लाठी : एक व्यायामसाधन. स्वसंरक्षण व शत्रूवर हल्ला करणे या मूलभूत गरजातून लाटी फिरवण्याच्या कल्पनेचा उगम झाला. स्वतःचे शौर्य दाखवण्याचे साधन म्हणून लाठीला महत्त्व आहे. प्रतिपक्षाशी जवळून झुंज द्यायची असेल तर ती कुस्तीने देता येते तथापि दुरून हल्ला चढविण्याच्या कामी लाठीच उपयोगी पडते. प्राचीन काळात बचाव व हल्ला यांसाठी सुरूवातीला झाडाच्या फांदीच्या वापर होई, त्यातूनच पुढे काठीचा वापर रूढ झाला. काठीचेच रूपांतर पुढे लाठीत झाले. ‘लठ’ म्हणजे लांब लाठी. लठ जाडा, वजनदार व डोक्यापेक्षा एक हात उंच असतो. लाठीची उंची सु. ५ ते ५ -१/२) फुट (१·५२ ते १·६७ मी.) असते. ती साधारण कानाच्या पाळीपर्यत उंच असावी, असा प्रघात आहे. लाठी बांबूपासून वा वेतापासून तयार करतात. वेताच्या लाठ्या टिकाऊ असतात. लाठीचा व्यास सु. १ ½ इंच (३८ मिमी.) असतो.

लाठी कशी धरावी व कशी फिरवावी, या दृष्टीने तिचे पवित्रे व हात बसवलेले आहेत. लाठी फिरवताना जाड बाजू पुढच्या अंगास ठेवून फिरवतात तर लठ मध्यभागी धरून फिरवण्याचा प्रघात आहे. लठाने हूल व फटका मारता येतो. तसेच हल्ला व बचाव एकाचवेळी करता येतात. लाठी अंगाभोवती न थांबू देता गरगर फिरवून एकातून एक अशी वर्तुळे निर्माण करण्यात खरे कौशल्य असते. ‘जंगमो’, ‘बगलमो’ अशी वर्तुळे असतात. सीधी व उलटी या दोन मूलभूत प्रकारांवर लाठीचे सत्तावीस हात बसवलेले आहेत. हल्ला चढवताना तिचे वार प्रतिपक्षाच्या वेगवेगळ्या अवयवांना लागतील, अशा चातुर्याने लाठीचे हात करता येतात. लाठी दोन्ही हातांनी फिरवता येणे आवश्यक असते.

आ.

वीरवृत्ती निर्माण करणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, चापल्य व कौशल्य वाढवणे यांसाठी लाठीचा उपयोग होतो. कुस्तीला पूरक व्यायाम म्हणूनही लाठीला महत्व आहे. भारतीय बलोपासनेत लाठीला उच्च स्थान आहे. जड लाठी, वजनदार लाठी, लांब लाठी (लठ), कवायत असे लाठीच्या व्यायामाचे प्रकार होतात. स्वीडिश व्यायामपद्धतीत सांघिक लाठीला महत्व आहे. आपल्याकडेही व्यायामशाळांतून लाठी कवायती शिकवल्या जातात. प्रतिस्पर्ध्यास नामोहरम करण्यासाठी ‘लाठी-लढत’ हा प्रकार महत्वाचा आहे. लाठी-लढंत व लाठी-बंदेश यांचा प्रत्यक्षत: उपयोग होतो तर सांघिक लाठीचा केवळ प्रात्याक्षिक म्हणून उपयोग होतो. बडोदे, अमरावती व दक्षिण महाराष्ट्रामध्ये साधारण १९०० सालापासून लाठीविद्येचा जोर वाढला. बडोद्याच्या ‘जुम्मादादा’ व्यायामशाळेने व पुढे ‘अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळा’ने लाठीचा हिरीरीने प्रसार केला. त्यामुळे शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमातही लाठीला प्रमुख स्थान लाभले अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने लाठी व फरीगदका छूट या मर्दानी खेळांचे नियम (१९३८ चौथी. आवृ. १९५८) तयार करून त्यास अधिकृत रूप दिले. हल्ली मात्र व्यायामाच्या या उपयुक्त प्रकाराचे महत्व कमी झालेले दिसते. तथापि शासकीय सेवेत लाठीचा आजही उपयोग होतो. पोलिसांच्या हातात लाठी दिली जाते तिचा वापर एकप्रकारचे हत्यार म्हणून होतो. दंगल उसळलेली असताना लाठीनी हल्ला केल्यास दंगल काबूत येण्यास मदत होते. अशा रीतीने दंगा मोडून काढणे व शांतता प्रस्थापित करणे, या दोन्ही दृष्टींनी लाठीचा आजही उपयोग होताना दिसतो.

पंडित, बाळ. ज.