कपिल : सांख्यदर्शनाचा मूळ प्रणेता. त्याचा सर्वांत प्रथम उल्लेख श्वेताश्वतर उपनिषदात (५⋅२) येतो. कपिल ऋषीचे विविध ज्ञानाच्या योगाने ईश्वर पोषण करतो, असे तेथे म्हटले आहे. या उपनिषदात ईश्वरवादी सांख्यदर्शनाची तत्त्वे सांगितली आहेत. गुणत्रय (५⋅७), प्रकृती (४⋅१०), निर्गुण, सर्वज्ञ व विश्वकर्ता देव (२⋅१६ ४⋅१७ ६⋅७), ज्ञ, क्षेत्रज्ञ, कर्मकर्ता व फलभोक्ता जीवात्मा (५⋅७ ६⋅१६), व्यक्त व अव्यक्त (१⋅८), सांख्ययोग (६⋅१३), ध्यानयोग (१⋅३), प्राणायाम (२⋅९), योग (२⋅८–१४) इ. सांख्य व योग या दर्शनांतील विचार व परिभाषा या उपनिषादत सांगितली आहे. जे सेश्वर सांख्यदर्शनाचे सिद्धांत उपनिषत्कालानंतरच्या पातंजल योगसूत्रात सांगितले आहेत, तेच या उपनिषदात संक्षेपाने वर्णिले आहेत. भास्कर इ. ब्रह्मसूत्रभाष्यकार आचार्य या उपनिषदातील ‘कपिल ’ शब्दाचा हिरण्यगर्भ असा पर्याय देतात. ‘कपिल ’ म्हणजे ‘अग्‍नीसारखा लाल तेजस्वी वर्ण असलेला ’, असा मूळचा अर्थ आहे. अग्‍नीलाही ‘कपिल’ ही संज्ञा आहे. सांख्यदर्शन किंवा योगदर्शन हे हिरण्यगर्भाने प्रथम सांगितले, असे वाचस्पतिमिश्रांनी व्यासभाष्याच्या तत्त्ववैशारदी या टीकेत म्हटले आहे. आदिविद्वान,परमर्षी कपिल याने आसुरी या शिष्याला हे तंत्र म्हणजे सांख्यदर्शन किंवा योगदर्शन सांगितले, अशा अर्थाचे वाक्य पातंजल योगसूत्राच्या व्यासभाष्यात (१⋅२५) उद्‌धृत केले असून, ते वाक्य पंचशिखाचे आहे, असे वाचस्पतिमिश्रांनी म्हटले आहे. महाभारताच्या शांतिपर्वातील मोक्षधर्मपर्वात (अध्याय २१८) कपिल, आसुरी व पंचशिख यांचा उल्लेख असून, सेश्वर सांख्यदर्शन (अध्याय ३००–३२०) सांगितले आहे. भगवद्‌गीतेतही (१०⋅२६) ‘सिद्धांच्यापैकी कपिलमुनी मी आहे’, असेभगवंतांनी म्हटले आहे. ईश्वरकृष्णाच्या सांख्यकारिकेत अखेरीस म्हटले, की कपिल महामुनी, आसुरी, पंचशिख अशी सांख्यदर्शनाची परंपरा आहे. त्यांच्याशिष्यपरंपरेने प्राप्त झालेले ज्ञान ईश्वरकृष्णाने या आर्यावृत्तातील कारिकांत ग्रथित केले आहे. पंचशिखाच्या षष्टितंत्र या ग्रंथाचा त्यात उल्लेख आहे.अहिर्बुध्न्यसंहिता या सु. सहाव्या शतकातील पांचरात्र संप्रदायाच्या ग्रंथात षष्टितंत्रातील प्रतिपाद्य विषयाचे संक्षिप्त विवरण आले आहे. त्यातील सांख्यदर्शनईश्वरवादी आहे परंतु ईश्वरकृष्णाच्या सांख्यकारिकेत निरीश्वर सांख्यदर्शनच प्रतिपादिले आहे. ब्रह्मसूत्रशांकरभाष्यात (२⋅१⋅१) जड त्रिगुणात्मक प्रकृती किंवाजड प्रधान हेच विश्वाचे मूळ कारण होय, असे कपिलप्रणीत सांख्यदर्शनाचे तत्त्व सांगून, कपिलदर्शन जडकारणवादी अतएव वेदविरोधी आहे म्हणून ते अप्रमाणहोय, असे शंकराचार्य म्हणतात. कपिल या शब्दाने अनेक व्यक्ती दर्शित होतात सगरपुत्रांना जाळणारा वासुदेवनामक कपिल निराळा आहेच असे त्यात म्हटले आहे. भागवत पुराणात विष्णूचे चोवीस अवतार सांगितले असून, देवहूतीच्या पोटी कर्दम ऋषीपासून जन्मलेला कपिल महामुनी हा विष्णूचा अवतार म्हणूनसांगितलेला आहे त्याने मातेला ईश्वरवादी सांख्यदर्शनाचा उपदेश केला आहे. सांख्यदर्शनाचा भगवद्‌गीतेत अनेक वेळा निर्देश आला आहे. कपिलाचा शिष्य आसुरी याचा शतपथ ब्राह्मणाच्या अखेरच्या कांडात म्हणजे बृहदारण्यक उपनिषदात आलेल्या आचार्य वंशात उल्लेख आहे.

दर्शनकार कपिलाचा ग्रंथ उपलब्ध नाही. सहा अध्यायांची सांख्यसूत्रे व तेवीस सूत्रांचा तत्त्वसमास हे ग्रंथकपिलाचे म्हणून सांगतात परंतु ते सांख्यकारिकेच्या नंतर झालेले आहेत.कपिलगीता, कपिलपंचरात्र, कपिलस्मृति इ. ग्रंथ कपिलाचे म्हणून सांगितले जातात परंतु ही गोष्ट शंकास्पद आहे.

पहा : सांख्यदर्शन.

जोशी, लक्ष्मणशास्त्री