झा, गंगानाथ :  (२५ सप्टेंबर १८७१–१० नोव्हेंबर १९४१). विख्यात प्राच्यविद्यापंडित. गंधवारी (जिल्हा दरभंगा) बिहार येथे एका ब्राह्मण कुळात त्यांचा जन्म झाला. दरभंगा संस्थानाचे महाराज लक्ष्मीश्वर सिंग हे त्यांच्या आईचे निकटचे आप्त असल्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांचे पालन आणि शिक्षण महाराजांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली झाले. दरभंगा येथून प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर (१८८६) ते वाराणसी येथे संस्कृताध्ययनासाठी गेले. महामहोपाध्याय जयदेव मिश्र, महामहोपाध्याय जयकृष्ण मिश्र, प्रसिद्ध मीमांसक चित्रधर मिश्र आदी गुरूंच्या अध्यापनाचा लाभ त्यांना तेथे मिळाला. भारतीय दर्शनांचा सखोल अभ्यास केल्यानंतर बनारस येथील ‘क्वीन्स कॉलेज’ मध्ये त्यांनी अध्ययन केले. प्राच्यविद्यांविषयीचा पश्चिमी दृष्टिकोण आणि पश्चिमी विद्वानांनी ह्या विषयाच्या क्षेत्रात केलेली कामगिरी त्यांना तेथे जाणून घेता आली. १८९२ मध्ये अलाहाबाद विद्यापीठाची ‘एम्‌.ए.’ (संस्कृत) ही पदवी त्यांनी मिळविली. प्रभाकर स्कूल ऑफ पूर्वमीमांसा  प्रबंध लिहून १९०९ मध्ये ह्याच विद्यापीठाची ‘डी. लिट्‌.’ ही पदवी त्यांनी संपादिली. अलाहाबाद विद्यापीठाने संस्कृतातील संशोधनासाठी दिलेली ही पहिली ‘डी. लिट्‌.’ होय. शिक्षण पूर्ण केल्यानंतर गंगानाथ अलाहाबादच्या ‘म्यूर सेंट्रल कॉलेजा’त संस्कृताचे अध्यापन करू लागले. १९१७ मध्ये बनारसच्या संस्कृत कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्या कॉलेजचे गंगानाथ हे पहिले भारतीय प्राचार्य होत. १९२३–३२ ह्या काळात अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरुपद त्यांनी भूषविले.

संस्कृत भाषा, भारतीय दर्शन–विशेषतः पूर्वमीमांसा–आणि हिंदू कायदा ह्या विषयांच्या सखोल व्यासंगाबद्दल गंगानाथांचा लौकिक सर्वत्र पसरला. स्वतंत्र ग्रंथलेखन, अनुवाद, व्याख्याने आदी विविध मार्गांनी ह्याविषयांचे क्षेत्र त्यांनी संपन्न केले. त्यांनी संस्कृतात लिहिलेले खद्योत  (वात्स्यायनन्यायभाष्यटीका), मीमांसामंडनम्, प्रभाकरप्रदीप  आदी ग्रंथ उल्लेखनीय आहेत. वैशेषिक दर्पण  आणि न्यायप्रकाश  हे त्यांनी हिंदीत लिहिलेल्या ग्रंथांपैकी होत. वेदान्तदीपिका  हा ग्रंथ त्यांनी मैथिलीत लिहिला.

भारतीय विद्या आणि संस्कृती ह्यांचा व्यापक प्रमाणावर प्रसार करण्याच्या हेतूने उत्तमोत्तम संस्कृत ग्रंथांचे त्यांनी इंग्रजी अनुवाद केले. विज्ञानभिक्षूचा योगसारसंग्रह  (१८९४), वाचस्पतीमिश्राची सांख्यतत्त्वकौमुदी (१८९६), कुमारिल भट्टांचे श्लोकवार्त्तिक (१९०५) आणि तंत्रवार्त्तिक (१९२४), शाबरभाष्य  १ ते ३ (१९३३ – ३६) छांदोग्योपनिषदावरील शांकरभाष्य (२ खंड, १८९९), मनुस्मृती  (मेधातिथिभाष्यासह, ८ खंड, १९२० – २९), मम्मटाचा काव्यप्रकाश (१८९६ ), जैमिनीची पूर्वमीमांसा सूत्रे ( अध्याय १ ते ३, १९१६ ), न्यायसूत्रभाष्य  वार्त्तिक  (४ खंड, १९१५–१९), शांतरक्षिताचा तत्त्वसंग्रह (कमलशीलाच्या भाष्यासह), मधुसूदन सरस्वतीची अद्धैतसिद्धी  इत्यादींचा अंतर्भाव त्यांनी इंग्रजीत अनुवादिलेल्या संस्कृत ग्रंथांत होतो. अनेक संस्कृत ग्रंथांचे त्यांनी संपादनही केले. ‘फिलॉसॉफिकल डिसिप्लिन’ ह्या नावाने त्यांनी कलकत्त्यास दिलेली व्याख्याने गाजली. शंकराचार्यांच्या देशोद्धारक कार्यावर बडोदा येथे व वेदान्त तत्त्वाज्ञानावर दरभंगा येथे दिलेल्या व्याख्यानांचाही गौरव झाला. लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे व ब्रिटिश ॲकॅडमीचे सदस्यत्व त्यांना मिळाले होते. ब्रिटिश सरकारने ‘महामहोपाध्याय’ ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्यांच्या षठ्यब्दिपूर्तीनिमित्त प्रसिद्ध झालेल्या गौरवग्रंथात विंटरनिट्झ, कीथ, ओटो स्ट्राउस ह्यांसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पश्चिमी भारतविद्यावंतांचे लेख अंतर्भूत होते.

त्यांच्या मरणोत्तर त्यांच्या नावाने एक संशोधन संस्था अलाहाबाद येथे काढण्यात आली (१९४३). तिचे आता केंद्रीय संस्कृत विद्यापीठात रूपांतर झाले आहे. गंगानाथांची राहणी अत्यंत साधी होती धर्मश्रद्धा उत्कट होती. अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि प्रसिद्ध शिक्षणशास्रज्ञ अमरनाथ झा हे त्यांचे पुत्र होत.

काशीकर, चिं. ग. कुलकर्णी, अ. र.