जगन्नाथपंडित : (सतरावे शतक). संस्कृतातील एक श्रेष्ठ कवी आणि काव्यशास्त्रकार. तो आंध्रवेंगिनाडी कुलातील तैलंगी ब्राह्मण होता. त्याच्या पित्याचे नाव पेरुभट्ट किंवा पेरमभट्ट असे असून मातेचे नाव लक्ष्मी असे होते. पेरुभट्ट हा स्वतः मोठा विद्वान होता. जगन्नाथाने बराचसा विद्याभ्यास त्याच्यापाशीच केला. ‘महागुरू’ असा आपल्या पित्याचा उल्लेख त्याने केला आहे. त्याशिवाय बनारस येथे जाऊन ज्ञानेंद्रभिक्षुनामक गुरूकडे अद्वैत, महेंद्राकडे न्याय आणि वैशेषिक, खंडदेवाकडे पूर्वमीमांसा असे विषय तो शिकला. शेषवीरेश्वर हा त्याचा व्याकरणातील गुरू. आपण आपल्या तारुण्याचा काळ दिल्ली दरबारात व्यतीत केल्याचे त्याने भामिनीविलास  ह्या आपल्या काव्यात नमूद केले आहे. बादशाह शाहजहान ह्याच्या दरबारी तो होता. त्यानेच त्याला ‘पंडितराज’ ही पदवी दिली, असे दिसते.

जगन्नाथपंडिताबद्दल अनेक आख्यायिका प्रसृत झालेल्या आहेत. फार्सी भाषेचा अभ्यास करून वादविवादात त्याने एका काजीला पराभूत केल्यामुळे शाहजहान बादशहा त्याच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने त्याला राजकविपद दिले, असे म्हणतात. असेही म्हणतात, की लवंगी नावाच्या एका यवन मुलीवर जगन्नाथाचे प्रेम बसले ही लवंगी नेमकी कोण, ह्याविषयीही ह्या आख्यायिकेत थोडे भेद आढळून येतात. उदा., एका राजपूत स्त्रीपासून शाहजहानाला झालेली ती मुलगी होती शाहजहानाची ती मानलेली मुलगी होती ती तेथील दासींपैकी एक होती इत्यादी. ह्या आख्यायिकेनुसार बादशाहच्या अनुमतीने जगन्नाथाचा लवंगीशी विवाह झाला परंतु त्याला यवनीसंसर्गाचा दोष घडला, अशी भूमिका घेऊन हिंदूंनी बहिष्कृत केले. त्यानंतर गंगेच्या घाटावर लवंगीसमवेत बसून त्याने गंगालहरी  हे आपले ५२ श्लोकांचे विख्यात काव्य लिहिले. एकेका श्लोकाच्या रचनेबरोबर गंगेचे पाणी एकेक पायरी वर चढत गेले आणि ५२ श्लोकांच्या अखेरीस ते जगन्नाथ आणि लवंगी ह्यांच्या जवळ येऊन अखेरीस गंगेने त्यांना आपल्या पोटी घेतले.

१६२० ते १६६५ हा जगन्नाथाच्या वाङ्‍मयीन कारकीर्दीचा काळ असावा. जगन्नाथाच्या काव्यरचनेत गंगालहरी  किंवा पीयूषलहरी, अमृतलहरी, करुणालहरी, लक्ष्मीलहरी  आणि सुधालहरी  ह्या पाच लहरी, जगदाभरण  (शाहजहानाचा पुत्र दारा शुकोह ह्याच्या प्रशस्तिपर काव्य), आसफविलास  (नवाब आसफखान ह्यांच्या निधनावरील विलापिका), प्राणाभरण  (कामरूपचा राजा प्राणनारायण ह्याच्या स्तुतिपर रचना), भामिनीविलास  (प्रास्ताविकविलास वा अन्योक्तिविलास, शृंगारविलास, करुणविलास आणि शांतविलास असे त्यांचे चार उल्लास आहेत) आणि ⇨ रसगंगाधरात उद्‍धृत केलेले यमुनावर्णनचंपू  ही जगन्नाथाची काव्यरचना. प्रसाद आणि माधुर्य ह्या गुणांनी त्याचे काव्य संपन्न आहे.

संस्कृत काव्यशास्त्राच्या परंपरेतील श्रेष्ठींपैकी जगन्नाथ हा अखेरचा शास्त्रकार आहे. रसगंगाधर  आणि चित्रमीमांसाखंडन  हे त्याचे काव्यशास्त्रविषयक ग्रंथ प्रमाणभूत आहेत. ‘रमणीयार्थप्रतिपादकः शब्दः काव्यम्’ ही त्याने केलेली काव्याची व्याख्या रसगंगाधरात प्रारंभीच दिली आहे. हा ग्रंथ आज पूर्णतः उपलब्ध नाही. त्याच्या उपलब्ध असलेल्या दोन आननांतील (प्रकरणांतील) विवेचन उत्तरनामक अलंकारापर्यंत आलेले आहे. जगन्नाथानंतर सु. ५० वर्षांनी झालेल्या नागेशाने मर्मप्रकाश  ह्या रसगंगाधरावरील आपल्या भाष्यात उपर्युक्त उत्तर अलंकारापर्यंतचाच विचार केला आहे. तथापि ह्याचा अर्थ रसगंगाधर  पूर्ण होण्यापूर्वीच जगन्नाथ निवर्तला, असा होत नाही, हे महामहोपाध्याय पां. वा. काणे ह्यांनी दाखवून दिले आहे. उदा., ⇨ अप्पय्य दीक्षिताच्या चित्रमीमांसा  ह्या काव्यविषयक ग्रंथावर कठोर टीका करण्यासाठी लिहिलेल्या चित्रमीमांसाखंडन  ह्या आपल्या ग्रंथातील ‘रसगंगाधरे चित्रमीमांसायां मयोदितः’ ह्या श्लोकावरून चित्रमीमांसाखंडनाआधीच रसगंगाधर  त्याने लिहून पूर्ण केला असावा, असे दिसते. भट्टोजी दीक्षिताने लिहिलेल्या प्रौढमनोरमा  ह्या व्याकरणविषयक ग्रंथाचे खंडन करण्यासाठी मनोरमाकुचमर्दन  हा ग्रंथ जगन्नाथाने लिहिला. त्याच्या व्यासंगाचा, स्वतंत्र बुद्धीचा आणि मर्मस्पर्शी दृष्टीचा प्रत्यय ह्या ग्रंथांतून येतो. आनंदवर्धन, मम्मट ह्यांसारख्या आपल्या पूर्वसूरींवरही त्याने काही प्रसंगी टीका केलेली आहे. त्याचे गद्यलेखन सुबोध, सुस्पष्ट आणि जोमदार आहे.

जगन्नाथाच्या काव्यांपैकी भामिनीविलासाचा फ्रेंच अनुवाद आबेल बेर्गेनी ह्या फ्रेंच पंडिताने मूळ संहितेसह पॅरिस येथे प्रसिद्ध केला (१८७२). डी. गॅलनॉस ह्यांनी भामिनीविलासातील प्रास्ताविकविलासाच्या पहिल्या ९८ श्लोकांचे ग्रीकमध्ये भाषांतर केले, (१८४५), तर बोलेन ह्याने करुणविलासाचा जर्मन अनुवाद केला (१८४०).

संदर्भ :

1. Kane, P. V. History of Sanskrit Poetics, Bombay, 1961.

2. Ramaswami Shastri, V. A. Jagannatha Pandita, 1942.

पाटील, ग. मो.