भोवरा–२: मुलांचा एक आवडता खेळ. साधारणपणे संक्रांतीनंतर भोवरे खेळावयाचा मोसम सुरू होतो व होळीपर्यंत चालतो. या खेळाला लहान पण मोकळी व सपाट जागा पुरते.विविध

प्राचीन ग्रीक-रोमन काळातही भोवऱ्याचा उल्लेख सापडतो. यूरोपात चौदाव्या शतकानंतर भोवऱ्याचा वापर आढळतो. जीन व जपानमध्ये भोवरा फार पुरातन काळापासून लोकप्रिय आहे. भोवरे हे साग, शिसवी किंवा आंबा या प्रकारच्या लाकडांचे, तसेच पत्र्याचे किंवा प्लॅस्टिकचे करतात. भोवरा एका टोकाला गोलसर जाड आणि दुसऱ्या टोकाला निमुळता असतो. निमुळत्या टोकात लोखंडाची तार बसवितात. तिला ‘आर’ आणि डोक्यावरील बोंडाला ‘मोगरी’ म्हणतात. निमुळत्या भागावरून गुंडाळलेली दोरी घसरू नये म्हणून त्यावर काप किंवा खाचा असतात. मोगरीपासून कापापर्यंत भोवरे रंगवून आकर्षक करतात. निमुळत्या बाजूकडून दोरी गुंडाळल्यानंतर दोरीचे एक टोक हातात पक्के धरून झटका देऊन तो आरेवर पडेल अशा रीतीने दोरीला ओढ देत फेकला, म्हणजे भोवरा फिरू लागतो. या दोरील ‘जाळी’ आणि भोवऱ्याच्या फिरण्याला ‘नाद’ असे म्हणतात.

दोन्ही बाजूंनी निमुळत्या आणि टोकांना आर असलेल्या भोवऱ्याला ‘दुआरी भोवरा’ म्हणतात. एकेक जिल्ही आणि दोन-दोन जिल्ही असे खेळांचे दोन प्रकार आहेत. ‘जिल्ही’ म्हणजे सु. २ ते २ / फूट (सु. ०.६० ते ०.७५ मी.) व्यासाच्या वर्तुळाने व्यापलेली जागा होय. एक किंवा दोन वर्तुळांत भोवरा कोचून जिल्हीतील भोवऱ्याला टोले मारून, किंवा जाळीने झेलून हे खेळ खेळतात. भोवरा टोल्यांमुळे दुसऱ्या जिल्हीत जाईल त्याला इतर खोळाडू ‘आरे’ ने ठरलेले धाव घालतात, त्याला ‘गुब्बा’ असे म्हणतात. ‘नाद जाय लूट जाय’ या खेळात दोन मुलांनी एकाच वेळी भोवरे फिरवून ज्याच्या भोवऱ्याचा नाद प्रथम जाईल, त्याने हरल्याबद्दल आपला भोवरा दुसऱ्या खेळाडूला द्यावयाचा असतो.

आर, भोवऱ्याचा निमुळता भाग आणि डोके यांचा समतोल साधला, तरच भोवरा संथपणे आणि जास्त वेळ फिरू शकतो. फिरवताना जमिनीवर पडू न देताच उसळी देऊन भोवरा स्वतःच्या हातावर घेणे किंवा जमिनीवर फिरत असलेला भोवरा मधल्या आणि अंगठ्याजवळच्या बोटांच्या मधून झटक्याने हातावर घेणे इ. भोवरा फिरविण्याचे कौशल्याचे अनेक प्रकार आहेत. सर्कशीतही कुशल भोवरे फिरविणारे आपले कौशल्य मोठे भोवरे फिरवून दाखवितात.

भोवरा आरेवर न फिरता आडवा होऊन निमुळत्या भागावरूनच फिरत गेला तर त्याला ‘कत्तर खाणे’ आणि तो उलटा मोगरीवर फिरू लागला तर त्याला ‘ढफणा’ असे म्हणतात. भोवऱ्याच्या गोलाकार स्थिर फिरकीच्या तत्त्वाचा उपयोग ⇨घूर्णी (जायरोस्कोप) या यंत्रात केलेला आहे.

गोखले. श्री. पु.