मॉजाँग खेळातील कौलांचा संच

मॉजाँग : एक चिनी खेळ, ‘मॉजाँग’ चा शब्दशः अर्थ चिमण्या. हा खेळ फार प्राचीन असून इ. स. पू. सु. ५०० पासून अस्तित्वात असावा. साधारणपणे ⇨ रमी या खेळाप्रमाणे तो खेळला जातो. त्यात पत्त्याच्या आकाराची आयताकृती व सपाट कौले (टाइल्स) वापरली जातात. त्यांवर चिनी आकृत्या व प्रतीकात्म चिन्हे कोरलेली असतात. कौले प्लॅस्टिक, हस्तिदंत वा अस्थी यांपासून बनवितात व त्यांना लाकडी पाठी असतात. पत्त्यांच्या चार रंगांप्रमाणे कौलांचे चित्रखुणा (कॅरेक्टर्स), वर्तुळे व बांबू असे तीन प्रकार असून प्रत्येक प्रकारात अनुक्रमे १ पासून ९ पर्यंत एकूण नऊ कौले असतात व अशा तीन प्रकारांतील प्रत्येकी नऊ कौलांचे एकूण चार संच खेळात वापरतात. यांखेरीज वाऱ्यांच्या दिशांची चार कौले, फुलांची वा ऋतूंची चार कौले आणि सात ‘ऑनर्स’ चे चार संच अशी एकूण १४४ कौले पौर्वात्य पारंपारिक खेळात वापरतात. त्यांतील ‘ड्रॅगन’ नामक कौलांचे तांबडा, पांढरा व हिरवा असे तीन प्रकार असतात. अमेरिकन मॉजाँगमध्ये जोकरची ८ कौले वापरतात.

हा खेळ सामान्यतः चार खेळाडूंमध्ये खेळला जातो. तथापि दोन ते सहा व्यक्तीही तो खेळू शकतात. त्यात खेळाडूंच्या जोड्या नसतात तर प्रत्येक खेळाडू स्वतंत्र रीत्या खेळतो. प्रत्येक खेळाडूला वाऱ्याच्या दिशेच्या नावाने संबोधले जाते आणि प्रत्येक खेळाडूची दिशा डावाच्या सुरुवातीला फासे टाकून ठरवली जाते. प्रत्येक खेळाडूस तेरा कौले वाटली जातात. पण पूर्वेच्या खेळाडूला चौदा कौले मिळतात व तोच पहिली उतारी करतो. उर्वरित कौलांचा गठ्ठा मध्यभागी रचला जातो. त्याला ‘भिंत’ (वॉल) म्हणतात. या गठ्ठ्यातून क्रमाक्रमाने प्रत्येक खेळाडू एकेक कौल उचलतो व हातातले नको असलेले कौल खाली टाकतो. एखादा खेळाडू आपल्या डावीकडच्या खेळाडूने उतरलेले कौलही, जुळणीसाठी आवश्यक असल्यास उचलू शकतो. रमीप्रमाणेच या खेळातही एकाच प्रकारातील तीन कौलांची क्रमरचना (सिक्वेन्स) म्हणजे ‘चो’ तीन समान जुळणी म्हणजे ‘पुंग’, चार समान कौलांची जुळणी म्हणजे ‘काँग’ अशी विविध प्रकारे खेळाडूला आपल्या हातातील कौलांची जुळणी करता येते. तीन-तीन कौलांचे चार संच व दोन समान कौलांची एक जोडी (म्हणजेच मॉजाँग) अशी चौदा कौले जो खेळाडू सर्वप्रथम जुळवतो (कम्प्लिट हँड) तो त्या डावात विजयी ठरतो. अशा प्रकारे एकूण चार फेऱ्या होईपर्यंत खेळ चालतो. प्रत्येक डावात पूर्ण झालेल्या हाताची गुणमोजणी ही त्या विशिष्ट जुळणीला अनुसरून केली जाते. जुळणी जितकी बिकट व दुर्मिळ, तितके गुण जास्त. खेळ संपतेवेळी ज्याचे  गुण सर्वांत जास्त तो खेळाडू जिंकतो.

चीनमध्ये हा खेळ समाजाच्या सर्व स्तरांवरील स्त्रीपुरुषांत लोकप्रिय आहे. १९२० च्या दशकात तो प्रथम अमेरिकेत आणि हळूहळू अन्य पाश्चात्य देशांत पोहोचला. जोसेफ पी. बॅब्‌कॉक या चीनमधील अमेरिकन प्रवाशाने मॉजाँगच्या पाश्चिमात्य प्रकारची नियमावली व परिभाषा १९२० मध्ये तयार केली. न्यूयॉर्कमधील ‘नॅशनल मॉजाँग लीग’ (स्था. १९३७) ही अमेरिकन खेळाचे नियंत्रण करणारी संघटना आहे.

संदर्भ : Wu Chung, An Advanced System for Playing Mah ong, Dorrance, 1973.

शहाणे, शा. वि.