आशियाई क्रीडासामने : आशियातील खेळाडूंसाठी सुरू झालेले आंतरराष्ट्रीय सामने. जपानखेरीज इतर नवोदित आशियाई राष्ट्रे इतर क्षेत्रांप्रमाणेच क्रीडाक्षेत्रातही जागतिक दर्जाची नसल्याने ऑलिंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांत त्यांना फारसा वाव नाही म्हणून केवळ आशियाई राष्ट्रांपुरतीच एखादी आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा असावी, अशा विचारसणीतून आशियाई क्रीडासामन्यांचा जन्म झाला.

पहिले पश्चिम आशियाई क्रीडासामने दिल्ली येथे १९३४ मध्ये भरविले गेले. १९४७ च्या एप्रिलमध्ये पंडित नेहरूंनी बोलविलेल्या आशियाई राष्ट्रांच्या परिषदेत (एशियन रिलेशन्स कॉन्फरन्स) सामाजिक शास्त्र विभागात शारीरिक शास्त्र व खेळ यांवर चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय क्रीडासामने निरनिराळ्या देशांचे स्नेहसंबंध वाढविण्यास उपयुक्त होऊ शकतात याकडे काही भारतीय क्रीडाप्रेमी व्यक्तींनी समितीचे लक्ष वेधले. इतकेच नव्हे, तर श्री. सोंधींसारखे क्रीडाप्रेमी परिषदेस आलेल्या निरनिराळ्या देशांच्या प्रतिनिधींना भेटले व आशियाई क्रीडासामन्याची कल्पना त्यांच्यापुढे मांडली. पंडित नेहरूंनाही ही कल्पना पसंत पडली. पुढे १९४८ च्या लंडन येथील ऑलिंपिक सामन्यांच्या वेळी श्री. सोंधी यांनी आशियातील राष्ट्रांच्या क्रीडाप्रतिनिधींची बैठक घेतली. तीत आशियाई ऑलिंपिक क्रीडासामने भरविण्याच्या कल्पनेस त्यांनी मान्यता मिळविली. १९४९ साली दिल्ली येथे झालेल्या आशियाई राष्ट्रांच्या बैठकीत ‘एशियन गेम्स फेडरेशन’ या संस्थेच्या संविधानास मान्यता देण्यात आली. १९५० च्या जुलैमध्ये या संस्थेची बैठक होऊन तीत मार्च १९५१ मध्ये दिल्ली येथे पहिले आशियाई क्रीडासामने भरविण्याचा निर्णय घेण्यात आला.

आशियाई क्रीडासामने ज्या आशियाई क्रीडासंस्थेतर्फे भरविण्यात येतात त्या संस्थेच्या ध्वजाचा रंग पांढरा आहे. ध्वजावर सूर्याची आकृती व एकमेकात गुंफलेली ११ निळ्या रंगाची वर्तुळे असून त्याखाली ‘एव्हर ऑनवर्ड’ (सतत पुढे) ही अक्षरे लिहिलेली आहेत.

दिल्ली येथील नॅशनल स्टेडियममध्ये ४ मार्च १९५१ पासून एक आठवडाभर पहिले आशियाई सामने भरविण्यात आले. त्यांत आशियातील ११ राष्ट्रांतील ६०० स्त्रीपुरुष खेळाडूंनी भाग घेतला. या सामन्यांचे उद्घा‌टन भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते झाले. आशियाई सामन्यांच्या ध्वजारोहणानंतर भारताचे सर्वात जुने ऑलिंपिक खेळाडू ब्रिगेडिअर दलिपसिंग यांनी आशियाई क्रीडाज्योत धावत स्टेडियममध्ये आणली व स्टेडियमवरील आशियाई सामन्यांची ज्योत पेटविली. भारताचे संघनायक श्री. बलदेवसिंग यांनी खेळाडूंतर्फे ऑलिंपिक शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी सामन्यांचे उद्घा‌टन झाल्याचे जाहीर केले. व्यायामी खेळांत (ॲथलेटिक्स) भारत व जपान यांमध्ये शेवटपर्यंत चुरस चालू होती. शेवटी जपानी खेळाडू त्यात सर्वश्रेष्ठ ठरले. एकूण सामन्यांत जपानचा पहिला, भारताचा दुसरा व फिलिपीन्सचा तिसरा क्रमांक लागला. १९५४ साली १ ते ९ मेपर्यंत फिलिपीन्समधील मॅनिला येथे दुसरे आशियाई क्रीडासामने भरले. या सामन्यांत जपानने व भारताने पहिल्या आशियाई क्रीडासामन्यांतील आपले अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान टिकविले. यावेळी १६ नवीन उच्चांक प्रस्थापित करण्यात आले. १९५८ मध्ये २४ मे ते १ जून अखेर जपानमधील टोकिओ शहरी भरलेल्या तिसऱ्या आशियाई सामन्यांत वैयक्तिक व सांघिक स्पर्धांत एकूण ४६ नवीन उच्चांक स्थापन झाले. एकूण स्पर्धांत जपानचा पहिला, भारताचा दुसरा व पाकिस्तानचा तिसरा क्रमांक लागला. चौथे आशियाई सामने १९६२ साली २४ ऑगस्टला इंडोनेशियातील जाकार्ता शहरी भरले. त्यांत तैवान व इझ्राएल या राष्ट्रांना भाग घेण्यास मनाई केल्याने सामन्यांत राजकारण शिरले. पुरुषांच्या व्यायामी खेळांमध्ये १७ व स्त्रियांच्या स्पर्धांत ७ असे २४ उच्चांक निर्माण झाले. जपानने आपला पहिला क्रमांक राखला. इंडोनेशियाचा दुसरा, फिलिपीन्सचा तिसरा व भारताचा चौथा क्रमांक लागला. पाचवे आशियाई सामने १९६६ साली ९ ते २० डिसेंबरपर्यंत थायलंडमधील बँकॉक शहरी भरले. आशियाई सामन्यांत शिरलेल्या राजकारणामुळे हे सामने होतील किंवा नाही अशी शंका होती पण सामने मात्र पार पडले. जपानचा पहिला, द. कोरियाचा दुसरा, थायलंडचा तिसरा, मलेशियाचा चौथा तर भारताचा पाचवा क्रमांक लागला. भारताने आपले हॉकीतील अजिंक्यपद पाकिस्तानवर १-० गोल करून मिळविले. सहावे आशियाई सामने राजकारणामुळे पुन्हा बँकॉक येथेच १९७० साली ९ ते २० डिसेंबरपर्यंत भरले. जपानने आपली अग्रक्रमांकपरंपरा राखून हे सामने गाजविले. सामन्यांत एकूण ४९ विक्रम स्थापन झाले. त्यांपैकी जपानच्या खेळाडूंनी ३३ विक्रम करून खेळांतील सर्वांगीण नैपुण्य पुन्हा सिद्ध केले. जपानने केलेल्या ३३ विक्रमांपैकी २० विक्रम पोहण्याच्या शर्यतींतील आहेत व त्यांपैकी योशिमी नाशिगावा या शाळकरी मुलीचे ५ विक्रम आहेत. जपानचा पहिला, द. कोरियाचा दुसरा, थायलंडचा तिसरा, इराणचा चौथा तर भारताचा पाचवा क्रमांक लागला.

दर चार वर्षांनी भरणारे हे आशियाई सामने ऑलिंपिक सामन्यांच्याच धर्तीवर भरविले जात आहेत व लोकप्रिय होत आहेत. सामन्यांत भाग घेणाऱ्या राष्ट्रांची, खेळाडूंची व खेळप्रकारांची संख्याही वाढत आहे. खेळात राजकारण शिरल्यामुळे या सामन्यांना जे गालबोट लागले आहे, ते कालांतराने जाईल व खेळासाठी खेळ या भूमिकेतून आशियाई राष्ट्रांतील ऐक्य, बंधुभाव व सहकार्य वृद्धिंगत होतील. पुढील म्हणजे सातवे आशियाई सामने १९७४ मध्ये इराणच्या तेहरान शहरी भरविण्याचे ठरविले आहे.

 

शहाणे, शा. वि.