महीपति : (१७१५–९०). मराठी संतचरित्रकार. उपनाव कांबळे परंतु ताहराबाद ह्या गावचे (जि. अहमदनगर ता. राहुरी) राहणारे म्हणून महीपती ताहराबादकर ह्या नावाने प्रसिद्ध. त्यांच्या वडिलांचे नाव दादोपंत आईचे गंगाबाई. दोघेही भक्तिपरायण होती. वडिलांचे निधन झाल्यामुळे, वयाच्या सोळाव्या वर्षापासून कुटुंबाची जबाबदारी महीपतींवर पडली. मोरोबा तांभेरकरनामक एका सत्पुरुषांच्या विचारांचे संस्कार महीपतींवर त्यांच्या बालपणापासून झाले होते. ताहराबाद येथे कुळकर्णपणाची वृत्ती ते सांभाळीत असत तथापि नोकरीपेक्षा विठ्ठलसेवा श्रेयस्कर, असा विचार करून त्यांनी कुळकर्णपण सोडले आणि ते ईश्वरोपासनेत आपले आयुष्य व्यतीत करू लागले. ईश्वरभक्ती करीत असताना ग्रंथरचनेची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली आणि ते संतचरित्रे लिहू लागले. त्यांनी लिहिलेल्या संतचरित्रग्रंथांत भक्तविजय, संतलीलामृत, भक्तलीलामृत, संतविजय (अपूर्ण) ह्यांचा समावेश होतो. ह्यांशिवाय तुलसीमाहात्म्य, पांडुरंगमाहात्म्य, गणेशपुराण, कथासारामृत ह्यांसारखी छोटी छोटी प्रकरणे तसेच काही अभंग, आरत्या व पदेही त्यांनी रचिली. विठोबा व नारायण असे दोन पुत्र त्यांना होते. त्यांपैकी विठोबाला पदे रचण्याचा नाद होता. संतविजय हा ग्रंथ महीपतीने रचिलेला नसून कोणा रामदासाभिमान्याने तो रचिला असावा, असे मत डॉ. प्र. रा. भांडारकर ह्यांनी मांडले होते तथापि ते मान्य झालेले नाही.

ईश्वराचे गुण वर्णावे त्याला संतोष द्यावा, ह्या हेतूंनी काव्य लिहिले जावे, अशी महीपतींची धारणा होती. ईश्वरकृपेवाचून कवित्व निष्फळ आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्याकडून लिहिली जाणारी संतचरित्रे प्रत्यक्ष पांडुरंग आपल्याकडून लिहवून घेत आहे. अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांनी लिहिलेल्या संतचरित्रांत ज्ञानदेव, नामदेव, दामाजी, भानुदास, चांगदेव, नानक, रोहिदास, एकनाथ, तुकाराम, रामदास इत्यादींच्या चरित्रांचा अंतर्भाव होतो. महाराष्ट्रातील १६८ आणि महाराष्ट्राबाहेरील ११६ अशा एकूण २८४ संतांची चरित्रे महीपतींनी लिहिली आहेत.

महीपतींची काव्यशैली प्रासादिक आणि रसाळ आहे. आजही त्यांचे ग्रंथ महाराष्ट्रात भक्तिभावाने वाचले जातात. त्यांच्या चरित्रांत ऐतिहासिकता कमी आहे चिकित्साही फारशी नाही, अद्‌भुत कथांवर ते भर देतात इ. त्यांच्या चरित्रलेखनातील दोष दाखवून दिले जात असले, तरी प्राचीन मराठी साहित्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर चरित्रलेखन करणारे फक्त महीपतीच होत.

संदर्भ : १. खानोलकर, गं. दे. संपा. मराठी वाङ्‍मयकोश, खंड १ ला, मुंबई, १९७७.

            २. जोग. रा. श्री. मराठी वाङ्‍मयाचा इतिहास, खंड ३ रा, पुणे, १९७३.

            ३. भावे, वि. ल. महाराष्ट्र सारस्वत, आवृ. ६ वी, खंड १ ला, मुंबई, १९८३.

            ४. भावे, वि. ल. महाराष्ट्र सारस्वत, खंड २ रा, (पुरवणी), संपा. शं. गो. तुळपुळे, मुंबई, १९८४.

सुर्वे, भा. ग.