सिसिलियन : हा उभयचर वर्गाच्या सिसिलिया (जिम्नोफायोना किंवा ॲपोडा) गणातील सिसिलिडी कुलामधील गांडुळासारखा दिसणारा प्राणी आहे. याचा प्रसार उष्णकटिबंधीय जंगले व नदीकाठची जंगले या ठिकाणी झालेला आहे. भरपूर पाऊस पडल्यावर हा जमिनीवर दिसतो. हा दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आफ्रिका (मॅलॅगॅसीसोडून) आणि आशियामध्ये भारत, श्रीलंका, मलेशिया, थायलंड इ. देशांत आढळतो. याच्या सु. २० प्रजाती व ५५ जाती आढळतात. यांपैकी आशियात इक्थिऑफिस ग्लुटिनौसिस ही जाती व याच प्रजातीतील इतर काही जाती सर्वत्र आढळतात. भारतात सु. ५ प्रजाती व १२ जाती आढळतात. त्यांपैकी हर्पेली ही प्रजाती पूर्व भारतातच आढळते. जिम्नॉफिसयुरीओटिफ्लस दक्षिण-पश्चिम भारतात, इक्थिऑफिस ही बऱ्याच ठिकाणी तर इंडोटिफ्लस ही प्रजाती मुंबईच्या जवळ खंडाळा-लोणावळा भागात आढळते (उदा., इंडोटिफ्लस बॅटर्सबाय). सिसिलियनांचे जीवाश्म मिळालेले नाहीत.

अंड्यांचे रक्षण करणारी सिसिलियन मादी

सिसिलियनाचे शरीर साप किंवा गांडुळासारखे असून त्वचेतील दुमडीमुळे ते खंडयुक्त दिसते. शरीराची लांबी वेगवेगळ्या जातींत १८—१४० सेंमी. पर्यंत असते. शरीराचा रंग काळसर वा गडद गुलाबी असतो. मत्स्य, उभयचर व सरपटणारे प्राणी यांमधील काही लक्षणे या प्राण्यात आढळतात. हालचालींसाठी स्वतंत्र अवयव नसून ती सापासारखी असते. पुरुन घेण्याच्या सवयीमुळे काही बदल याच्या शरीरात आढळतात. उदा., डोळे अत्यंत लहान (कधीकधी अल्पविकसित) असून ते कवटीची हाडे व त्वचा यांमध्ये असतात. डोळ्यांवरील त्वचा पारदर्शक असून पापण्या नसतात. डोक्यावर दोन खोबण्यांमध्ये दोन संस्पर्शके (अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या डोक्यावर असलेली आणि स्पर्शज्ञान, शोध घेणे, पकडणे किंवा चिकटणे इ. कार्यांकरिता उपयोगात आणली जाणारी लांब, सडपातळ किंवा लवचिक इंद्रिये) असतात. शेपूट अत्यंत लहान असून खालच्या बाजूने दबलेले असते. इतर उभयचरांप्रमाणे एकच फुप्फुस क्रियाशील असते. जीवनचक्र पाणी व जमिनीवर पूर्ण होते. गांडूळ, कीटक, अळ्या व लहान अपृष्ठवंशीय प्राणी हे त्याचे अन्न असते.

विकसित शरीर, तोंडाची मोठी पोकळी, जबड्यावर दोन्ही बाजूंस दात व श्वसनामध्ये घशाची हालचाल ही ⇨ उभयचर वर्गा ची लक्षणे या प्राण्यात आढळतात. त्वचेमध्ये अस्थिमत्स्याप्रमाणे [ → मत्स्य वर्ग] खोलवर खवले आढळतात. पायांच्या पुढच्या व मागच्या जोड्या नसतात. श्रोणी व अंसीय मेखलाही नसतात. पाण्यातील सिसिलियन जातींमध्ये पृष्ठपर असतात. प्रौढांमध्ये क्लोम वा क्लोम-दरण नसतात.

सिसिलियन नर व मादी दिसायला सारखी असतात. फलन शरीरांतर्गत असते. नरामधील अवस्कर (ज्यात आंत्र, युग्मकवाहिन्या आणि मूत्रवहिन्या उघडतात असा शरीराच्या मागच्या टोकाकडे असणारा समाईक कोष्ठ) बाहेर येणारे असून त्याचा मैथुनांग म्हणून उपयोग केला जातो. काही जाती पिलांना जन्म देतात काही जातींत मादी एप्रिल-मेमध्ये पाण्याच्या प्रवाहाकाठी बीळ पाडून त्यात २०— ३५ अंडी घालते. अंड्यांभोवती शरीर गुंडाळून त्यांचे रक्षण करते. अंड्याचे आकारमान चारपट वाढून डिंभ (एखाद्या प्राण्याची भ्रुणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी आणि प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) बाहेर पडतो. अंड्यात वाढणाऱ्या गर्भास बाह्य कल्ले असतात. कल्ल्यांचा उपयोग श्वसनासाठी नसून पोषणासाठी होत असावा असे मानले जाते परंतु डिंभावस्थेत ते लोप पावतात. बहुतेक डिंभाची वाढ पाण्यात होऊन रुपांतरणाने (रुप आणि संरचना यांत होणाऱ्या बदलाने) प्रौढ प्राणी तयार होतो. डिंभाची वाढ अंड्यातच किंवा पाण्याखाली होते.

सिसिलियन लेपोस्पोंडीलिया पासून उत्क्रांत झाले असावेत, तसेच सिसिलिडी कुल हे उभयचर वर्गातील सर्वांत आद्य कुल आहे असे मानले जाते.

भोईटे, प्र. बा.