सावंत,तेजस्विनी : (१२ सप्टेंबर १९८०– ). आंतरराष्ट्रीय कीर्तीची महाराष्ट्रीय महिला नेमबाज. तिचा जन्म कोल्हापूर येथे मध्यमवर्गीय कुटुंबात रवींद्र आणि सुनीता या दांपत्यापोटी झाला. तिची आई सुनीता ही क्रीडापटू असून, तिने क्रिकेट व व्हॉलीबॉलमध्ये १९७५– ७९ च्या दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या महिला संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे खेळाचा वारसा तेजस्विनीस आईकडूनच लाभला. वडील १९७१ च्या युद्घातील निवृत्त नौसैनिक होत. त्यांचे २०१० मध्ये निधन झाले. तिच्या दोन लहान बहिणी अनुराधा पित्रे व विजयमाला गवळी कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहेत. तेजस्विनीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. विद्यार्थिदशेतच एक उत्तम एन्. सी. सी. कॅडेट म्हणून तेजस्विनीने नावलौकिक मिळविला. तिने एन्. सी. सी. मधूनच नेमबाजीस प्रारंभ केला होता (१९९७). त्याबरोबरच मानसशास्त्र विषय घेऊन शिवाजी विद्यापीठाची बी. ए. ची पदवी संपादन केली (२००१). शिवाय एन्. सी. सी. चे ‘सी’ प्रमाणपत्रही तिने घेतले आहे. एन्. सी. सी. मध्ये असतानाच पलटणीची उत्कृष्ट नेमबाज म्हणून तिची निवड झाली होती परंतु अखिल भारतीय ‘जी. व्ही. तेजस्विनी सावंतमावळंकर’ राष्ट्रीय नेमबाजीच्या विजेतेपदासाठी तिचे प्रथम मानांकन असूनसुद्घा एन्. सी. सी. च्या प्रमुखांनी तिची निवड न केल्याने तिची संधी हुकली. तेव्हा तिच्या माता-पित्यांनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेले जयसिंगराव कुसळे यांच्या मदतीने तिला पुढील सरावासाठी उत्तेजन दिले. कोल्हापूरमधील अजित पाटील यांच्या नेमबाजी अकादेमीतूनही तेजस्विनीने नेमबाजीचे बाळकडू आत्मसात केले. या अकादमीतून नवनाथ फरताडे, फुलचंद बांगर आणि आता नेमबाजीत आघाडीवर असलेली नवी दिल्ली येथील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक व दुहेरीत (अनिसा सय्यदसह) विजेतेपद मिळविलेली आणि लंडन (इंग्लंड) येथील (२०१२) ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली राही सरनोबत यांनी प्रशिक्षण घेतले आहे. जयसिंगराव कुसळे यांच्या निधनानंतर भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राष्ट्रीय प्रशिक्षक सुझॅक लॅझलो यांनी तेजस्विनीचे विशेष गुण लक्षात घेऊन ती राष्ट्रीय नेमबाजांच्या चमूत निःसंशयपणे उत्तम नवोदित खेळाडू असल्याचा निर्वाळा दिला व त्याची प्रचिती तात्काळ १९९९ मध्ये नासिक येथे एम्. एस्. सी. सी. स्पर्धांतच आली. त्या स्पर्धेत तिने पहिले रौप्यपदक मिळविले. तिच्या क्रीडा-कारकीर्दीचा आलेख उत्तरोत्तर चढताच राहिला. त्यानंतर तेजस्विनीने सरावावर भर देऊन आणि अथक मेहनत करून २००४ मध्ये इस्लामाबाद (पाकिस्तान) येथे एस्. ए. एफ्. गेम्समध्ये भारताने दुय्यम संघ धाडला असतानाही, कुहेली गांगुली या संघसहकाऱ्याच्या साथीने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या संघास सुवर्णपदक मिळवून दिले. तिने मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथील राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळविली (२००६). लगेचच चीनमध्ये झालेल्या

विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत तिचा फारसा प्रभाव पडला नाही मात्र गौहाती (आसाम) येथे २००७ मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत तिने एकाच स्पर्धेत रायफलच्या तीनही प्रकारांत सहा सुवर्णपदके जिंकून एकाचवेळी सहा सुवर्णपदके मिळविण्याचा नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. याशिवाय तिला अनेक प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानसन्मान लाभले. त्यांमध्ये ताराराणी पुरस्कार (कोल्हापूर, २०१०), फाय फौंडेशन पुरस्कार (२०१०), लोकमत पुरस्कार (२०१०), विश्वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक (म्यूनिक, जर्मनी २०१०), अर्जुन पुरस्कार (२०११) यांचा समावेश होतो.

वारणा उद्योगसमूहाने तेजस्विनीस दत्तक घेतले असून तिचे प्रशिक्षण व पुढील सर्व प्रवासखर्च वगैरेंची जबाबदारी स्वीकारली आहे. तिला कोल्हापूरच्या महानगरपालिकेने रोख एक लाख रूपये, तसेच महाराष्ट्र शासनाने पाच लाख रूपये व भूखंड देऊन गौरविले आहे. सध्या ती महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा खात्यामध्ये प्रथम वर्ग विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुण्याजवळ बागेवाडी येथे कार्यरत असून स्वतःचा नेमबाजीचा सरावही करीत आहे.

देशपांडे, हृषीकेश