हिदायत, तौफिक : (१० ऑगस्ट १९८१). जागतिक कीर्तीचा इंडोनेशियन बॅडमिंटन पटू. त्याचा जन्म बाडूंग (इंडोनेशिया) येथे एरिज हॅरिस तौफिक हिदायत व इनॉक दार्तिलाह या सुशिक्षित दांपत्यापोटी झाला. त्याचे सुरुवातीचे शिक्षण बाडूंग येथे झाले. विद्यार्थिदशेतच त्याने बॅडमिंटनमध्ये कौशल्य दाखविले. पुढे तो बाडूंगमधील एस्. जी. एस्. क्लबमध्ये प्रशिक्षणासाठी जाऊ लागला. तिथे त्याला लाय सुमिरात यांच्याकडून प्रशिक्षण मिळाले. इंडोनेशियन खुल्या बॅडमिंटनस्पर्धेत २००५ साल वगळता १९९९ पासून सलग सहा वेळा (१९९९–२००६) चषक जिंकण्याची कामगिरी तौफिक हिदायत याने केली. २००४ मध्ये हिदायतने अथेन्स(ग्रीस) ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळविले. ऑगस्ट २००५ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. २००२ मध्ये बुसान यो आणि २००६ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धांत त्याने सुवर्णपदक मिळवले. इंडोनेशियाचा हिदायत आणि चीनचा लिन दान हे एकमेकांचे कडवे प्रतिस्पर्धी मानले जात. बहुतेक जागतिक स्पर्धेत ते अंतिम सामन्यात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असत. प्रसार माध्यमांबरोबरच प्रेक्षकांसाठीही त्या दोघांमधील लढत ही उत्कंठापूर्ण ठरे. हिदायत हा बॅकहँडच्या फटक्यांमध्ये अत्यंत तरबेज होता. २००६ मध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत त्याच्या बॅकहँडच्या फटक्यांचा जास्तीत जास्त वेग ताशी ३०५ किलोमीटरचा नोंदविला गेला आहे. २००६ च्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्याने फोरहँडचा वापर करून मारलेले स्मॅशचे फटके हे अविस्मरणीय म्हणून ओळखले जातात. बॅडमिंटन क्रीडांगणावरील त्याच्या चपळ हालचाली, जाळ्याजवळील चकवे ड्रॉप्स् आणि कौशल्यपूर्ण सर्व्हिस हे त्याच्या खेळाचे वैशिष्ट्य असून आपल्या डावपेचाबद्दल तो अतिशय प्रसिद्ध होता. त्याची पाच वेळा (१९९९, २००१, २००३, २००५, २००७) सुदिरमान चषकासाठी इंडोनेशियन संघामध्ये निवड करण्यात आली होती. सात वेळा (२०००, २००२, २००४, २००६, २००८, २०१०, २०१२) टॉमस चषकासाठी तर चार वेळा (२०००, २००४, २००८, २०१२) ऑलिंपिकसाठी त्याची इंडोनेशियन संघात निवड झाली होती. 

 

क्रीडा क्षेत्रात शिखरावर असतानाच त्याने आमिदायंती गुमेलर या युवतीशी विवाह केला (२००६). त्यांना एक कन्या आहे. अलीकडेच तो व्यावसायिक बॅडमिंटन स्पर्धांतून निवृत्त झाल्या असून बॅडमिंटन ॲकॅडेमी सुरू करण्याचा त्यांचा मनोदय आहे. 

गोखले, अरविंद व्यं.