गेदर : पर्कोमॉर्फी गणातील स्काँब्रिडी मत्स्यकुलातला सार्डा  वंशाचा मासा. हे मासे उष्ण कटिबंधातील सागरात राहणारे आहेत. यांच्या मुख्यतः दोन जाती आहेत : एक अटलांटिक गेदर आणि दुसरा पट्टेरी गेदर. अटलांटिक गेदरचे शास्त्रीय नाव सार्डा सार्डा  असून तो भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागरात विपुल आढळतो. पट्टेरी गेदरचे शास्त्रीय नाव सार्डा ओरिएंटॅलिस  आहे तो पॅसिफिक व हिंदी महासागरांत आढळतो.

गेदर

या माशांचे मोठाले थवे सागरात हिंडत असतात आणि लहान माशांवर यथेच्छ ताव मारतात. ते गळाने व कृत्रिम अमिषाची लालूच दाखवून पकडता येतात.

गेदर दिसायला ट्यूना माशांसारखे असतात. ट्यूनांप्रमाणेच यांनाही दोन पृष्ठपक्ष (पाठीवरील पर म्हणजे तोल सांभाळण्यास वा हालचालीसाठी उपयुक्त असणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घड्या) असतात. पश्च पृष्ठपक्ष आणि गुदपक्ष यांच्या मागे पक्षक (बारीक पर) असतात. या माशांची लांबी ९० सेंमी.पर्यंत आणि वजन ५·५ किग्रॅ.पर्यंत असते. पाठीचा रंग पोलादासारखा निळा असतो. दोन्ही बाजूंचे खाली वळणारे भाग आणि पोट रुपेरी असते. शरीर जाड व दोन्ही टोकांकडे निमुळते होत गेलेले असते. डोक्याकडचे टोक बोथट असते. शरीर सूक्ष्म खवल्यांनी झाकलेले असते.

हे मासे खाण्यास चविष्ट असतात. हवाबंद डब्यातील अन्न म्हणून या माशांचे बरेच व्यापारी महत्त्व आहेत. 

जमदाडे, ज. वि.