विंटरनिट्‌स, मॉरिझ : (२३ डिसेंबर १८६३ -९ जानेवारी १९३७). थोर प्राच्यविद्याविशारद. जन्म लोअर ऑस्ट्रियातील हॉर्न येथे एका व्यापारी कुटुंबात. व्हिएन्ना येथे त्यांनी भाषाशास्त्र आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांचे अध्ययन केले. तेथे ऑयगेन हुल्श आणि गेओर्ख ब्यूलर हे विद्वान त्यांना प्राध्यापक म्हणून लाभले. त्यांनी त्यांना भारतीय साहित्याची गोडी लावली. विंटरनिट्स ह्यांनी ‘एन्शंट इंडियन मॅरिज रिच्युअल ॲकॉर्डिंग मॉरिझ विंटरनिट्सटू आपस्तंब, कंपेअर्ड विथ द मॅरिज कस्टम्स ऑफ द इंडो-यूरोपियन पीपल्स’ हा प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली. ऑक्सफर्ड विद्यापीठात विख्यात प्राच्यविद्याविशारद ⇨माक्स म्यूलर ह्यांचे लेखनिक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली.सायणभाष्यासह ऋग्वेदाची दुसरी आवृत्ती तयार करण्याच्या कामी माक्स म्यूलर ह्यांना त्यांनी साहाय्य केले. ऑक्सफर्ड येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट’ च्या ग्रंथपालाची जबाबदारीही त्यांनी काही काळ सांभाळली. १८९८ पर्यंत ते ऑक्सफर्डमध्ये होते. १८९९ मध्ये प्राग येथील प्राचीन जर्मन विद्यापीठात ते इंडो-आर्यन भाषाशास्त्र आणि मानवजातिविज्ञान ह्या विषयांचे व्याख्याते म्हणून काम करू लागले. तेथेच १९०२ मध्ये साहाय्यक प्राध्यापक आणि १९११ मध्ये प्राध्यापक झाले. विशेष म्हणजे भारतात येऊन रवींद्रनाथ टागोरांच्या ‘विश्वभारती’ ह्या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले १९२२-२३. महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे काम पुण्यात चालले होते. विंटरनिट्‌स ह्यांनी ह्या कामासही आपला हातभार लावला. महाभारताची चिकित्सक आवृत्ती काढण्याची कल्पना त्यांनीच प्रथम मांडली ते काम ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ द अकॅडेमीज’ ह्या संस्थेने हाती घेतलेही होते. पण पहिल्या महायुद्धाच्या काळात ते थांबले त्यानंतरच भांडारकर प्राच्विद्या संशोधन मंदिराने ते हाती घेतले.

त्यांनी लिहिलेले वा संपादिलेले काही विशेष उल्लेखनीय ग्रंथ असे : आपस्तंबीय गृह्यसूत्र (संपा. चिकित्सक आवृत्ती -१८८७), मंत्रपाठ (संपा.१८९७-ह्याच्या पहिल्या भागाचे हरदत्तभाष्यसहित इंग्रजी भाषांतर त्यांनी केले आहे). Das Altindische Hochzeitrituell (१८९२), सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट ह्या ग्रंथमालेची सर्वसाधारण सूची (विषयांची आणि नावांची, १९१०), द वूमन इन ब्रॅह्मनिझम आणि Geschichte der Indischen literature (इं.शी. हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर). ‘हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर‘चे एकूण तीन खंड आहेत. पहिला खंड दोन भागांत आहे:त्यांतील पहिला भाग वेदांविषयीचा. तो १९०४ साली प्रसिद्ध झाला. दुसऱ्या भागात (१९०८) आर्ष महाकाव्ये आणि पुराणे ह्यांचा परामर्श घेतला आहे. ‘हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर’ च्या दुसऱ्या खंडाचेही पुन्हा दोन भाग आहेत. त्यांपैकी पहिला (१९१३) बौद्ध साहित्याला वाहिलेला असून दुसऱ्यात (१९२०) जैनांच्या धार्मिक साहित्याचा इतिहास दिला आहे. ‘…इंडियन लिटरेचर’ च्या तिसऱ्या खंडात काव्य, कथात्मक साहित्य, वैज्ञानिक साहित्य, आधुनिक भारतीय साहित्याकडे एक दृष्टिक्षेप इत्यादींचा आढावा घेतला आहे (१९२२). सुभद्रा झा ह्यांनी ह्या तिसऱ्या खंडाचा इंग्रजी अनुवाद केला आहे. (दोन भाग, १९३६ १९६७). संस्कृत सहित्याचा हा सर्वांत वाचनीय असा इतिहासग्रंथ आहे. सुंदर भाषाशैली, आकर्षक विषय-मांडणी व पूर्वग्रहविरहित लेखन ही याची खास वैशिष्ट्ये आहेत.

विंटरनिट्‌स ह्यांनी दिलेली काही व्याख्याने सम प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन लिटरेचर (१९२५) ह्या नावाने कलकत्ता विद्यापीठाने प्रकाशित केली आहेत. त्यांनी कौटिल्य, भास, तंत्रसाहित्य इत्यादींवर केलेल्या सखोल संशोधनाचा त्यांतून प्रत्यय येतो. विद्वत्ताप्रचुर लेखनाला वाहिलेल्या अनेक भारतीय व यूरोपीय नियतकालिकांतून त्यांचे भारतविद्येशी संबंधित असे अनेक व्सासंगपूर्ण लेख प्रसिद्ध झालेले आहेत. माक्स म्यूलर ह्यांच्या अँथ्रोपॉलॉजिकल रिलिजन (१८९४), सायकॉलॉजिकल रिलिजन (१८९५) ह्या ग्रंथांचा जर्मन अनुवाद विंटरनिट्‌स ह्यांनी केला. त्यांनी लिहिलेले ग्रंथ व विद्वत्ताप्रचुर लेख यांची संख्या ४५२ आहे.

विंटरनिट्‌स ह्यांनी अनेक भारतीय अभ्यासकांना भारतीय साहित्याचा आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास करण्यास प्रेरणा दिली. रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी ह्यांच्याशी त्यांची दाट मैत्री होती. ऑस्ट्रियातील प्राग येथे ते निधन पावले.

संदर्भ : 1. Lal Mohan, Ed., Encyclopaedia of Indian Literature, Vol. V, New Delhi, 1992.

    2. Stache-Rosen, Valentina, German Indologists, New Delhi, 1981.

 

कुलकर्णी, अ. र.