करवत मासा : माशांच्या उपास्थिमीन-उपवर्गातल्या प्रिस्टिडी कुलातला प्रिस्टिस वंशाचा मासा. या वंशात कित्येक जाती आहेत. या माशाच्या शरीराची ठेवण शार्क माशासारखी असून तो ⇨पाकट आणि⇨रांजा या माशांचा जवळचा नातेवाईक आहे. हे मासे मुख्यतः उष्णकटिबंधातील समुद्रात राहणारे असून पुष्कळदा नदीमुखांजवळ आढळतात.

करवत माशांची लांबी ३–६ मी. असते. याचे मुस्कट पुष्कळ लांब आणि पात्याप्रमाणे चापट असते त्याच्या दोन्ही कडांवर खूप मोठ्या दातांची एकेक ओळ असते ही संरचना दुधारी करवतीसारखी असल्यामुळे तिच्यावरून याला करवत मासा हे नाव मिळाले आहे. करवतीची लांबी १–२ मी. आणि बुडाशी रुंदी सु. ६० सेंमी. असते. डोक्याच्या वरच्या पृष्ठावर डोळे आणि श्वासरंध्रे असतात व खालच्या पृष्ठावर मुख असते. मुखात पुष्कळ दात असून ते लहान व बोथट असतात. अंसपक्ष (छातीच्या भागावरील पर, हालचालीस वा तोल सांभाळण्यास उपयुक्त असणार्‍या त्वचेच्या स्नायुमय घड्या) मोठे, पृष्ठपक्ष (वरच्या किंवा पाठीकडच्या बाजूवर असणारे पर) दोन आणि पुच्छपक्ष मोठा असतो गुदपक्ष नसतो. क्लोम-दरणे (पाणी बाहेर नेणार्‍या कल्ल्यांच्या फटी) अधरपृष्ठावर (खालच्या भागावर) असतात.

करवत मासा

आपल्या करवतीचा उपयोग हा भक्ष्य मिळविण्याकरिता करतो. लहान माशांच्या थव्यावर हल्ला करून करवतीने त्यांना जखमी करतो व नंतर खातो. झिंगे, शेवंडे वगैरे प्राणीही हा खातो. देवमाशासारख्या मोठ्या प्राण्याचेही हा लचके तोडतो.

करवतमासा जरायुज (पिल्लांना जन्म देणारा) आहे. मादीला एका विणीत सु. २० पिल्ले होतात. जन्मापूर्वी पिल्लांच्या करवतीवर आवरण असते त्यामुळे त्यांना किंवा मातेला इजा होत नाही.

भारताभोवतालच्या समुद्रामध्ये आढळणार्‍या करवत माशांपैकी तीक्ष्णाग्र करवत मासा व लघुदंती (लहान दातांचा) करवत मासा हे दोन मुबलक आढळणारे व महत्त्वाचे आहेत. समुद्रकिनार्‍यावरच्या मत्स्योद्योगात यांना महत्त्वाचे स्थान आहे.

तीक्ष्णाग्र करवत मासा : शास्त्रीय नाव प्रिस्टिस कस्पिडेटस. मराठी नावे कांडेरे व नाली. याच्या पाठीचा रंग पिवळा करडा आणि उदराचा पांढुरका असतो करवत टोकदार व अरुंद असून तिच्या प्रत्येक बाजूवर २३–३५ दात असतात शरीरावर खवले नसतात. अन्न मिळविण्याकरिता हे मासे नदीमुखातून नदीत शिरून दूरवर जातात.

लघुदंती करवत मासा : शास्त्रीय नाव प्रिस्टिस मायक्रॉडॉन. मराठी नावे विन, नाली व सोंडेल. रंग तांबूस तपकिरी. करवतीच्या प्रत्येक कडेवर २० पेक्षा जास्त दात नसतात.वरील दोन्ही जातींच्या माशांचा खाण्यासाठी उपयोग करतात. त्यांच्या यकृतापासून काढलेल्या तेलात अ जीवनसत्त्व असते. यांच्या कातडीपासून तरवारीची म्याने करतात.

चाफेकर, मृणलिनी