प्राणायाम : शरीर, इंद्रिये आणि मन निर्दोष व निरोगी ठेवून समाधीकरिता आवश्यक असलेली योग्यता निर्माण करण्याची साधना. योगसाधनेचा हा एक भाग होय. पतंजलीच्या योगदर्शनात योगाची जी यम, नियम, आसन, प्राणयाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही आठ अंगे क्रमाने सांगितली आहेत, त्यांपैकी चौथे अंग प्राणायाम होय.

 

प्राण म्हणजे श्वासोच्छ्‌वासातला वायू. प्राणाचा वा श्वासोच्छ्‌वासांचा आयाम म्हणजे गति-विच्छेद, अशी पातंजलयोगसूत्रात (२/४९) प्राणायामाची व्याख्या सांगितली आहे. मनुस्मृतीत (६·७१) म्हटले आहे, की भट्टीत टाकलेले लोखंडादी धातू जसे भात्याने शुद्ध होतात, त्याप्रमाणे इंद्रियांचे मळ प्राणायामाने नष्ट होऊन इंद्रिये शुद्ध होतात. योगसूत्रात म्हटले आहे, की ज्ञानावरचे आवरण प्राणायामाने क्षीण होऊन मनाला एकाग्रतेची योग्यता प्राप्त होते. (२/५२, ५३). हठयोगाच्या परिभाषेप्रमाणे आसने व प्राणायाम यांनी सर्व नाडींची शुद्धी होते. नाडी म्हणजे मज्जातंतू, असा कुवलयानंद अर्थ करतात. उदा., सुषुम्ना नाडी म्हणजे पृष्ठवंशातून गेलेला मज्जातंतू.

धौती

 हठयोगप्रदीपिकेत म्हटले आहे, की प्राणायामाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या साधकाने शरीर निरोगी असेल, तरच प्राणायामाचा अभ्यास सुरू करावा. हितकारक, सात्त्विक मिताहाराची सवय असावी. पोट प्राणायामाच्या प्रारंभी साफ असावे जिभेचे चोचले पुरविणाऱ्या तळलेल्या, तिखट, आंबट, जड अशा पदार्थांचे सेवन करू नये मन प्रक्षुब्ध होईल असे वादविवाद किंवा भांडणाचे प्रसंग टाळावेत शक्यतो ज्या ठिकाणी गर्दी असते तेथे मिसळू नये, म्हणजे जनसंगपरित्याग करावा तत्त्वचिंतनपर ग्रंथांचे अध्ययन करावे इंद्रियसंयम नियमितपणे पाळावा शरीर स्वच्छ ठेवावे अंतःकरण शांत व निर्विकार ठेवावे. प्राणायामाचे स्थान निवांत, एकांत, स्वच्छ असावे वारा, पाऊस, ऊन, थंडी इत्यादिकांचा त्रास नसलेले निरामय असे असावे.

 

षट्‌क्रिया : धौती, बस्ती, नेती, त्राटक, नौली आणि कपालभाती या सहा क्रिया होत. जो मनुष्य स्थूल आणि कफदोषी असेल त्याने षट्‌क्रियांपैकी आवश्यक त्या क्रिया करून शरीराचे स्थौल्य कमी करावे व कफदोष नाहीसा करावा. काहींच्या मते सर्वांनीच षट्‌क्रियांपैकी आवश्यक ती कर्मे करून शरीर शुद्ध ठेवावे आणि नंतर अभ्यासास प्रारंभ करावा. परंतु या उलट काही योग्यांचे मत असे आहे, की योगासनाने व प्राणायामानेच कफादी दोष जातात आणि स्थौल्य नाहीसे होते. म्हणून षट्‌क्रियांची आवश्यकता नाही.

 

धौती : सकाळी, चार अंगुले (दोन विती) रुंद आणि १२ हात लांब असा तलम वस्त्राचा पट्टा निर्मळ स्वच्छ पाण्यात बुडवून शेवटचे टोक हातात बोटामध्ये पक्के धरून गिळण्याचा प्रयत्न करावा. काही दिवस गिळताना प्रथम ओकारी येते परंतु प्रयत्नान्ती सवय होते. हा पट्टा काही दिवसांनी अभ्यासानंतर पूर्ण गिळता येतो. गिळल्यानंतर काही मिनिटे पोटात ठेवून हळूहळू बाहेर काढावा. त्याला लडबडून घशातला व पोटातला कफ बाहेर पडतो. पट्टा पोटात असताना अन्नाशयाचे नैसर्गिक रीतीने आपोआप मर्दन होते कारण कोठ्यातील स्नायूंचे स्वाभाविक चलनवलन सुरू होते. सूक्ष्म रुधिराभिसरण होऊन कोठ्याला शक्ती येते कफदोष नाहीसा होतो.

नेती

 बस्ती : छातीइतक्या पाण्यामध्ये स्थिर जलप्रवाहात रोज उभे राहून गुदद्वारामध्ये गुळगुळीत अशी सहा इंची नळी घालावी उड्डियान बंध करावा पाणी आत घ्यावे आणि सोडावे. गुदद्वाराने मलाशयात पाणी जाते आणि मळ निघून जातो. गुदद्वारातील आतड्यांचा संकोच-विकास होऊन मलाशयाला बळ येते.

 

नेती: रोज नाकाच्या प्रत्येक छिद्रातून रेशमासारखा मऊ बारीक दोरा घालून घशातून काढावा असे दोन्ही नाकपुड्यांतून करावे, त्यामुळे तेथील स्नायूंची हालचाल होऊन कपालशुद्धी होते आणि दृष्टिदोष उत्पन्न होत नाहीत.

 

त्राटक : भिंतीवरील किंवा फळ्यावरील बारीक छिद्रावर किंवा टिंबावर दृष्टी रोज एकग्र करून नेत्रातून अश्रुपात होईपर्यंत पहात राहावे त्यामुळे नेत्ररोग होत नाहीत दृष्टीवरील झापड, तंद्रा, आळस वगैरे नष्ट होतात.

वाम नौली

 दक्षिण नौली

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 नौली : उभे राहून दोन्ही पाय समांतर ठेवावेत किंचित ओणवे व्हावे पोट खपाटीस न्यावे पोटाच्या मधले दोन स्नायू वेगळे करून ताठ करावेत आणि असे वेगळे करण्याची सवय झाल्यावर डावीउजवीकडे सारखे फिरवावेत. याच्या योगाने अन्ननलिकांची पचनशक्ती वाढते.

 


 कपालभाती : मऊ आसनावर पद्मासन घालून ताठ बसावे आणि मान ताठ ठेवून लोहाराच्या भात्याप्रमाणे नाकाने श्वास वेगाने आत घ्यावा, तो आपोआप घेतला जातोच आणि लगेच न थांबता नाकानेच सोडावा श्रम वाटेपर्यंत हा नाकाचा भाता तोंड मिटून सुरू ठेवावा. कपालभाती हा एक प्रकारचा प्राणायामच आहे, असे म्हणता येते. कपालभाती करताना मुख्यतः नाकातील, घशातील आणि छातीतील स्नायू व मज्जातंतू यांना व्यायाम घडत असतो. मेंदू आणि कान, डोळे, नाक व घसा यांच्यातील दोषांची शुद्धी होते. कारण या भागातील रुधिराभिसरण वेगाने होते आणि रुधिरामधून मेंदूस व मज्जातंतूस आवश्यक असलेल्या ऑक्सिजन वायूचा भरपूर पुरवठा होतो.

 

 मध्यमा नौलीप्राणायामाची रीती : निरामय, स्वच्छ अशा एकांत स्थली बैठक घालावी. ती बैठक एक इंचापेक्षा जास्त जाड वा खुपणारी नसावी. भगवद्‌गीतेत सांगितल्याप्रमाणे तळाशी दर्भ अंथरावे, त्याच्यावर हरणाचे, वाघाचे किंवा मेंढ्याचे असे कोणतेही कमावलेले मऊ कातडे घालावे व त्यावर सुती किंवा रेशमी वस्त्र अंथरावे. या बैठकीवर साधकाने पद्मासन, सिद्धासन, स्वस्तिकासन किंवा समासन घालून बसावे. पातंजल योगसूत्राच्या व्यासकृत योगभाष्यात पद्मासन, भद्रासन, वीरासन, स्वस्तिक इ. बारा आसनांची नावे सांगून पुढे अशा प्रकारची पुष्कळ आसने आहेत, असे म्हटले आहे. हठयोगप्रदीपिकेमध्येसुद्धा योगभाष्यापेक्षा निराळी काही आसने सांगितली आहेत. परंतु वर सांगितलेली चार आसने ही प्राणायामाभ्यासास अत्यंत उपयोगी आहेत. इतर आसने अनेक प्रकारच्या रोगांचे निवारण करून शरीर सशक्त व हलके ठेवणारी आहेत. ही विविध आसने नियमाने केल्यास वजन वाढत नाही, योग्य तेवढेच राहते.

प्राणायम क्रिया

वरील चारपैकी एक आसन वा विशेषतः पद्मासन घातल्यावर, प्राणायामास प्रारंभ करावा. प्राणायाम करताना मूल बंध, उड्डियान बंध आणि जालंधर बंध हे तीन बंध करावयाचे असतात. मूल बंध म्हणजे ताठ सरळ बसून गुदद्वाराचे स्नायू आवळून उचलून धरणे. उड्डियान बंध म्हणजे ताठ सरळ बसून पोट सबंध खपाटीस नेणे आणि जालंधर बंध म्हणजे ताठ सरळ बसून आपली हनुवटी छातीजवळ टेकवून गळ्याचा संकोच करून आवळून धरणे. मुख्य तीन नाड्या इडा, पिंगला व सुषुम्ना या होत. डाव्या नाकपुडीतून इडा, उजव्या नाकपुडीतून पिंगला आणि मेरुदंडातून-म्हणजे कमरेपासून डोक्यापर्यंत पाठीच्या मध्यभागी गेलेल्या पृष्ठवंशातून – सुषुम्ना नाडी जाते. या तीन नाड्यांना क्रमाने चंद्र, सूर्य व ब्रह्म नाडी म्हणतात. प्राणायामाचे तंत्र समजण्याकरिता वरील बंध आणि नाडी यांची माहिती आवश्यक असते.

जालंधर व उड्डियान बंध व यांसह सिद्धासन

 


प्राणायामाचाक्रम : प्राणायामाचा मुख्य क्रम असा : पद्मासनावर ताठ सरळ बसून, जालंधर बंध व मूल बंध करून हाताच्या पाचही बोटांनी नासाग्र धरावे. पूरक (श्वास घेणे), कुंभक (श्वास रोखणे) व रेचक (श्वास सोडणे) या क्रमाने प्राणायाम करावा. पूरक, कुंभक व रेचक करताना बेंबीखालचा भाग मूल बंधाबरोबरच आवळून ठेवावा. पाचही बोटे नाकावर ठेवावी. अंगठ्याने उजवी नाकपुडी दाबावी करंगळी आणि त्यावरील बोटे डाव्या नाकपुडीवर सैल ठेवून तर्जनी नाकाच्या दांड्यावर ठेवून डाव्या नाकपुडीने हळूहळू, बारा वेळा ओंकार मनात म्हणत, श्वास छातीत तैलधारेप्रमाणे भरावा यास पूरक म्हणतात. सोळा वेळा ओंकार जपत श्वास रोखून धरावा यास कुंभक म्हणतात. लगेच नंतर जालंधर बंध तसाच ठेवून म्हणजे हनुवटी छातीवर दाबून धरून बारा वेळा ओंकार जपत उजव्या नाकपुडीवरील अंगठा ढिला करून श्वास हळूहळू सोडावा. श्वास सोडताना उड्डियान बंध करावा यास रेचक म्हणतात. एकदा ओंकार उच्चारण्याचा वेळ म्हणजे मात्रा. बारा मात्रा, सोळा मात्रा आणि बारा मात्रा असा क्रम आम्ही सांगितला. पूरक, कुंभक व रेचक या तिघांचेही काल परिमाण सारखेच ठेवावे, असे कित्येकांचे मत आहे. उदा., पूरक, कुंभक व रेचक हे तिन्ही १२ मात्रांचे तर काहींच्या मते १२, १६ व १० मात्रा असा क्रम आहे. अनेक योगी पूरक १६ मात्रा, कुंभक ६४ मात्रा आणि रेचक ३२ मात्रा असा क्रम सांगतात. पण हा क्रम प्राणायाम करण्याची शक्ती अभ्यासाने वाढवल्यानंतरच अनुसरावयाचा असतो. या संदर्भात एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवायची ती ही, की प्राणायाम करताना त्यात कसलाही ताण म्हणजे जबरदस्ती करावयाची नसते कोंडमारा यत्किंचितही वाटेल असा प्राणायाम करता कामा नये. कारण त्यामुळे इष्ट सिद्ध न होता अनिष्टच घडण्याचा संभव असतो. सहजपणे प्राणायाम सिद्ध करावा लागतो. पूरक करताना अशी भावना करावी, की ही प्राणशक्ती नखशिखांत सर्वांगी भरली जात आहे. रेचक करताना श्वास सबंध पुरा विनायास बाहेर पडला आहे, असे वाटले पाहिजे. प्राणायामाला कुंभक अशीही संज्ञा आहे. याचे कारण कुंभक दीर्घकाल साधणे, हे प्राणायामाचे मुख्य कार्य आहे. शरीरास प्राणवायू सतत टिकविण्याची कला साधणे म्हणजेच केवल कुंभक होय, असा योगशास्त्राचा मुख्य संकेत आहे. पूरक, कुंभक व रेचक मिळून १ प्राणायाम होय प्रथम तीन वेळा (वार) करावा.प्राणायामाचा अभ्यास थोड्या थोड्या प्रमाणात वाढवत न्यावा. ३ वार, ६ वार, १२, २४ वार अशा क्रमाने वाढविण्याची पद्धती आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ व मध्यरात्र या चार वेळा प्राणायामाचा अभ्यास प्रतिदिन करावा.

 

प्राणायामाचेप्रकार : हठयोगप्रदीपिकेमध्ये (२·४४) कुंभकाचे म्हणजे प्राणायामाचे आणखी सूर्यभेदन, उज्जायी, सीत्कारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्च्छा आणि प्लाविनी असे आठ प्रकार सांगितले आहेत. परंतु वर सांगितलेला प्रकार हा मुख्य प्रकार होय.

 

सूर्यभेदन : सूर्य म्हणजे सूर्यनाडी. तिचे भेदन म्हणजे ती शुद्ध करून प्रसन्न करणे. उजव्या नाकपुडीतून सूर्यनाडी शरीरात जाते. नाकावर पाचही बोटे ठेवून करंगळी व करंगळीवरील बोटांनी डावी नाकपुडी दाबून उजव्या नाकपुडीवरचा अंगठा ढिला सोडून उजव्या नाकपुडीने पूरक करणे म्हणजे श्वास हळूहळू तेलाच्या धारेप्रमाणे छातीत व पोटात भरणे नंतर कुंभक करणे आणि त्यानंतर डाव्या नाकपुडीने रेचक म्हणजे पूर्वीसारखाच हळूहळू श्वास बाहेर सोडणे. या प्राणायामाने वातदोष व कृमिदोष नाहीसे होतात व कपालशुद्धी होते, असे म्हटले आहे.

 

उज्जायी: दोन्ही नाकपुड्यांनी कंठाचा (घशाचा) हृदयापर्यंत मंद आवाज होईल अशा तऱ्हेने श्वास हळूहळू आत घेणे. हा आवाज श्वास घेत असताना अखंडपणे निघाला पाहिजे. नंतर कुंभक करावा आणि कुंभकानंतर चंद्रनाडीने म्हणजे डाव्या नाकपुडीने रेचक करावा. याच्या योगाने कफदोष नाहीसा होऊन शरीराची उष्णता वाढते. जलोदर आणि नाडीचे आणि धातूंचे दोष नष्ट होतात. हा उज्जायी प्राणायाम उभे राहून किंवा चालतानाही करण्यास हरकत नाही, असे सांगितले आहे.

 

सीत्‌कारी : तोंडाने सी ऽऽऽऽऽऽ असा आवाज करीत हळूहळू पूरक करावा. नंतर काही वेळ कुंभक करून दोन्ही नाकपुड्यांनी रेचक हळूहळू करावा. तात्पर्य, तोंडाने पूरक, नंतर कुंभक आणि अखेर नाकाने रेचक असा क्रम लक्षात ठेवावा. क्षुधा, तृषा, निद्रा वा आलस्य यांचा नाश या प्राणायामाने होतो.

 

शीतली : जीभ नळीसारखी दोन्ही ओठांमधून बाहेर काढून पूरक करावा. नंतर कुंभक करून दोन्ही नाकपुड्यांनी रेचक करावा. याच्या योगाने गुल्म, प्लीहा इ. रोग ज्वर, पित्त, क्षुधा, तृषा आणि विषे यांचा नाश होतो, असे म्हटले आहे.

 

भस्त्रिका : पद्मासनावर ताठ सरळ बसून दोन्ही ओठ नीट मिटून दोन्ही नाकपुड्यांनी वेगाने, श्वासाचा आवाज होईल असा पूरक करावा. हा श्वास छातीत हृदयापर्यंत भिनतो आहे असे वाटावे आणि तितक्याच वेगाने श्वास बाहेर टाकावा. लोहाराचा भाता चालतो त्याप्रमाणे चांगले श्रम होईपर्यंत किंवा २० वेळा नाक, घसा वा छाती यांचा भाता चालवावा. असे करीत भरपूर श्रम झाल्यावर सूर्यनाडीने सावकाश पूरक करावा. पूरकाने पोट भरलेले वाटावे दोन्ही नाकपुड्या दाबून धराव्यात. कुंभक विधिवत् झाल्यावर चंद्रनाडीने रेचक करावा. या प्राणायामाने वात, पित्त, कफ हे त्रिदोष नष्ट होतात आणि शरीरातील अग्नी म्हणजे उष्णता वाढते.

 

सूर्यभेदन वातनाशक, उज्जायी कफनाशक, सीत्‌कारी व शीतली पित्तनाशक आणि भस्त्रा कुंभक त्रिदोषनाशक होय, असे हठयोगप्रदीपिका म्हणते. भस्त्रिकेचा विशेष असा, की ती ब्रह्मनाडीचे म्हणजे सुष्पुम्नेचे मुख लवकर मोकळे करते सुषुम्ना नाडीतून प्राणशक्तीचा प्रवेश चांगला होतो सुषुम्ना नाडीतून कुंडलिनी शक्ती जागृत होऊन मेरुदंडातून ब्रह्मचक्रापर्यंत म्हणजे मस्तकापर्यंत पोहोचते आणि शिव व शक्ती याचा समागम ब्रह्मनाडीमध्ये होतो. अर्थात ज्यांना प्राणायामाच्या योगाने आध्यात्मिक साधना करावयाची असते, त्यांच्याकरिताच ही प्राणायामाची फलश्रुती सांगितली आहे.

 


 भ्रामरी : कुंभकाच्या अगोदर भुंग्यासारखा आवाज काढीत पूरक करावा नंतर कुंभक करून अखेरीस भृंगनाद करीत रेचक हळूहळू करावा. ह्या प्राणायामाने एक विशेष प्रकारचा आनंद होतो. घेरण्डसंहितेत असे म्हटले आहे, की प्राणायामाचा अनके महिने अभ्यास केल्यानंतर शांत एकांतात बसले असताना नाजुक काशाच्या घंटेचा किंवा वीणेच्या तारांचा किवा दूरवर वाजणाऱ्या दुंदुभीचा वा अन्य वाद्याचा सूक्ष्म नाद साधकाला ऐकू येतो. कुंभक करून त्याचे ध्यान करावयाचे. हाच भ्रामरी कुंभक होय.

 

मूर्च्छा : कुंभक वगळून पूरक आणि रेचक करावयाचे. पूरकाच्या शेवटी जालंधर बंध अत्यंत दृढपणे करावा आणि नंतर रेचक करावा. यावेळी मूर्च्छा यावी म्हणजे सगळे सुखदुःखाचे विषय विसरावे अशी दृढ वासना मनाशी बाळगणे आवश्यक आहे. दीर्घकाल वासना बाळगली तरच मूर्च्छा येणे (मन निर्विषय होणे) शक्य आहे. काही ग्रंथकारांनी मनाला गुंगी येईल असेही औषध अशा प्रकारच्या प्राणायामाच्या वेळी सेवन करावयास सांगितले आहे. हे औषध कोणते हे मात्र कल्पनेनेच जाणावयास पाहिजे.

 

प्लाविनी : पूरक करून पोट भरावे आपले शरीर तरंगत आहे, अशी भावना करावी अशी भावना दृढ झाली म्हणजे कुंभकाच्या वेळी आपले शरीर अधांतरी कमलपत्राप्रमाणे स्थिरावले आहे, अशी जाणीव होते.

 

प्रथम सांगितलेल्या प्राणायामाचा साधारण प्रकार आणि कुंभकांचे वरील आठ प्रकार यांचा अभ्यास करीत असताना कालांतराने पूरक आणि रेचक यांची आवश्यकता भासत नाही आणि नुसता केवल कुंभक सिद्ध होतो. रेचक आणि पूरक मिळून कुंभक म्हणजे सहित कुंभक आणि रेचक व पूरक न करताच जो कुंभक साधता येतो त्यास केवल कुंभक म्हणतात.

 

कुंभकाचे आणखी अंतःकुंभक आणि बहिःकुंभक असे दोन प्रकार आहेत. पूरकोत्तर प्रथम केलेला कुंभक हा अंतःकुंभक होय. पूरक करून लगेच रेचक करावा पोट व छाती रिकामी झाल्यावर जालंधर, उड्डियान व मूल बंध करून पूरक न करता थांबणे म्हणजे बहिःकुंभक होय.

 

प्राणायामाचे दोन प्रकार – अमंत्रक आणि समंत्रक. अमंत्रक म्हणजे मंत्रावाचून करावयाचा समंत्रक म्हणजे मंत्रासह उदा., वेदाध्ययनाचा अधिकार असलेल्या त्रैवर्णिकांनी खालील सव्याहृतिक, सशिरस्क गायत्रीमंत्र जपायचा असतो, तो असा : ॐ भूर्भुवः स्वः महः जनः तपः सत्यम्’ या सात व्याहृती उच्चारून नंतर प्रणवोच्चारपूर्वक गायत्रीमंत्र उच्चारायचा आणि गायत्रीमंत्राच्या शेवटी ‘ॐ आपोज्योती रसोऽमृतं ब्रह्म भूर्भवस स्वरोम्’ हे शिरस् (टोक) जोडायचे. किंवा ज्या साधकाची जी उपास्य देवता असेल त्या उपास्य देवतेचा मंत्र प्राणायामाच्या वेळी देवतेच्या अनुग्रहाकरिता जपायचा असतो.

 

योगविद्येचा, विशेषतः योगासने आणि प्राणायाम यांचा, भारतात व पश्चिमी देशांमध्ये अलीकडे प्रसार होत असून योगविद्येचे आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने संशोधनही सुरू झाले आहे. डॉ. डी. जी. रेळे तसेच लोणावळे येथील ‘कैवल्यधाम’ या योगविद्येच्या अभ्यासाच्या केंद्राचे संस्थापक स्वामी कुवलयानंद आणि त्यांचे सहकारी यांनी योगासने आणि प्राणायाम यांचे विशेष संशोधन केले आहे. त्यांच्या म्हणण्याचे तात्पर्य असे-प्राणायाम आणि जिमखान्यातील इतर व्यायामांचे प्रकार यांच्यात मुख्य भेद असा, की यौगिक आसने आणि प्राणायाम यांच्या योगाने घडणारा व्यायाम हा दमछाट करणारा वा शरीरशक्ती पणास लावणारा स्नायूंचा व्यायाम नसतो. रोगप्रतिकारशक्ती आणि आरोग्य ही दोन्ही प्रकारच्या व्यायामांची प्रयोजने होत. परंतु यौगिक व्यायामामध्ये मनाची शक्ती आणि शांती वाढून मनोरोगांचेही निवारण होते मनोरोगांना प्रतिबंध होतो. तसे जिमखानी व्यायामांचे नसते. कारण मानसिक दौर्बल्य घालविणे आणि मनःसामर्थ्य वाढविणे हा त्यांचा उद्देश नसतो. परंतु यौगिक व्यायामामध्ये हा एक प्रमुख उद्देश मानला जातो. दुसरे असे, की आसनांचा व्यायाम जरी सौम्य असला, तरी इतर व्यायामांमध्ये व्यायाम सुटल्याबरोबर मेदवृद्धी होऊन शरीर स्थूल बनण्याचा धोका असतो. तो धोका आसनांच्या व्यायामांमध्ये कमी असतो. तिसरे असे, की प्राणायामाचे मुख्य उद्दिष्ट शरीर व मन या दोघांची शुद्धी आणि आरोग्य हे असल्यामुळे त्यात मेंदू आणि मज्जातंतू यांचे पोषण करणाऱ्या ऑक्सिजन वायूचा रक्ताला भरपूर पुरवठा करणे हे महत्त्वाचे कार्य होते. प्राणायामाने अंतरिंद्रियांमध्ये रुधिराभिसरण वाढते. स्नायूंचे श्रम टाळून प्राणायाम करायचा असतो. त्यामध्ये हृदय, फुप्फुसे, अन्ननलिका, श्वासनलिका इत्यादिकांचा व्यायाम प्रामुख्याने घडत असतो. ऑक्सिजनने भरलेल्या रक्ताचा खोलात खोल सूक्ष्म प्रवेश प्राणायामाने सतत घडत असतो. प्राणायाम करत असताना शरीराचे कोणतेही भाग श्रमाने थकत नाहीत, त्यामुळे शरीरातील सगळी इंद्रिये, अन्नाशय, लहानमोठ्या अन्ननलिका, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड, मूत्राशय, मलाशय इ. सर्वांना ऑक्सिजनने भरलेल्या रक्ताचा पुरवठा होतो. कारण या सगळ्यांना मूल बंध, उड्डियान बंध, जालंधर बंध, भस्त्रिका इत्यादिकांनी मर्दन घडत असते. कपालभातीच्या योगाने कान, नाक, डोळे, घसा, फुप्फसे आणि हृदय यांच्यातील दूषित वायूचा सारखा निचरा होतो. एकंदरीत मेंदू आणि पृष्ठवंश यांनाही ऑक्सिजनने भरलेल्या रक्ताचा पुरवठा होतो आणि ऑक्सिजन जास्तीत जास्त आत्मसात करण्याची शक्ती प्राप्त होते.

 

पहा : योगदर्शन, योगासने, हठयोग.

 

संदर्भ : 1. Gopi Krishna, The Secret of Yoga, London, 1972.

            2. Kuvalayananda, Svami, Pranyama, Bombay, 1966.

          3. घेरण्डयोगीश्वर, घेरण्डसंहिता (योगशास्त्रम्), लक्ष्मीवेंकटेश्वर मुद्रणालय प्रत, कल्याण – मुंबई, १९११.

          4. शास्त्री, पोलकम् श्रीराम शास्त्री, एस्. आर्. कृष्णमूर्ती, संपा. पातन्जलयोगसूत्रभाष्यविवरणम्    (शङ्‌करभगवत्पादप्रणीतम्), मद्रास, १९५२.

          5. स्वात्माराम योगींद्र, हठयोगप्रदीपिका (बह्मानंदकृत संस्कृत टीका व श्रीधरकृत हिंदी भाषा यांसहित), प्रबोधरत्नाकर मुद्रणालय प्रत, मुंबई, १९८५.

 

जोशी, लक्ष्मणशास्त्री