हिलेब्रांट, आल्फ्रेट : (१५ मार्च १८५३–१८ ऑक्टोबर १९२७). विख्यात जर्मन प्राच्यविद्यापंडित. वैदिक दैवतशास्त्राचे गाढे अभ्यासक. जर्मनीमधील (त्या वेळचे प्रशिया) ब्रेसलाऊजवळील एकागावी जन्म. ब्रेसलाऊमध्ये शालेय शिक्षण घेतल्यावर उच्च शिक्षणासाठी म्यूनिकला रवाना. तेथे त्यांनी मार्टिन हॉग यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन भारतीय दैवतशास्त्र व कर्मकांड यांचे सखोल अध्ययन केले. १८७५मध्ये त्यांच्या अदीती या देवतेवरील प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टरेट मिळाली. १८७७ मध्ये त्यांनी मित्र व ⇨ वरुण या देवतांवर संशोधन प्रबंध सादर करून विद्यापीठ प्राध्यापक पदाची अर्हता संपादन केली. १८८३ पासून त्यांच्या प्राध्यापकी कारकीर्दीला सुरुवात झाली. १९०५ मध्ये ब्रेसलाऊ विद्यापीठात त्यांची प्राध्यापकपदी नियुक्ती झाली. त्यानंतर लगेचच त्यांनी आल्फ्रेट हिलेब्रांटभारताचा अभ्यासदौरा केला. १९२१ मध्ये प्राध्यापकपदावरून ते निवृत्त झाले. प्राध्यापकी कारकीर्दीत त्यांनी दोन वेळा ब्रेसलाऊ विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. १९०३–१८ या कालावधीत ते प्रशियन लोकसभेचे सदस्य होते. 

 

आल्फ्रेट हिलेब्रांट
 

जवळजवळ पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकीर्दीत हिलेब्रांट यांनी विपुल संशोधनपर लेखन केले. ते सर्व जर्मन भाषेत आहे. अदिती, मित्र, वरुण इ. देवतांच्या मूळ स्वरूपाविषयी संशोधन करून या संदर्भातील पूर्वसूरींच्या मतांपेक्षा भिन्न मते त्यांनी मांडली. अदिती देवता हे अविनाशी सूर्यप्रकाशाचे प्रतीक आहे, असे त्यांचे मत होते. वरुण देवतेच्या मूळ स्वरूपाविषयी मात्र त्यांची मते बदलत गेली. प्रारंभी वरुण हे अखिल विश्वाला वेढून टाकणाऱ्या आकाशाचे प्रतीक आहे, असे त्यांचे मत होते. ते बदलून शेवटी वरुण ही सागरदेवता आहे, असा निष्कर्ष त्यांनी मांडला. 

 

वैदिक दैवतशास्त्रावरील त्यांच्या ग्रंथाचे तीन खंड अनुक्रमे १८८८, १८९१ व १८९७ या वर्षी प्रकाशित झाले. हा ग्रंथ म्हणजे वैदिक संशोधनाला त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. वैदिक देवतांमध्ये अनेक जमातींच्या देवतांची सरमिसळ झाली आहे, असे त्यांचे मत होते. देवतांखेरीज प्राचीन भारतीय यज्ञविधीच्या अनेक अंगांवर त्यांनी संशोधन केले. १८८९ मध्ये त्यांनी ⇨ दर्शपूर्णमास यागांवर संशोधन करून एक पुस्तक लिहिले. त्यासाठी श्रौतसूत्रे व अन्य ग्रंथांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. शांखायन श्रौतसूत्राची चिकित्सित संपादित आवृत्ती त्यांनी प्रकाशित केली. तसेच प्राचीन भारतातील दक्षिणायन व उत्तरायण यांशी संबंधित उत्सवांचा अभ्यास करून त्यांचे मूळ यूरो-भारतीय संस्कृतीत आहे, असे मत त्यांनी मांडले. १९१७ मध्ये यज्ञातील दीक्षेसंबंधी लिहिलेल्या एका पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की, ⇨ सोमयागा-तील दीक्षेचे मूळ प्राचीन काळी अग्नीसमोर आत्मसमर्पण करण्याच्या प्रथेत आहे. 

 

हिलेब्रांट यांनी प्राचीन भारतीय संस्कृतीवर वेळोवेळी दिलेली व्याख्याने प्राचीन भारत या ग्रंथात संकलित आहेत. तसेच ⇨ विशाखदत्ता च्या मुद्राराक्षसाची चिकित्सित संपादित आवृत्तीही त्यांनी प्रकाशित केली. १९२१ मध्ये त्यांनी कालिदासावर एक पुस्तक लिहिले. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचे अध्ययन करून प्राचीन भारतीय राज्यशास्त्र या विषयावरही त्यांनी लेखन केले. 

 

आपल्या वैविध्यपूर्ण व विपुल संशोधनपर लेखनाने हिलेब्रांट यांनी प्राच्यविद्याभ्यासकांसाठी मोठे योगदान दिले आहे. ज्या काळात प्राच्य-विद्येच्या अभ्यासाची फारशी साधने उपलब्ध नव्हती, त्या काळात हिलेब्रांट यांचे मौलिक ग्रंथ निर्माण झाल्यामुळे त्यांचे महत्त्व अधिक आहे. 

 

संदर्भ : Stache-Rosen, Valentina, German Indologists, New Delhi, 1990. 

भाटे, सरोजा