ब्रॅडमन, डॉन : (२७ ऑगस्ट १९०८ -). ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ फलंदाज व यशस्वी कप्तान. पूर्ण नाव सर डॉनल्ड जॉर्ज ब्रॅडमन. न्यू साउथ वेल्समधील कूटमंड्र या गावी जन्म. त्याचे बालपण बाउरल येथे गेले. ‘बाउरल इंटरमीजिएट स्कूल’ मध्ये त्याचे शालेय शिक्षण झाले. त्यास क्रिकेट खेळण्यास वडिलांनी प्रोत्साहन दिले. तो स्वयंसिद्ध क्रिकेटपटू होता. त्याने कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय स्वतःच सराव करून क्रिकेटचे तंत्र आत्मसात केले. सततच्या सरावाने त्याची चेंडूवर दृष्टी बसली. सुरुवातीस तो क्रिकेट सामन्यांमध्ये धावा नोंदणी काराचे काम करी. हे काम करीत असतानाच तो अकराव्या वर्षी पहिला सामना खेळला. बाराव्या वर्षी त्याने शालेय सामन्यांमध्ये शतक केले. सतराव्या वर्षांपासून तो ‘बाउरल डिस्ट्रिक्ट’ संघातर्फे जिल्हा पातळीवर बेरीमा स्पर्धेतही खेळू लागला. १९२७-२८च्या हंगामापासून तो राष्ट्रीय स्पर्धेत न्यू साउथ वेल्स संघाकडून खेळू लागला. पहिल्याच सामन्यात वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्याने द. ऑस्ट्रेलियावरुद्ध शतक (११८ धावा) काढले. दुसऱ्या हंगामात व्हिक्टोरिया विरुद्ध त्याने नाबाद ३४० आणि तिसऱ्या हंगामात क्वीन्सलँडविरुद्ध नाबाद ४५२ धावा केल्या. १९२७ ते ३४ पर्यंत तो न्यू साउथ वेल्सकडून व १९३५ ते ४९ पर्यंत द. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दर्जाचे क्रिकेट खेळला. १९२८-२९ च्या हंगामात त्याची कसोटी कारकीर्द सुरू झाली. ऑस्ट्रेलियातर्फे इंग्लंडविरुद्ध खेळताना स्वतःच्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात त्याने शतक (११२) झळकवले. १९४८ साली कीर्तीच्या शिखरावर असतानाच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आणि १९४९ सालापासून पहिल्या दर्जाच्या सामन्यांचाही निरोप घेतला. पहिल्या दर्जाच्या सामन्यांतील त्याच्या धावा अशा : एकूण धावा – २८,०६७ शतके – ११७, त्यांपैकी ३७ द्विशतके, ६ त्रिशतके व १ चौशतक सर्वोच्च धावा -नाबाद ४५२ सरासरी – ९५.१४ धावा. १९३८ – ३९ च्या हंगामात त्याने लागोपाठ सहा डावांत शतक झळवण्याचा मान मिळवला. तसेच सामन्याच्या दोन्ही डावांत शतक काढण्याची कामगिरी त्याने चार वेळा करून दाखवली. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने असेत अद्वितीय विक्रम केले आहेत. कसोटी क्रिकेट कारकीर्दीतील त्याच्या धावा अशा : एकूण कसोटी सामने ५२ एकूण डाव ८० नाबाद १० एका खेळीतील सर्वोच्च धावा ३३४ एकूण धावा ६,९९६ सरासरी ९९.९४ धावा शतके २९ अर्धशतके १३. क्षेत्ररक्षणात झेल ५२. आपल्या ५२ कसोटी सामन्यांत तो इंग्लंडविरुद्ध ३७, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५, वेस्ट इंडीजविरुद्ध ५ व भारताविरुद्ध ५ सामने खेळला.

विक्रमी फलंदाज डॉन ब्रॅडमन : लेगचा फटका मारल्यावर

ब्रॅडमन एकूण जे ५२ कसोटी सामने खेळला, त्यांपैकी २४ सामन्यांत त्याने ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले. त्यांत त्याने १५ विजय मिळविले व फक्त ३ वेळा त्याला पराभव पतकरावा लागला. उर्वरित सहा सामने अनिर्णित राहिले. कप्तान म्हणून त्याने एकदाही मालिका गमावली नाही, हे त्याच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होय. १९४८ सालच्या इंग्लंड दौऱ्यात तर त्याचा संघ एकही सामना न हरता, विजयाधिक्य मिळवून परतला.

ब्रॅडमनच्या आक्रमक व धडाकेबाज फलंदाजीला आवर घालण्यासाठीच जार्डीन या इंग्लिश कप्तानाने १९३२ च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात प्रथमतः शरीरवेधी गोलंदाजीचा (बॉडी लाइन) दहशतवादी प्रकार अंमलात आणला, असे म्हटले जाते. मात्र या भयानक माऱ्याला तोंडदेत ब्रॅडमनने नाबाद १०३, ६६, ७६, ४८ व ७१ अशा धावा केल्या.

ब्रॅडमनचा खेळ हा तंत्रशुद्धतेपेक्षा व बचावापेक्षा आक्रमकतेवर अधिक भर देणारा होता. तो द्रुतगती गोलंदाजीला घाबरत नसे. त्याची तीक्ष्ण नजर, अचूक अनुमान, उत्तम समयोचित पदचापल्य, अतुलनीय धैर्य, आत्मविश्वास इ. गुणांच्या जोरावर त्याने फलंदाजीत अमाप यश मिळविले. चेंडू कुठून कुठे वळणार, याचा आडाखा तो अगोदरच बांधी व चेंडू यायच्या आतच त्याचा पवित्रा तयार असे. चेंडू कुठे फटकारायचा, ह्यासाठी त्याच्या मनात दोन दोन फटके विचाराधीन असत. त्यामुळे पुन्हा तसाच चेंडू पडला, तर त्याचा वेगळा फटका दिसे. ब्रॅडमनच्या फलंदाजीचे हे प्रमुख वैशिष्ट्य होते. तसेच धावा जमवण्याची दुर्दम्य आकांक्षा त्याच्यामध्ये होती. म्हणूनच की काय, शंभर धावा पूर्ण केल्यावर तो पुढची धाव काढी, ती जणू काय पहिलीच धाव घेतो आहे इतक्या दक्षतापूर्वक सावधतेने. कारण त्याचे पुढचे लक्ष्य दोनशे धावांचे असे. ब्रॅडमनच्या थोरवीचे हेच प्रमुख लक्षण आहे.

ब्रॅडमन म्हणजे धावा जमवणारे यंत्र, असे समीकरणच त्याच्या धावा काढण्याच्या वेगामुळे व सातत्यामुळे तयार झाले होते. ब्रॅडमनला १९४९ साली ‘सर’ हा किताब ब्रिटिश शासनाने दिला. बाउरल येथील मैदानाला ब्रॅडमनचे नाव देण्यात आले (ब्रॅडमन ओव्हल). ब्रॅडमनच्या नावाने क्रिकेटच्या बॅटी प्रसिद्ध आहेत. ऑस्ट्रेलिनय बोर्डाच्या निवड समितीवर काम करण्याची संधी ब्रॅडमनला कैक वर्षे मिळाली. एम्. सी. सी. ने (मेरिलीबोन क्रिकेट क्लब) त्याला आपले सन्मान्य आजीव सभासदत्व दिले. तसेच ब्रॅडमनला ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष होण्याचा अत्युच्च मान लाभला. याशिवाय पत्रकार व नभोवाणीवरील क्रिकेट तज्ञ म्हणूनही त्याला क्रिकेटची सेवा करण्याची संधी मिळाली. ब्रॅडमनने पुढील पुस्तके लिहिली : फेअरवेल टू क्रिकेट (१९५०) हे आत्मचरित्रपर पुस्तक, द आर्ट ऑफ क्रिकेट (१९५८) हे खेळण्याच्या तंत्रमंत्राची सोदाहरण व सचित्र माहिती देणारे पुस्तक तसेच डॉन ब्रॅडमन्स बुक (१९३०), माय क्रिकेटिंग लाइफ (१९३७) व हाऊ टू प्ले क्रिकेट इ. त्याची ग्रंथ संपदा त्याच्या क्रीडालौकिकात भर घालणारी अशीच आहे.

संदर्भ : 1. Arlott, John, Ed. Cricket : The Great Ones, London, 1967.

           2. Davis, Anthony, Sir Donald Bradman, London, 1960.

          ३. ताटके, अरविंद, डॉन ब्रॅडमन, पुणे, १९६५.

पंडित, बाळ ज.