विंबल्डन : लॉन टेनिसच्या स्पर्धासाठी जगप्रसिद्ध असलेले लंडनचे उपनगर. लंडन महानगरातील मर्टन बरोचा हा एक भाग असून ते उपनगर लंडन शहराच्या नैर्ऋत्येस व टेम्स नदीच्या दक्षिणेस सु. १३ किमी. वर वसलेले आहे. इ. स. पू. पहिल्या शतकात रोमनांनी येथे वसाहत केल्याचे दिसून येते तथापि त्याचे तत्कालीन फारसे अवशेषा उपलब्ध नाहीत. जगातील लॉन टेनिसच्या चार बहुमानाच्या ग्रँड स्लॅम सामन्यांपैकी (विंबल्डन, ऑस्ट्रेलिया, फ्रेंच व अमेरिकन) विंबल्डन ग्रँड स्लॅम हे सामने येथे दरवर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होतात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होतात. हे प्रामुख्याने हिरवळीच्या मैदानावर (ग्रास कोर्टवर) खेळविले जातात. विंबल्डनच्या या परिसरात एकूण लॉन टेनिसची पस्तीस स्वतंत्र मैदाने असून मधल्या मैदानावर (सेंटर कोर्टवर) अंतिम सामने खेळविले जातात. या सामन्यांची परंपरा शंभर वर्षांहून अधिक असून पंरपरांचे काटेकोरपणे पालन हे येथील वैशिष्ट्य आहे. गतवर्षीच्या पुरुष एकेरीतील अजिंक्य खेळाडूच्या हस्ते चालू वर्षीच्या विंबल्डन सामन्यांचे उद्‌घाटन होते.

विंबल्डन येथे ‘ऑल इंग्लंड क्रोके क्लब’ या संस्थेने १८७७ मध्ये प्रथम एका क्रोके (लांब दांड्याच्या लाकडी मोगऱ्याने खेळावयाचा एक खेळ) लॉनवर टेनिस स्पर्धा भरविल्या आणि खेळास लॉन टेनिस हे नाव दिले. पुढे २६ जानेवारी १८८८ मध्ये ‘लॉन टेनिस असोसिएशन’ची स्थापना करण्यात आली. ती संस्था ‘ऑल इंग्लंड चँपिअन्स’ किंवा ‘विंबल्डन चॅपिंअन्स’ या नावाने सामने घेऊ लागली. पुढे क्रोके क्लबचे काही वर्षानंतर ‘विंबल्डन क्लब’ असे नामांतर करण्यात आले आणि इंग्लंडमधील सर्व लॉन टेनिसचे सामने नियंत्रित करण्यासाठी एक नियमावली तयार करण्यात आली. या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष केंट परगण्याचे राजपुत्र असून दरवर्षी त्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात येतात. ऑक्सफर्ड येथे भरणारे राष्ट्रीय दुहेरी सामने या ठिकाणी १८८४ साली स्थानांतरित झाले. एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी या स्पर्धांव्यतिरिक्त १९४९ पासून उत्तेजनार्थ सोळा वर्षांखालील मुला-मुलींच्या स्पर्धा विंबल्डन येथे सुरू करण्यात आल्या. सुरुवातीस या स्पर्धा फक्त हौशी खेळाडूंकरिताच होत्या, परंतु १९७० पासून त्या व्यावसायिक खेळाडूंनाही खुल्या करण्यात आल्या आहेत.

विंबल्डन येथे १९ मे १९७७ रोजी टेनिस खेळातील बहुविध प्रकारच्या जुन्या-नव्या वस्तूंचे संग्रहालय स्थापन करण्यात आले. त्यात नामवंत टेनिसपटूंच्या रॅकेट, बूट, कपडे, छायाचित्रे इत्यादी दुर्मिळ वस्तू असून संग्रहालयाजवळच टेनिस खेळाची माहिती देणारे अद्ययावत ग्रंथालय आहे, शिवाय टेनिसच्या सर्व वस्तू उपलब्ध होतील, असे दुकान आणि जुन्या खेळांच्या चित्रफिती पाहण्यासाठी आधुनिक सुखसोयींनी युक्त असे चित्रपटगृह बांधण्यात आले आहे. विंबल्डन ही टेनिस शौकिनांची व खेळाडूंची ‘मक्का’ मानण्यात येते. या उपनगरात प्रसिद्ध इंग्रजी लेखिका जॉर्ज एलियट हिचे काही वर्षे वास्तव्य होते. येथील ‘विंबल्डन कॉमन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागाचे क्षेत्र सु. १,२०० एकर असून या भागात पवनचक्की, वेगेवगळ्या वनस्पती, सरोवरे, तलाव आहेत. तसेच केल्टिक काळातील मातीचा कोट असलेला येथील ‘सीझर कँप’ प्रसिद्ध आहे.

देशपांडे, सु. र.