंतु सांख्यांची विश्वप्रक्रिया अथवा विश्वविद्या औपनिषदिक तत्त्वज्ञानामध्ये समाविष्ट केलेली दिसते. ह्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भगवद्‌गीता होय. गीतेतील आत्मविद्या किंवा ब्रह्मविद्या ही औपनिषदिक आहे परंतु सृष्टिप्रक्रिया ही त्रिगुणात्मक प्रकृतीला विश्वाचे मूळ धरून विवरिली आहे. सांख्य आणि औपनिषदिक विचार ह्यांचा संगम किंवा समन्वय हा प्राचीन उपनिषदांनंतरच्या वेदान्त तत्त्वज्ञानाचा विशेष होय.

औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोह ह्याने सतराव्या शतकात फार्सी भाषेत बऱ्याच प्राचीन उपनिषदांचे भाषांतर केले. फार्सीमधून एकोणिसाव्या शतकात लॅटिनमध्ये ह्या भाषांतराचे भाषांतर झाले. जर्मन तत्त्वज्ञ शेलिंग आणि शोपेनहौअर ह्यांच्यावर त्याचा फार प्रभाव पडला. शोपेनहौअर म्हणतो, की उपनिषदे ही उच्चतम मानवी प्रज्ञेची निर्मिती आहे. पॉल डॉइसेनने जर्मन भाषेत उपनिषदांच्या तत्त्वज्ञानावर प्रबंध लिहिला आणि मॅक्स म्यूलरने ‘सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट’ ह्या ग्रंथमालेत प्राचीन बारा उपनिषदांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले आहे. त्यानंतरचे अधिक सुधारलेले इंग्रजी भाषांतर ह्यूमचे आहे.

संदर्भ 1. Deussen, Paul, The Philosophy of the Upanishads, New York, 1966.

            2.Hume, R. E. The Thirteen Principal Upanishads, London, 1934. 

            3. Limaye, V. P. Vadekar, R. D. Eighteen Principal Upanishads, Vol. I, Poona, 1958.

            4. Muller, Max, The Sacred Books of the East, Vol. I &amp XV, Delhi, 1965.

            5. Winternitz, M. A History of Indian Literature, Vo. I,Calcutta, 1933.  

            ६. दफ्तरी, के. ल. उपनिषदर्थव्याख्या, २ भाग, नागपूर, १९५९, १९६२.

            ७. बेलसरे, के. वि. उपनिषदांचा अभ्यास, पुणे, १९६५.

            ८. रानडे, रा. द. अनु. गजेंद्रगडकर, कृ. वें. उपनिषद्रहस्य, पुणे, १९३८.

जोशी, लक्ष्मणशास्त्री