कृष्णन, रामनाथन्: (११ एप्रिल १९३७ –    ). जागतिक कीर्तीचा भारतीय टेनिसपटू. त्याचे वडील टी. के. रामनाथन् उत्तम टेनिसपटू त्यास टेनिसचे बाळकडू मिळाले. त्याचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले. तो एम्.ए. असून मद्रासच्या सिलिंडर गॅस कंपनीत जनरल मॅनेजर आहे.

रामनाथन्, कृष्णन

टेनिसच्या खेळातील बहुतेक सर्व प्रकारच्या टोल्यांवर त्याचे प्रभुत्व आहे. विशेषतः डावा टोला न थांबता टोला तो सफाईदार मारतो. १९५४ मध्ये विंबल्डनच्या जागतिक टेनिस स्पर्धेत त्याने कनिष्ठ विभागात अजिंक्यपद मिळविले. अखिल भारतीय टेनिस स्पर्धेत ८ वेळा व आशियाई टेनिस स्पर्धेत ४ वेळा त्याने अजिंक्यपद मिळविले. १९५९ साली अमेरिकन हार्ड कोर्ट टेनिस स्पर्धेत व इंग्लंडमधील लंडनच्या ग्रास कोर्ट टेनिस स्पर्धेत त्याने अजिंक्यपद मिळविले. डेव्हिस कप स्पर्धेतील चॅलेंज राउंड पर्यंत व विंबल्डन टेनिस स्पर्धेत उपान्त्य फेरीपर्यंत दोन वेळा तो पोहोचू शकला.

टेनिसच्या खेळातील नैपुण्यामुळे भारत सरकारने त्यास अर्जुन पुरस्कार (१९६१) व पद्मभूषण (१९६७) ही पदवी देऊन त्याचा गौरव केला. आशियातील सर्वोत्तम टेनिसपटू म्हणून त्यास हेल्म्स पुरस्कार मिळाला आहे (१९६६).

शहाणे, शा. वि.