एशियाटिकसोसायटी: पौरस्त्य संस्कृती, इतिहास, शास्त्रे, कला, साहित्य यांविषयीच्या साधनांचा संग्रह करणारी व त्यांच्या अभ्यासाला वाहिलेली एक ज्ञानोपासक संस्था. कलकत्ता येथे १७८४ मध्ये इंग्रज भाषापंडित ⇨सरविल्यम जोन्स (१७४६१७९४) यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलह्या संस्थेची स्थापना केली.भारतातून मायदेशी गेलेल्या या संस्थेच्या सभासदांनी १८२३ मध्ये रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड’ या संस्थेची स्थापना केली. पुढे स्वतंत्र रीत्या स्थापन झालेल्या आणि प्रशासकीय दृष्ट्या स्वायत्त असणाऱ्या कलकत्ता, मुंबई, मद्रास, हाँगकाँग, सिंगापूर येथील व श्रीलंकेतील ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’ नामक संस्था तिच्या शाखा समजल्या जाऊ लागल्या. या संस्थेचे सभासद कोठेही असले, तरी त्यांना ग्रंथादी साधने हक्काने उपलब्ध व्हावीत, एवढाच या संलग्‍नतेचा उद्देश होता. संस्थेच्या कलकत्ता आणि मुंबई या शाखांचे कार्य विशेष संस्मरणीय झाले आहे.

जोन्स यांनी जुन्या यूरोपीय भाषा आणि संस्कृत भाषा यांतील साम्य प्रथमच प्रबंधरूपाने पुढे मांडले आणि भारतातील प्राच्यविद्यासंशोधनाचा पाया घातलाडॉ. विल्किन्झटॉमसकोलब्रुक  प्रभृतींनी संस्कृत व फार्सी भाषांतील ग्रंथांचे संशोधन करून हे कार्य पुढे चालविले. कलकत्त्यानंतर मुंबईस गव्हर्नर डंकन यांच्या प्रेरणेने जेम्स मॅकिंटॉश यांच्या अध्यक्षतेखाली १८०४ मध्ये लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बेही संस्था स्थापन झाली. एल्फिन्स्टन, माल्कम यांसारख्या विद्याप्रेमी शासनकर्त्यांनी व अर्स्किन, बॉडेन, मुर, ड्रमंड, कॅ. बेसिल हॉल यांसारख्या विद्वानांनी निबंधवाचन, ग्रंथालय, पुराणवस्तुसंग्रहालये, नाणकसंग्रह, वेधशाळाप्राकृतिक रसायनशास्त्राची प्रयोगशाळा, नियतकालिक यांसारखे उपक्रम हाती घेऊन ज्ञानसंवर्धन केले. १८२७ साली व्हान्स केनेडी याच्या पुढाकाराने ही संस्था लंडनच्या मध्यवर्ती संस्थेला जोडण्यात येऊन तिला बॉम्बे ब्रँच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी’ हे नाव मिळाले. स्वातंत्र्योत्तर काळात (१९५५) ‘रॉयल’ हे उपपद गळले आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभकाळात ही संस्था यूरोपीय विद्धानांची मिरासदारी होती पण त्यानंतर डॉ. विल्सन, मिचेल प्रभृती परकीयांबरोबरच बाळशास्त्री जांभेकर, डॉ. भाऊ दाजी, डॉ. भगवानलाल इंद्रजी, न्या. तेलंग, डॉ. पां. वा. काणे यांसारख्या एतद्देशीय विद्धानांनीही संस्थेच्या ज्ञानोपासनेच्या कार्यास हातभार लावलेला आहे. १८४१ मध्ये आर्लिबार यांच्या संपादकत्त्वाखाली संस्थेचे द जर्नल ऑफ द बॉम्बे ब्रँच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी  हे संशोधनपर त्रैमासिक निघू लागले. प्राच्य संस्कृतीच्या विविध अंगावर प्रकाश टाकण्याचे कार्य या नियतकालिकाने उत्कृष्टपणे बजावले आहे. १९३० मध्ये संस्था मुंबईच्या नगर  सभागृहात आणण्यात आली. १९४७ साली प्रांतिक शासनाने आपला ३०,००० ग्रंथांचा संग्रह संस्थेच्या हवाली करून, तिला राज्याच्या मध्यवर्ती ग्रंथालयाचा दर्जा दिला. सध्या संस्थेचा ग्रंथसंग्रह दोन लाखांच्या घरात आहे. संस्थेच्या विद्यमाने रौप्यपदके वा सुवर्णपदके देऊन प्राच्यविद्याविशारदांचा गौरव करण्यात येतो.

 

मालशे, स. गं.