सायक्लॉप्स : कवचधारी वर्गातील एक महत्त्वाचा प्राणी. या संधिपाद प्राण्यांचा समावेश सायक्लोपिडी कुलात होतो. सायक्लॉप्स ही एक प्रजातीही आहे. हा गोड्या पाण्यात आढळतो. यास एक लाल मध्याक्ष असतो. त्यामुळे ग्रीक पुराणकथेतील ‘सायक्लॉप्स’ या एका डोळ्याच्या राक्षसाच्या नावावरू न त्यास हे नाव पडले असावे. सायक्लॉप्स मादी (पृष्ठीय दृश्य) : (१) मध्याक्ष, (२) शृंगिका, (३) लघुशृंगिका, (४) अंड्यांच्या पिशव्या, (५) शेपटीची शाखा.त्याचे शरीर लांबट असून लांबी १·५ ते ५ मिमी. असते. डोळे व पहिला वक्ष खंड ( छातीचा भाग) यांच्या एकत्रीकरणाने शीर्षवक्ष तयार होते. शीर्षवक्षाची वरची बाजू पृष्ठवर्माने (पाठीचा सगळा अथवा काही भाग झाकणाऱ्या कायटिनमय किंवा अस्थिमय ढाली सारख्या संरचनेने) झाकलेली असते. अवयव असलेले चार वक्षीय खंड मोकळे असतात. सहाव्या खंडाचे पहिल्या उदर खंडाशी एकत्रीकरण झालेले असते.

चौथ्या उदर खंडावर द्विशाखित शेपटी असते. शृंगिका लहान असून लघुशृंगिका शाखाहीन, लांब व स्पष्ट असतात. त्यावर लांब अभिमर्शाची एक जोडी असून त्याचे पाण्यात आघात करू न तो झटके देत पुढे जातो व पोहतो. केसाळ पायांच्या पाच जोड्या असून पोहण्यासाठी त्याचाही उपयोग होतो. सूक्ष्म प्राणी व वनस्पती हे त्याचे अन्न आहे.

सायक्लॉप्समध्ये नर व मादी वेगवेगळे असतात. नर मादीपेक्षा आकाराने लहान असतो. वीण हंगामी असते, परंतु ती वर्षभरही चालू राहते. मादीच्या उदराच्या तळाशी अंड्यांच्या दोन पिशव्या असतात. थोड्याच दिवसांत अंडी फुटून त्यातून डिंभ बाहेर पडतात. रूपांतराच्या अनेक अवस्थांतून गेल्यावर प्रौढावस्था प्राप्त होते. लहान आकाराच्या सायक्लॉप्सचे आयुष्य ४ ते ६ महिन्यांचे व मोठ्या आकाराच्या सायक्लॉप्सचे आयुष्य १० ते १४ महिन्यांचे असते.

गोड्या पाण्यातील लहान मासे, मोठे मासे व अन्य लहान प्राण्यांचे अन्न म्हणून सायक्लॉप्सला बरेच महत्त्व आहे. त्याच्या काही जाती समुद्राच्या पाण्यात आढळतात. त्यांची संख्या काही वेळेस इतकी प्रचंड असते की त्यामुळे पाण्याचा रंग गुलाबी दिसतो. ⇨देवमाशांच्या काही जातींचे ते प्रमुख अन्न आहे. तो पट्टकृमी व नारुचे कृमी यांच्या जीवनचकातील पोषक प्राणी आहे [⟶ नारू ].

पहा : कस्टेशिया.

जमदाडे, ज. वि.