आबेल, क्येल : (२५ ऑगस्ट १९०१ – ५ मार्च १९६१). डॅनिश नाटककार. जन्म जटलंडमधील रीब येथे. राज्यशास्त्राचा पदवीधर (१९२७). तथापि कार्यक्षेत्र म्हणून त्याने रंगभूमीची निवड केली. लंडन आणि पॅरिस येथे राहून (१९२७ – १९३०) त्याने रंगभूमीविषयक अनेक गोष्टींबरोबरच रंगभूमीवरील देखावे चित्रित करण्याचा अनुभव घेतला. त्याने लिहिलेल्या नाटकांपैकी Melodien der blev vaek (१९३५, इं. भा. द मेलडी दॅट गॉट लॉस्ट, १९३९) हे त्याचे पहिले यशस्वी नाटक. ते अत्यंत लोकप्रिय झाले. Eva aftjener sin Vaeernepligt (१९३६, इं. शी. ईव्ह सर्व्ह्ज हर चाइल्डहूड ट्यूटी) ही त्याची सुखात्मिकाही यशस्वी ठरली. ॲना सोफी हेटव्हिग (१९३९, इं. भा. १९४५) हे त्याचे गंभीर समस्यात्मक नाटक. स्पेनच्या यादवी युद्धात तटस्थ राहणाऱ्या नागरिकांच्या उदासीनतेवर या नाटकात त्याने प्रखर हल्ला चढविला आहे. तसेच फॅसिझमवरही या नाटकात टीका आहे. त्याच्या इतर नाटकांतून बूर्झ्वा मनोवृत्ती, बुद्धिवाद्यांची आणि व्यक्तिवाद्यांची निष्क्रियता यांचा उपहास व प्रेम आणि बंधुत्व यांवरील श्रद्धा व्यक्त झालेली दिसते. नेपथ्यादी रंगभूमीच्या तंत्रात तो निष्णात होता. त्याने काही पटकथाही लिहिल्या. उदा., Tak fordi du kom (१९४१, इं. शी. द थँक्स् फॉर कमिंग) आणि Regnen holdt op (१९४२, इं. शी. द रेन स्टॉप्ड). कोपनहेगन येथे तो निवर्तला.

एफ्. जे. बिलेस्कॉव्ह यानसेन (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)