साहा, आरती : (२४ सप्टेंबर १९४०–२३ ऑगस्ट १९९४). आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भारतीय जलतरणपटू. इंग्लिश खाडी पोहून पार करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत. आरती गुप्ता म्हणूनही त्या ओळखल्या जातात. त्यांचा जन्म कोलकाता येथे एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना पोहण्याची आवड होती. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्यांनी पोहायला सुरुवात केली. त्यांचे पोहण्यातील कौशल्य पाहून विख्यात भारतीय जलतरणपटू व प्रशिक्षक सचिन नाग यांनी त्यांना जलतरणाचे धडे दिले.

साहा यांनी जलतरणातील २२ राज्यस्तरीय स्पर्धा १९४५ ते ५१ या काळात जिंकल्या. १९४९ मध्ये त्यांनी अखिल भारतीय पातळीवरील जलतरणातील विजेतेपद पटकविले. १९५२ मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी डॉली रुस्तूम नझीर यांच्यासमवेत जलतरण क्रीडासामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. प्रख्यात भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी २९ सप्टेंबर १९५९ रोजी फ्रान्समधील केप ग्रिस नेझ ते इंग्लंडमधील सँडगेट अशी ४२ मैल (६७·५९किमी.) अंतराची इंग्लिश खाडी १६ तास २० मिनिटांत पोहून पार केली व सँडगेट येथे भारताचा तिरंगा ध्वज फडकविला. हा विक्रम करणाऱ्या त्या आशियातील पहिल्या महिला ठरल्या. त्यांना भारत सरकारने पद्मश्री (१९६०) हा पुरस्कार देऊन गौरविले. जलतरणातील योगदानाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल खात्याने त्यांच्या नावे तिकिटाचे प्रकाशन (१९९८) केले.

त्यांचे कोलकाता येथे काविळीच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या मुलीचे नाव अर्चना गुप्ता असून त्या कोलकाता येथील ‘ सॉल्ट लेक स्कूल’ मध्ये अध्यापनाचे काम करतात.

 

मिठारी, सरोजकुमार