खडिया भाषा : खडिया (खाडिया) ही ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूहातील एक भाषा असून ती या समूहातील मध्यवर्ती  गटात बोलली जाते. तिचे बहुतेक भाषिक बिहारच्या रांची जिल्ह्यात व ओरिसात आढळतात. खडियाच्या दोन महत्त्वाच्या बोली, धेलकी खडिया व दूध खडिया या आहेत. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे खडिया भाषिकांची एकंदर संख्या १,७७,१५९ होती. खडियाला स्वत:ची लिपी नाही.

ध्वनिविचार : खडियाची  ध्वनिव्यवस्था पुढीलप्रमाणे आहे :

स्वर :   अ, इ, उ, ए, ओ. 

व्यंजने : स्फोटक – क, ख, ग, घ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द, ध, प, फ, ब, भ.

अर्धस्फोटक : च, छ, ज, झ (तालव्य).

अनुनासिक – ङ्‌, ञ, न, म. कंपन – र, ड.

पार्श्विक – ल

घर्षक – स, ह.

अर्धस्वर – य, व.

रूपविचार  : खडियात नाम, सर्वनाम, क्रियापद, दर्शक क्रियाविशेषण, उद्‌गारवाचक, संख्यावाचक, संयोजक, वर्गदर्शक यांचा समावेश होतो. येथे फक्त नामे व क्रियापदे यांची काही वैशिष्ट्ये दिली आहेत.

नाम : नामांचे सचेतन व अचेतन असे दोन प्रकार आहेत. सचेतन नामानंतर द्विवचन व अनेकवचनांचे प्रत्यय, शब्दयोगी अव्यये व काही प्रत्यय येतात. अचेतन नामानंतर वचनदर्शक प्रत्यय येत नाही. द्विवचनदर्शक प्रत्यय-क्रियार व अनेकवचनदर्शक-की आहे.

सर्वनाम : सर्वनामे पुढीलप्रमाणे आहेत :

 

ए.व

द्वि.व.

अ.व.

पु.१

इञ्‌  ‘मी’

इञ्‌जार्

एले  ‘आम्ही’

   

आनाङ्‌

आनिङ्‍ ‘आपण’

पु.२

आम्‌  ‘तू’

आम्बार्

आम्पे

पु.३

होकाड्‌

होकियार्

होकी  ‘तो’ (जवळचा)

 

उकाड्‌

उकियार्‌

उकी  ‘हा’

 

हंकाड्‌

हंकियार्‌

हंकी  ‘तो’ (तिकडचा)

 

आडी

आडकियार्‌

आडकी  ‘तो स्वत:’

क्रियापद : धातूला कालवाचक प्रत्यय लागून शेवटी पुरुषवाचक प्रत्यय लागतो. उदा., गिल्‌ ‘मारणे’ याची वर्तमानकाळाची पुढील रूपे पहा. ती धातू + कालवाचक प्रत्यय + पुरुषवाचक प्रत्यय अशी बनलेली आहेत :

 

ए.व

द्वि.व.

अ.व.

पु.१

गिल्तिञ्‌

गिल्तेनाङू

गिल्तेनिङ्‌

   

गिल्तेजार्‌

गिल्तेले

पु.२

गिल्तेम्‌

गिल्तेबार्‌

गिल्तेपे

पु.३

गिल्ते

गिल्तेकियार्

गिल्तेमोय्‌

शब्दसंग्रह : खडियात आर्यभाषांतून आलेले शेकडो शब्द आहेत पण एकंदर शब्दसंग्रह ऑस्ट्रिकच आहे.

 संदर्भ : Biligiri, H. S. Khadia Phonology, Grammar and Vocabulary.

कालेलकर, ना. गो.