सेठी, गीत श्रीराम : (१७ एप्रिल १९६१). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय बिल्यर्ड्झपटू. ⇨ बिल्यर्ड्झ या खेळाच्या स्नूकर या प्रकारातही त्यांनी जागतिक प्रावीण्य मिळवले. दिल्ली येथे एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण अहमदाबाद येथील सेंट झेवियर्स हायस्कूल व महाविद्यालयात झाले. पुढे त्यांनी अहमदाबाद येथील बी. के. स्कूल या व्यवसाय–व्यवस्थापन संस्थेतून एम्. बी. ए. ही पदवी संपादन केली. बालपणापासूनच त्यांचा क्रीडाक्षेत्राकडे ओढा होता. विशेषतः बिल्यर्ड्झ व स्नूकरमध्ये किशोरवयातच त्यांनी प्रावीण्य संपादन केले.

गीत श्रीराम सेठी

बिल्यर्ड्झमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय खेळाडू मायकेल फरेरा यांच्या उत्तुंग कामगिरीच्या काळातच सेठी यांनी या खेळातील आपली कारकीर्द सुरू केली. वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांनी बिल्यर्ड्झची कुमार राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. १९८२ मध्ये त्यांनी बिल्यर्ड्झची राष्ट्रीय स्पर्धा जिंकली व १९८५ मध्ये जागतिक हौशी बिल्यर्ड्झ स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले. पुढे त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत अनेक अजिंक्यपदे मिळविली. जागतिक व्यावसायिक बिल्यर्ड्झ स्पर्धेत त्यांनी पाच वेळा (१९९२, १९९३, १९९५, १९९८, २००६), तसेच जागतिक हौशी बिल्यर्ड्झ स्पर्धेत तीन वेळा (१९८५, १९८७, २००१) विजेतेपद मिळविले. बँकॉक येथे झालेल्या तेराव्या आशियाई स्पर्धांत या खेळातील सांघिक सुवर्णपदक व एकेरीत रौप्यपदक मिळवले (१९९८). यानंतर झालेली चौदावी आशियाई स्पर्धा (२००२, दक्षिण कोरिया) व पंधरावी आशियाई स्पर्धा (२००६, कतार) यांमध्ये त्यांनी रौप्य व ब्राँझ पदकांची कमाई केली.

बिल्यर्ड्झप्रमाणेच स्नूकरमध्येही त्यांनी सलग चार वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकाविले (१९८५–८८). क्रीडापटुत्वासाठी आवश्यक असलेला उत्तम शारीरिक समतोल, एकाग्रता, बिल्यर्ड्झमधील टेबलावर काठी अलगद हाताळण्याचे कौशल्य आणि चेंडूला योग्य टोला (स्ट्रोक) देऊन एका खेळीतच सलग गुण मिळविण्याची हातोटी ही सेठी यांच्या खेळाची वैशिष्ट्ये होत.

सेठी यांना क्रीडाक्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल पद्मश्री (१९८६), अर्जुन पुरस्कार (१९८६), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (१९९२), के. के. बिर्ला पुरस्कार (१९९३) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांनी सक्सेस व्हर्सेस जॉय या नावाने आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले (२००५). भारतीय नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन व उत्तेजन देण्यासाठी त्यांनी विख्यात भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांच्या सहयोगातून ‘ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट’ ही संस्था स्थापन केली. अहमदाबाद येथे त्यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या पत्नीचे नाव किरण असून त्यांना दोन सुविद्य मुले आहेत.

मिठारी, सरोजकुमार