कासव : सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गाच्या कूर्म गणातील (कीलाेनिया गणातील) प्राणी. या प्राण्यांच्या ठसठशीत विशिष्ट लक्षणांमुळे ते सहज ओळखू येतात. कूर्म गणात कासवांच्या सु.२५० जाती आहेत. कासवे उष्णकटिबंधात राहणारी आहेत पण थोडी समशीतोष्ण प्रदेशातही आढळतात. काही कासवे भूचर असली तरी बाकीची सर्व जलचर असून समुद्रात, गोड्या पाण्यात किंवा पाणथळ जागी राहणारी आहेत.
शरीररचना : कासवाच्या शरीराचे शीर्ष, मान, धड आणि शेपूट असे चार भाग पडतात. पाय चार असून ते धडाला जोडलेले असतात. भूचर कासवांची बोटे वेगवेगळी किंवा जुळलेली असतात व त्यांवर नखर (नख्या) असतात. गोड्या पाण्यातील कासवांच्या पायांची बोटे पातळ त्वचेने जोडलेली असतात. सागरी कासवांच्या पायांचे वल्ह्यात रूपांतर झालेले असते. धड संरक्षक कवचाने झाकलेले असते. कवचाच्या पृष्ठीय भागाला पृष्ठवर्म आणि अधर (खालच्या) भागाला अधरवर्म म्हणतात. हे दोन्ही भाग पार्श्व बाजूंना अस्थिमय सेतूने अथवा बंधनी ऊतकाने (दोन अथवा अधिक अस्थी किंवा उपास्थी जोडणाऱ्या तंतुमय ऊतकाच्या म्हणजे पेशीसमूहाच्या जुडग्याने) एकमेकांना जोडलेले असतात. पृष्ठवर्म सामान्यतः उत्तल (बहिर्गोल) असते, काहींत ते घुमटासारखे उंच असते, तर इतर काहींत जवळजवळ सपाट असते. अधरवर्म सपाट किंवा अवतल (अंतर्गोल) असते. कवच दोन स्तरांचे बनलेले असते. आतला स्तर अस्थिमय पट्टांचा (तकटांचा) असून बाहेरचा शृंगी (शिंगासारख्या द्रव्याच्या) वरूथांचा (बाह्य खवल्यांचा वा तकटांचा) असतो. वरूथांची मांडणी तंतोतंत अस्थिपट्टांच्या मांडणीसारखी नसते. चामट कातडी किंवा मऊ कवच असणाऱ्या कासवांमध्ये वरूथ नसतात. शरीराच्या उघड्या भागांवरील त्वचेवर शृंगी खवले असतात.
पृष्ठवंश (पाठीचा कणा) सापेक्षतया आखूड असून बहुतेक कशेरुका (मणके) पृष्ठवर्मातील अस्थिपट्टांच्या मधल्या ओळीला घट्ट जोडलेल्या असतात आणि बहुतेक पृष्ठिय पर्शुका (बरगड्या) अस्थिपट्टांच्या पार्श्व ओळींशी सायुज्यित (एकत्र झालेल्या) असतात. यामुळे अंसमेखला (हाडांच्या सांगाड्याच्या ज्या भागाशी अवयवांची पुढची जोडी सांधलेली असते तो भाग) आणि श्रोणिमेखला (हाडांच्या सांगाड्याच्या) ज्या भागाशी मागची अवयवांची जोडी अथवा पाय सांधलेले असतात तो भाग) यांच्या अस्थी इतर पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे बरगड्यांच्या बाहेर नसून आत असतात. कवटी जरी मोठी असली तरी मस्तिष्कगुहा (मेंदू असलेली पोकळी) फार लहान असते. मुखात दात नसतात पण जबड्यांच्या कडांवर धारदार शृंगी पट्टांचे आवरण असते. मुखगुहेच्या (तोंडाच्या पोकळीच्या) तळावर बाहेर न काढता येणारी जीभ असते. दृष्टी तीक्ष्ण असते. डोळ्यांना तिसरी पापणी-निमेषक पटल- असते. सिस्ट्यूडो वंशात एक प्रकारची लैंगिक द्विरूपता (नर आणि मादी यांच्यात संरचनात्मक फरक असणे) आढळते. नराचे डोळे तांबडे आणि मादीचे तपकिरी असतात. स्पर्श, रस आणि गंध यांच्या इंद्रियांचा चांगला विकास झालेला असतो. मान सामान्यतः लांब व लवचिक असते. शीर्षासहित मान, पाय व शेपूट ही सर्व कमीअधिक प्रमाणात कवचाच्या आत ओढून घेता येतात. शेपटीच्या बुडाच्या अधर पृष्ठावर अवस्कर (आतडे, मूत्रवाहिन्या व जननवाहिन्या ह्या ज्यामध्ये उघडतात अशा शरीराच्या मागील टोकाशी असलेल्या समाईक कोष्ठाचे) छिद्र असते.
कासव सर्वभक्षक असते असे म्हणता येईल. पाण्यातील कासवे पाणवनस्पती, गोगलगाई, शिंपले, झिंगे, मासे, कीटक इत्यादींवर उपजीविका करतात. भूचर कासवे शाकाहारी असतात असे म्हणतात पण ती देखील बारीकसारीक प्राणी खातात. मुखातील धारदार शृंगी पट्टांचा उपयोग अन्नपदार्थाचे बारीक तुकडे करण्याकरिता होतो.
कासवांची श्वसनपद्धती सस्तन प्राण्यांच्या श्वसनपद्धतीसारखीच असते. अंतःश्वसनाच्या वेळी दोन पार्श्व (बाजूच्या) – स्नायूंच्या संकोचनाने फुप्फुसांच्या भोवतालची देहगुहा (शरीराची पोकळी) मोठी होऊन फुप्फुसांचा विस्तार होतो व बाहेरील हवा फुप्फुसांत शिरते. उच्छ्वासाच्या वेळी उदर-स्नायूंच्या दोन जोड्यांच्या संकोचनाने, आंतरांगांचा फुप्फुसांवर दाब पडतो आणि हवा फुप्फुसांतून बाहेर पडते. पाय आणि मान यांच्या प्रतिकर्षणामुळे (आत ओढून घेण्यामुळे) उच्छ्वसनाला मदत होते.
कासवांमध्ये आणखी दोन प्रकारचे श्वसन आढळते. पाणकासवांच्या घशाच्या अस्तराला केशिकांचा (सूक्ष्म नलिकांचा) भरपूर पुरवठा असतो. तोंडातून वेळोवेळी घशात पाणी घेऊन त्यात विरघळलेल्या ऑक्सिजनाचा त्याला उपयोग करून घेता येतो. यामुळे पाणकासव बराच वेळ पाण्याखाली राहू शकते. पाणकासवांच्या अवस्करात उघडणाऱ्या दोन पिशव्या असतात. यांच्यामुळे श्वसनाचा दुसरा प्रकार शक्य होतो. या पिशव्यांच्या पातळ भित्तीत केशिकांचे जाळे असते. अवस्कर-छिद्रातून वेळोवेळी पाणी आत घेऊन पाणकासव आळीपाळीने या पिशव्या पाण्याने भरते आणि रिकाम्या करते. पिशव्यांच्या भित्तीत असलेल्या कोशिकांमुळे पाण्यातील ऑक्सिजनाचा उपयोग करून घेता येतो.
सागरी कासवे सोडून बाकीची सर्व कासवे हिवाळ्यात शीतनिष्क्रियतेचा (हिवाळ्यात येणाऱ्या अर्धवट वा पूर्ण गुंगीच्या अवस्थेचा) व उन्हाळ्यात ग्रीष्मनिष्क्रियतेचा (उन्हाळ्यात येणाऱ्या अर्धवट वा पूर्ण गुंगीच्या अवस्थेचा) अवलंब करतात. ज्या ठिकाणी थंडीची किंवा उष्णतेची बाधा होणार नाही अशा खोल जागी ती लपून बसतात.
कासवांच्या प्रजोत्पादनाचा काळ ठराविक नसतो. भूचर कासवांचा समागम जमिनीवर तर पाणकासवांचा पाण्यात होतो. नर मादीपेक्षा लहान असतो. त्याचे अधरवर्म अवतल असल्यामुळे समागमाच्या वेळी ते मादीच्या पाठीवर चपखल बसते. शिस्न अवस्कराच्या तळावर असते. निषेचनापूर्वी (फलनापूर्वी) शुक्राणू मादीच्या अवस्करात बऱ्याच काळापर्यंत साठवून ठेवता येतात. अंड्यांचे निषेचन आंतरिक (अंतर्गत) असते. मादी आपल्या मागच्या पायांनी जमिनीत किंवा वाळूत खोल खळगा खणून त्यांत अंडी घालते व ती माती, वाळू किंवा वनस्पतींनी झाकते. अंडी वाटोळी किंवा लंबवर्तुळाकार असून त्यांचे कॅल्शियममय कवच टणक असते, परंतु सागरी कासवांच्या अंड्यांचे कवच चर्मपत्रासारखे चिवट व लवचिक असते. भूचर कासवे थोडी अंडी घालतात, पण सागरी कासवे ५०० पर्यंत घालतात. सामान्यतः २-३ महिन्यांनी अंड्यांतून पिल्ले बाहेर पडतात.
प्राचीन काळापासून माणूस कासवांचे मांस आणि अंडी खात आला आहे. आजही ती प्रथा चालू आहे. माणसाच्या या खादाडपणामुळे कासवांच्या काही जाती नष्ट झाल्या आहेत, तर काही त्या मार्गावर आहेत. श्येनचंचू कासवाच्या कवचापासून चष्म्यांच्या फ्रेमी व काही सौंदर्यप्रसाधने तयार करतात. कासवांच्या वसेपासून (चरबीपासून) यंत्रांना देण्याकरिता लागणारे उत्तम प्रतीचे वंगण तेल तयार करतात. पूर्वी भारतात कासवांच्या पाठीच्या ढाली तयार करीत असत.
वर्गीकरण : कूर्म गणात दोन उपगण आहेत : (१) अप्रावर-उपगण (एथिसी) आणि (२) प्रावर-उपगण (थीकोफोरा). अप्रावर उपगणातील कासवांचे मणके आणि बरगड्या पृष्ठवर्माला जोडलेल्या नसून मोकळ्या असतात. पृष्ठवर्म अनेक लहान बहुभुजी पट्टांचे बनलेले असून चिवट त्वचेने झाकलेले असते. शृंगी वरूथ नसतात. चारही पायांचे पोहण्याकरिता वल्ह्यांत रूपांतर झालेले असते. मान आत ओढून घेता येत नाही. या उपगणातील सर्व कासवे समुद्रात राहणारी आहेत. प्रावर-उपगणातील कासवांच्या वक्षीय कशेरुका पृष्ठवर्मातील अस्थिपट्टांच्या मधल्या ओळीला व बरगड्या अस्थिपट्टांच्या पार्श्व ओळींना जोडलेल्या असतात.
अप्रावर-उपगणामध्ये डर्मोकीलिडी हे एकच कुल असून त्यात डर्मोकीलिस कोरिॲसिया (चर्मकश्यप) ही एकच जाती आहे. या जातीच्या कासवांचे इतर सागरी कासवांशी बरेच साम्य असले, तरी त्यांचे पृष्ठवर्म वेगळ्या प्रकारचे असते. विशेषतः पुढचे पाय फार मोठे असून त्याचे वल्ह्यात रूपांतर झालेले असते. पायांवर नखर नसतात. चर्मकश्यपाची लांबी १५०-२१५ सेंमी. व वजन ३००-३६० किग्रॅ. इसते. काहींचे सु.५९० किग्रॅ. भरल्याचीही नोंद आहे. सर्व सरीसुपांमध्ये हे अत्यंत वजनदार प्राणी होत. उष्ण आणि उपोष्ण समुद्रांतही कासवे आढळतात. मॉलस्क (मृदुकाय) व क्रस्टेशियन (कवचधारी) प्राणी आणि मासे हे यांचे भक्ष्य होय. ही नेहमी पाण्यात राहतात पण अंडी घालण्याच्या वेळी मादी जमिनीवर येते. ती एका वर्षात बऱ्याच वेळा अंडी घालते.
प्रावर-उपगणात अनेक कुलांचा समावेश होतो. त्यांतील काही महत्त्वाच्या जातींची आणि भारतात आढळणाऱ्या काही जातींचीच संक्षिप्त माहिती येथे दिली आहे.
टेस्ट्यूडिनिडी हे फार मोठे कुल असून त्यात २६ वंशाचा समावेश होतो. यांपैकी काही भूचर तर काही जलचर आहेत. भारतात आढळणाऱ्या भूचर कासवांपैकी तारांकित कासव फार सुंदर दिसते. याचे शास्त्रीय नाव टेस्ट्यूडो एलेगान्स असे आहे. लांबी सु.३० सेंमी. असते. पृष्ठवर्माचे अस्थि-पट्ट काळे असून त्यांच्या मध्यभागी मोठा पिवळा ठिपका असतो. या ठिपक्यापासून सर्व बाजूंना पिवळे पट्टे गेलेले असतात. कोरड्या गवताळ आणि झुडपांच्या जंगलांत ही राहतात. डिसेंबरपासून पावसाळा सुरू होईपर्यंत ती खोल बिळात दडून बसतात. नोव्हेंबर महिन्यात मादी चार अंडी घालते.
टेस्ट्यूडो वंशाची काही भूचर कासवे प्रचंड असतात. पॅसिफिक महासागरातील गालॅपागस बेटात प्रचंड कासवांच्या सहा जाती आणि हिंदी महासागरातील आल्डाब्रा बेटात चार आढळत असत, पण माणसाने त्यांचा संहार केल्यामुळे त्या बहुतेक नष्ट झाल्या आहेत. या कासवांची लांबी सु.१५० सेंमी. असते. वजन सामान्यतः २७० किग्रॅ.
किंवा त्यापेक्षाही जास्त असते. पृष्ठवर्म घुमटासारखे असून रंग काळपट असतो, मान लांब असते, पाय लांबट, दंडगोलाकार व रूंद असून बोटे सायुज्यित झाल्यामुळे पावले सपाट आणि खुंटासारखी असतात. त्यांच्यावर आखूड नखर असतात. नर मादीपेक्षा मोठे असतात. गालॅपागस कासवाचे शास्त्रीय नाव टेस्ट्यूडो एलेफंटोपस असे आहे. निरनिराळ्या प्रकारचे निवडुंग व इतर वनस्पती हे यांचे भक्ष्य होय. मादी एका वेळी १०-२० अंडी घालते व ती मातीने झाकते.
एकेकाळी सर्व उष्ण आणि उपोष्ण समुद्रांत हिरवे कासव आढळत असे. याचे शास्त्रीय नाव कीलोनिया मिडास हे आहे. काही ठिकाणी तर ती विपुल असत, पण या कासवांचा आणि त्यांच्या अंड्यांचा फार मोठ्या प्रमाणावर खाण्याकडे उपयोग होत असल्यामुळे काही प्रदेशांतून ती पूर्णपणे नाहीशी झाली आहेत. यांच्या दोन प्रजाती असून त्यांपैकी एक भूमध्यसमुद्र व अटलांटिक महासागरात आणि दुसरी पॅसिफिक व हिंदी महासागरात आढळते. ही कासवे मुख्यतः किनाऱ्यांजवळ राहणारी असली, तरी ती उत्तम पोहणारी असल्यामुळे समुद्रात दूरवर जातात. ही मुख्यतः सागरी वनस्पतींवर उपजीविका करतात, पण ती मॉलस्क आणि क्रस्टेशियन प्राणीही खातात. कधीकधी ऊन खाण्याकरिता वा झोपण्याकरिता ती जमिनीवर येतात. मादी जमिनीत खोल खळगा करून त्यात एका वेळेस बरीच अंडी घालते. प्रजोत्पादनाच्या काळात ती अनेक वेळा अंडी घालते. ६-७ आठवड्यांनी अंडयांतून पिल्ले बाहेर पडतात.
भारतात आढळणारे कासवांचे इतर वंश कचुगा, बाटागुर, हार्डेला, मोरेनिया, निकोरिया, चैबासिया, ट्रायोनिक्स, चित्रा, एमिडा, इ. होत. कचुगा टेक्टम ही जाती सिंधू व गंगा या नद्यांत आणि त्यांच्या आसपासच्या प्रदेशात आढळते. ही खोल पाण्यात राहणारी असून पाणवनस्पतींवर उपजीविका करते. पृष्ठवर्म २० सेंमी. लांब असून घराच्या छप्परासारखे उंच असते. त्याच्या मधल्या तीन अस्थि-पट्टांवर एक एक कंटक (काटा) असतो.
जिओएमिडा त्रिजुगा ही भारताप्रमाणेच श्रीलंकेतही आढळते. हिच्या पृष्ठवर्मावर तीन अनुदैर्घ्य (उभे) कंगोरे असतात.
ट्रायोनिक्स वंशाची दोन-तीन जातींची कासवे भारतात आढळतात. यांपैकी ट्रायोनिक्स गॅंजेटिकस ही जाती उत्तर भरतात गंगा व इतर नद्यांत आढळणारी असून हिचे पृष्ठवर्म ६२ सेंमी. पेक्षाही जास्त लांब असते. बंगोमा कासव (ट्रायोनिक्स पंक्टेटस) दक्षिण भारतात आढळते. पृष्ठवर्म जवळजवळ १०० सेंमी. लांब असते. हे चपळ व खादाड असून मासे व कृमी यांवर उपजीविका करते. याचे मांस स्वादिष्ट असते.
संदर्भ : Ditmars, R. L. Reptiles of the World, New York,1959.
कर्वे, ज. नी. जमदाडे, ज. वि.
“