घोणस : मंडली सर्प (व्हायपर) या सर्पांच्या प्रकारात घोणसाचा समावेश होतो. या प्रकाराचे सगळे सर्प 

घोणस

विषारी असतात. त्यांचा व्हायपरिडी या सर्पकुलात समावेश केला आहे. यांचे डोके काहीसे तिकोनी, रुंद व चपटे असते आणि त्यावर लहान टिकल्यांसारखे खवले असतात. डोळ्यातही बाहुली अंडाकार व उभी असते. मान बारीक असते शरीर जाड आणि गुबगुबीत असते शेपूट लहान असते. हे साप पिल्लांना जन्म देतात. या प्रकारचे काही साप चावले तर मनुष्य मरतो, पण इतर जरी विषारी असले तरी त्यांच्या दंशाने मृत्यू येत नाही.

व्हायपरिडी कुलात दोन उपकुले आहेत – एक क्रोटॅलिनी आणि दुसरे व्हायपरिनी. क्रोटॅलिनी उपकुलातील सापांना नाक आणि डोळे यांच्यामध्ये एक लहानसा खळगा असतो, म्हणून त्यांना ‘सरंध्र मंडली’ (पिट व्हायपर ) असे म्हणतात. व्हायपरिनी उपकुलातील सापांना असा खळगा नसतो, म्हणून त्यांना ‘अरंध्र मंडली’ असे म्हणतात. अरंध्र मंडलींच्या एकूण ४२ जातींपैकी ७ भारतात आहेत. या सातांमध्ये घोणस आणि फुरसे या दोन मुख्य आहेत.

पॅट्रिक रसेल यांनी १७९६ साली घोणस हा प्रथमच शास्रज्ञांच्या नजरेला आणला म्हणून याला रसेल व्हायपर किंवा व्हायपेरा रसेलाय  असे म्हणतात. घोणस भारतात सगळीकडे २,१३५ मी. उंचीपर्यंत देखील आढळतो. मादीची लांबी सु. १·६ मी. असते. नर मादीपेक्षा काहीसा जास्त लांब असतो. घेर १५ सेंमी.पर्यंत असतो. शरीर मध्यभागी जाड व दोन्ही टोकांकडे निमुळते होत गेलेले असते. पाठीचा रंग तपकिरी किंवा उदी असून तिच्यावर लंबवर्तुळाकृती काळ्या ठिपक्यांच्या तीन ओळी असतात. प्रत्येक ओळीत २३–३० ठिपके असतात. डोके मोठे, जाड, साधारण तिकोनी व चपटे असते. त्याच्यावर काळ्या रंगाचे लहान ठिपके, रेषा किंवा खुणा असतात पण Λ अशा आकाराची तांबूस रंगाची खूण नेहमी असते. इतर सापांच्या मानाने याच्या नाकपुड्या बऱ्याच मोठ्या असतात. डोळे मोठे, बाहुली दीर्घवर्तुळाकृती, उभी आणि तिच्या भोवतालच्या पडद्यात सोनेरी कण असतात. पोट पांढऱ्या रंगाचे असून त्यावर बारीक काळे ठिपके विखुरलेले असतात. शेपूट लहान असते. इतर विषारी सापांशी तुलना करता याचे विषदंत मोठे म्हणजे सु. १३ मिमी. लांब असतात.

दाट जंगलाखेरीज घोणस इतर कोठेही राहतो राहण्याकरिता उघडी जागा त्याला विशेष पसंत पडते. दिवसा अंगाचे वेटाळे करून झुडपात किंवा गवतात तो स्वस्थ पडल्यासारख्या दिसतो, पण तो अतिशय जागरूक असतो. संध्याकाळ झाल्यावर किंवा रात्री भक्ष्य शोधण्याकरिता तो बाहेर पडतो. उंदीर हे त्याचे आवडते खाद्य असल्यामुळे पुष्कळदा तो घराच्या आसपास किंवा घरातही आढळतो.

माणसाला हा सहसा चावत नाही. पण चवताळल्यावर जमिनीवरून जोरात उडी मारून कडकडून चावतो. दंशाची जागा काळीनिळी होऊन सुजते आणि अतिशय दुखते. माणसाला अतिशय पीडा होऊन काही तासांतच तो मरतो. दंशामुळे अंगात जास्त विष गेलेले नसेल, तर माणूस काही दिवस जगतो.

या सापांना पिल्ले होतात. एका मादीने तीन दिवसांत ९७ पिल्लांना जन्म दिल्याची नोंद आढळते. जन्मतः पिल्ले ११–१३ सेंमी. लांब व मोठ्या सापांसारखीच विषारी असतात.

पहा : फुरसे बांबू साप.

कर्वे, ज. नी.