मार्क अँड्र्यू स्पिट्स

स्पिट्स, मार्क अँड्र्यू : (१० फेब्रुवारी १९५०). अमेरिकन जलतरणपटू. जन्म कॅलिफोर्निया येथील मॉडेस्टो येथे. आईचे नाव लिनोरी. वडील आर्नल्ड हे पोलाद कंपनीत अधिकारी होते. मार्क दोन वर्षांचा असताना त्यांची हवाई बेटांवरील होनोलूलू येथे बदली झाली. ते मार्कला तेथील वैकिकी बीचवर दररोज पोहायला नेत असत. वयाच्या आठव्या वर्षापासून मार्कने आपल्या पोहण्याच्या सरावास मेहनतीने सुरुवात केली. कॅलिफोर्नियामधील ‘ सान्ता क्लारा स्वीम क्लब ’ च्या जॉर्ज हेन्झ नामक प्रशिक्षकाकडून मार्कने पोहण्याचे धडे घेतले. ब्लूमिंग्टन येथील इंडियाना विद्यापीठातून तो पदवीधर झाला (१९७२). आंतर-महाविद्यालयीन जलतरण स्पर्धांमध्ये त्याने आपल्या महाविद्यालयाचे नेतृत्व केले होते. १९६७ मधील पॅन-अमेरिकन जलतरण स्पर्धेत पाच सुवर्णपदके त्याने मिळविली. १९६८ मध्ये मेक्सिको येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये त्याने दोन सुवर्णपदके, एक रौप्यपदक व एक कांस्यपदक मिळवले. इंडियाना विद्यापीठाच्या जेम्स कॉन्सिलमन या तज्ज्ञ प्रशिक्षकाकडून त्याने पोहण्याचे प्रशिक्षण घेतले (१९६९—७२) व तो राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भाग घेणार्‍या चार संघांसाठी पोहला. १९७१ मध्ये ‘ ॲमच्युअर ॲथलेटिक युनियन ’ तर्फे देण्यात येणारा ‘ सलिव्हन ’ करंडक त्याने मिळवला. १९७२ मध्ये म्यूनिक येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये सात सुवर्णपदके जिंकून त्याने आपली विशेष गुणवत्ता सिद्ध केली. एकाच ऑलिंपिकमध्ये ७ सुवर्णपदके पटकावणारा पहिला जलतरणपटू म्हणून त्याने नावलौकिक मिळवला. तसेच ही ७ सुवर्णपदके मिळवताना त्याने आधीचे सातही जागतिक विक्रम मोडले. १९६८ व १९७२ या दोन स्पर्धांमध्ये मिळून त्याने एकूण ९ सुवर्ण, ५ रौप्य व ४ कांस्यपदकांची कमाई केली. ऑलिंपिकमध्ये विक्रमी सुवर्णपदके पटकावणारा जलतरणपटू म्हणून त्याची ख्याती अजरामर आहे. १९७२ मध्ये तो व्यावसायिक जलतरणपटू बनला. त्याने जलतरणामध्ये एकूण ३५ विश्वविक्रम प्रस्थापित केले.

 शार्क’ या टोपणनावाने त्याला लोकप्रियता लाभली होती. त्याच्या लक्षवेधी शैलीमुळे त्याला ‘ मार्क दि शार्क ’ असे संबोधले जाऊ लागले.

पाटील, क्रांती